‘पर्वतपुत्र’ आणि ‘जेन झी’चा आपला शेजारी...

    14-Sep-2025
Total Views |

सध्या आशियामध्ये अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु असताना, आशियातीले एक देश म्हणजे नेपाळ एका वेगळ्याच समस्येचा सामाना करत आहे. त्यामुळे अनेक स्पर्धांना त्याला मुकावे लागले आहे. वास्तविक नेपाळ क्रीडाक्षेत्रात काहीसा मागासच राहिला आहे. त्याची कारणे, नेपाळची शक्ती आणि उपाययोजनांचा घेतलेला आढावा...


आंतरखंडीय क्रीडास्पर्धा अनुभवात क्रीडाविश्व सध्या गुंतलेलं आहे. दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांचीही ‘एसएएफएफ’ अर्थात ‘दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ’ अशी एक संघटना आहे. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेचे बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका असे सदस्य देश असून, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ आयोजित दि. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात, भारताने नेपाळवर ५-० असा विजय मिळवत, पुन्हा एकदा दक्षिण आशियातील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्या स्पर्धेत खरे तर पहिल्या शिट्टीपासूनच नेपाळने भारताला त्यांचे वर्चस्व गाजवू दिले नव्हते, पण त्यावर मात करून १७ वर्षांखालील मुलींच्या त्या स्पर्धेत महिला अजिंयपद २०२५चे विजेतेपद भारताने पटकावत, नेपाळला मागे टाकण्यात यश मिळवलं.

युवतींची फुटबॉल स्पर्धा चालू असताना, दुसरीकडे भारत आपले आंतरखंडीय प्रभुत्व हॉकीतही दाखवत होता. पुरुषांच्या आशियाई हॉकी स्पर्धा बिहारच्या राजगीर येथे दि. ७ सप्टेंबर रोजी संपन्न झाल्यावर, पाठोपाठ महिलांच्याही आशियाई हॉकी स्पर्धा चीनच्या हांग्झो येथे दि. ५ सप्टेंबर ते दि. १४ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाल्या. राजगीरला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी वगळता यजमान भारत, बांगलादेश, चीन, चिनी तैपेई, जपान, कझाकस्तान, कोरिया, मलेशिया हे देश स्पर्धेत उतरले होते, त्यामधील भारतीय पुरुष विजेते ठरले आणि त्यांनी २०२६ मध्ये नेदरलॅण्ड्स आणि बेल्जियममध्ये होणार्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे तिकीट पटकावले. हॉकीत भारतीय महिलांनी मात्र रविवार, दि. १४ सप्टेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे नेदरलॅण्ड्स आणि बेल्जियममधील स्पर्धेचे तिकीट काढण्यात मात्र त्या अपयशी ठरल्या.

आंतरखंडीय हॉकी स्पर्धेपाठोपाठ, आशियाई क्रिकेट स्पर्धा दि. ९ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीत सुरू झाल्या. संयुक्त अरब अमिरातीत होत असलेल्या क्रिकेटच्या संघांमधील ‘अ’गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएईचा समावेश आहे, तर ‘ब’ गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. हॉकीत मागे पडलेला नेपाळ, क्रिकेटमध्येही मागे पडला आहे. नुकताच नेपाळी युवकांमध्ये मोठा क्षोभ निर्माण झाला होता. नेपाळ सरकारनं गेल्या आठवड्यात २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली, हे त्यामागचे मुख्य कारण. या आंतरखंडीय क्रीडास्पर्धांचे शेवटच्या पानांवरच्या वार्तांचे वाचन करण्यासाठी वृत्तपत्रे हाती घेताच आपली पहिली नजर पडते, ती पहिल्या पानावरील नेपाळच्या ‘जेन झी’ आणि ‘नेपो बेबी’ या दोन संज्ञांवर.

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यापासून आधीच्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत, ‘जेन झी’नामक हिंसक आंदोलन नेपाळी विद्यार्थी व तरुणांनी छेडले होते. स्मार्टफोन, इंटरनेटच्या आजच्या आधुनिक युगात जन्मलेल्या पिढीला ‘जेन झी’ असे संबोधतात. तर ‘नेपो बेबी’ म्हणजे, प्रसिद्ध व्यक्तींची मुलं, जी पुढे आई-वडिलांच्या नावामुळेच यशस्वी आणि प्रसिद्ध झाली असं मानलं जातं. अशा या ‘नेपो बेबी’, ‘जेन झी’ युवकांच्या पहिल्या पानावरील बातम्या बघून झाल्यावर, आपण वृत्तपत्रातील शेवटचं ‘क्रीडा’चं पान वाचू लागतो.

आधी आलेल्या हॉकीच्या बातम्या आणि नंतरच्या क्रिकेटच्या बातम्यांत, भारताबरोबर आपल्या आसपासची अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका ही नावे दिसून येतात. परंतु, एका आपल्या शेजारच्या देशाचे नाव आढळून येत नाही, तो देश म्हणजे नेपाळ.

