घोडबंदर रोडवरील १० सोसायट्या 'सेवा रस्ता' कायम ठेवण्यासाठी आग्रही

15 Sep 2025 12:57:27

ठाणे : घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याच्या कामाविरोधात १० रहिवाशी सोसायट्यांमधील रहिवाशी एकत्र आले आहेत. हिरानंदानी १ संकुलातील क्लब हाऊसमध्ये या रहिवाशांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला. तसेच सर्व्हिस रस्ता कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच भेट घेतली जाईल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली.

घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रस्ता हा कायमस्वरुपी मुख्य रस्त्यात समाविष्ट करण्याच्या कामाला घोडबंदर रोडवरील रहिवाशांचा तीव्र विरोध होत आहे. या कामाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी हिरानंदानी १ पार्क संकुलासह विविध १० संकुलामधील पदाधिकारी व रहिवाशीही एकत्र आले आहेत. या बैठकीला भाजपाचे आमदार संजय केळकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीत सेवा रस्त्याची आवश्यकता रहिवाशांकडून मांडण्यात आली. तर मुख्य रस्त्यावरुन भरधाव वाहने सुरू झाल्यानंतर छोट्या वाहनांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता कायम ठेवावा. त्याचबरोबर या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद करावी, अशी आग्रही मागणीही बैठकीत करण्यात आली. या प्रश्नावर आपण रहिवाशांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात येईल, असे आश्वासन आमदार केळकर यांनी दिले.


Powered By Sangraha 9.0