पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत लष्करी सज्जतेवर मंथन

15 Sep 2025 16:55:26

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी १६व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचा प्रारंभ झाला. दर दोन वर्षांनी होणारी ही परिषद देशाच्या नागरी व लष्करी नेतृत्वाला एकत्र आणणारे सर्वोच्च मंच असून भविष्यातील संरक्षण धोरण आणि सज्जतेबाबत दिशा ठरवण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून होते. यंदाच्या परिषदेची संकल्पना “सुधारणा वर्ष – भविष्याचा वेध” अशी आहे.

पंतप्रधानांनी या प्रसंगी सशस्त्र दलांचे कौतुक केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील यशस्वी कामगिरी, राष्ट्रनिर्माणात संरक्षण दलांचा सहभाग, चाचेगिरीविरोधी मोहिमा, परदेशातील संघर्ष क्षेत्रांतून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका आणि आपत्तीग्रस्त मित्रदेशांना दिलेली मदत यांचा विशेष उल्लेख केला. सुधारणा वर्ष म्हणून घोषित २०२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने संयुक्त कार्यपद्धती, आत्मनिर्भरता आणि नवनिर्मिती या तत्त्वांवर आधारित ठोस पावले तत्काळ उचलावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

परिषदेच्या दरम्यान पंतप्रधानांना संरक्षण दलांच्या सज्जतेबाबत माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरनंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुरक्षा परिस्थितीतील दलांची तयारी, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नव्या रणनितींवर आधारित युद्धाचे स्वरूप, मागील दोन वर्षांत राबवलेल्या सुधारणा तसेच पुढील दोन वर्षांचा आराखडा याबाबत त्यांनी आढावा घेतला.

पुढील दोन दिवसांपर्यंत ही परिषद सुरू राहणार असून, विविध संरचनात्मक, प्रशासकीय आणि कार्यात्मक मुद्द्यांवर चर्चा होईल. वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दलांची तयारी, दलांकडून आलेला अभिप्राय, तसेच पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यासाठीची रणनिती निश्चित करण्याचा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.


Powered By Sangraha 9.0