रामटेकमधील चित्रनगरीसाठी १५ दिवसात जमिनीचे हस्तांतरण करणार : मंत्री ॲड. आशिष शेलार

15 Sep 2025 18:00:13

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी दिली.

मंत्री आशिष शेलार हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वालही उपस्थित होते.

या बैठकीनंतर मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "स्थानिक कलाकारांना योग्य मंच उपलब्ध करून देत विदर्भात चित्रपट निर्मिती तसेच या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. या कामाला गती देण्याच्या दिशेने दोन महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. महसूल विभागाच्या मालकीची ६० एकर जागा चित्रनगरीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा झाली असून नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमीन हस्तांतरणासंदर्भात अर्ज करून नियोजित वेळेत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. रामटेक चित्रनगरी उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला असून या संदर्भातही लवकरच कार्यवाही करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.

यासोबतच रामटेक येथील प्राचीन गड मंदिर परिसरात येणार्‍या भाविकांसाठी स्वच्छतागृह, दुकाने, गाडे आदींचा समावेश असणाऱ्या अद्ययावत सोयी-सुविधा उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावास येत्या १० दिवसात राज्य पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा वार्षिक नियोजन निधीतील ३ टक्के निधी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या स्मारकांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरावा. हा संपूर्ण निधी त्याच कारणासाठी वापरला जातो किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल. अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद आणि त्याला मिळालेली मंजुरी तसेच प्रत्यक्षातील कामे याचा नियमित आढावा घेऊन कामांना गती देण्याचा निर्णय झाला," असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयात हेरिटेज कॉरिडॉर डेस्क

"रामटेक गड मंदिरातील व्यापक विकास, सुशोभीकरण, ऐतिहासिक संवर्धन आणि जपणूक अशी विविध २३ विकास कामे 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' नावाने करण्यात येणार असून ही कामे राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात मंजूर करून घेण्यात येतील. अर्थसंकल्पातील मंजुरीनंतर ही कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' उभारण्यात येणार आहे. तसेच 'प्राचीन वारसा स्थळे मनसर' या नावाने एकूण १५६ एकरात प्राचीन मूल्य असणारी स्मारके अस्तित्वात असून स्मारक संवर्धनाच्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच एक सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांची स्वतः भेट घेणार आहे," असेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला लवकरच मंजुरी

दरवर्षी २२ जानेवारी रोजी रामटेक येथे आयोजित करण्यात येणारा श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या पंधरा दिवसात आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचेही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.


Powered By Sangraha 9.0