आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

15 Sep 2025 14:06:55

मुंबई : गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी संस्कृत भाषेतून महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी राजभवनातील दरबार हॉल येथे त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेशकुमार यांनी देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली.

आचार्य देवव्रत यांची कारकीर्द

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना अध्यापन आणि प्रशासन क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभव आहे. १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला. या कालावधीत त्यांनी नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड आणि जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. २२ जुलै २०१९ पासून ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार केल्यामुळे गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.

राष्ट्रवादी विचारसरणी आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार, वैदिक मूल्ये आणि तत्त्वज्ञान यावर व्याख्याने, वृत्तपत्रे तसेच मासिकांमध्ये लेखन, युवकांमध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, योग व वैदिक जीवनशैली लोकप्रिय करण्यासाठी कार्यक्रम, गोधन संवर्धन व नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरे, योग, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार पद्धतींचे प्रशिक्षण व प्रसार, वृक्षलागवड व स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणमुक्त समाजनिर्मिती, ग्रंथलेखन या विषयांमध्ये त्यांची विशेष आवड आहे.


Powered By Sangraha 9.0