नेपाळमधील ओरा नावाच्या शालेय विद्यार्थ्याचा ज्वलंत भाषणाचा जुना व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल होत आहे. तो युवक आशा आणि निश्चयाने भरलेल्या स्वरात भाषणाला सुरुवात करतो. "आज मी येथे एका नवीन नेपाळचे स्वप्न घेऊन उभा आहे. परंतु, माझे हृदय जड आहे, कारण हे स्वप्न निसटत चालले आहे,” असे तो म्हणतो. या नेपाळच्या युवकांचे म्हणणे नक्कीच ‘राष्ट्र प्रथम’ असंच असेल. देश आपल्या मनाजोगता असेल, तर आपण मनापासून क्रीडाक्षेत्रात झपाट्याने प्रगती करू शकतो. पण या युवकांचं आणि आजच्या तेथील नेतेमंडळींचं एकमत होताना कदाचित दिसून येत नसेल. म्हणूनच कदाचित आंतरखंडीय क्रीडास्पर्धांमध्ये नेपाळ इतर शेजार्यांत मागासलेला आहे.

हॉकीच्या जागतिक क्रमवारीत नेपाळ ६६वा आहे. त्या नेपाळचा संघ जसा हॉकीच्या आशिया चषकाच्या स्पर्धेत नव्हता, तसाच नेपाळचा युवक क्रिकेटच्याही आशिया चषकासाठी सहभाग घेताना दिसला नाही. कारण त्या युवकांना आधी क्रांती घडवून, मग मनसोक्तपणे खेळांत भरारी घ्यायची असेल कदाचित! याचे कारण आपण जाणून घेऊ शकतो. क्रिकेटच्या २०२५ आशिया चषकासाठी आठपैकी पाच जागा ‘एसीसी’च्या कायमस्वरूपी सदस्यांसाठी राखीव होत्या : अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. उर्वरित तीन जागा ‘एसीसी प्रीमियर कप २०२४’मध्ये पहिल्या तीन संघांना देण्यात आल्या. जिथे नेपाळ चौथ्या स्थानावर राहिला होता.

काही काळापूर्वी श्रीलंकेतील युवक रस्त्यावर उतरत हिंसक आंदोलन करण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर मनाजोगते सरकार त्यांनी सत्तेवर आणले. भारतातही जयप्रकाश नारायण यांनी, आणीबाणीविरोधात उभारलेल्या लढ्यात प्रामुख्याने तरुणांचाच समावेश आधिक होता. सत्तेचा अंकुश जनतेच्या हाती असतो, हा धडा श्रीलंका, बांगलादेशपाठोपाठ आता नेपाळच्या सत्ताधार्यांना तेथील सामान्य माणसाने शिकवला. या युवकांना हवे तसे सरकार सत्तेवर येईल. येणारं सरकार काही काळ रुळले, तर त्यापुढील काळात श्रीलंकेप्रमाणेच नेपाळनेही एखाद्या मोठ्या क्रीडाप्रकारात कमवून दाखवावे. अशा युवाशक्तीचा उपयोग नेपाळनेही क्रीडा क्षेत्रात करून, शारीरिक व मानसिक विकास साधावा. क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे भारताप्रमाणे नेपाळनेदेखील पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक क्रियाकलापांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी नवयुवकांचा नवीन नेपाळ घडवणार्या शासनाने, युवा धोरणांद्वारे शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्राला महत्त्व देऊन, नेपाळमधील युवकांना सक्षम करावे. देशातील युवाशक्तीचा देशाच्या प्रगतीसाठी वापर करत, क्रीडाविश्वातही उज्ज्वल कामगिरी नेपाळने करावी, अशी त्याच्या सख्ख्या शेजार्याची, अर्थात हिंदू राष्ट्र समर्थन करणार्या भारताची मनापासून इच्छा असेल.

यशस्वी होण्याचा पहिला मंत्र असतो संघभावना! हीच ‘संघभावना’ श्रीलंकेप्रमाणे नेपाळनेही, सत्तांतर करण्यात जगाला दाखवून दिली आहे. आता या यशानंतर नेपाळी युवकांनी अशीच संघभावना खेळांतून शिकायची आहे. ही सांघिक भावना तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनदेखील देईल. तुमच्यातील अनेक युवक खेळाडू असतील, तुमच्यापैकी अनेकजण पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळचं प्रतिनिधित्व करतील. तुमच्या क्रीडा क्षेत्राचा हा अनुभव, तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल. क्रीडाक्षेत्र ही खर्या अर्थाने जीवनाची खरी आधार व्यवस्था आहे. खेळात पुढे नेणारी शक्ती आणि ज्ञान तुम्हाला जीवनातही पुढे घेऊन जाईल. आता पेटून उठलेली नेपाळमधील युवकांच्या शक्तीचा वापर खेळ आणि जीवन या शाश्वत विकासाठी दोन्हींमध्ये करण्यात यावा. जो खेळात आणि जीवनात आव्हाने स्वीकारतो तोच विजेता असतो, हे ध्यानात ठेवावे.

आज झळकत असलेलं नेपाळचे नाव बघताना, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील संचलनाची आठवण येते. भारतीय सैन्यदलातील विविध रेजिमेंट आपण बघत असताना, त्यात गोरखा रेजिमेंटचेही संचलन दिसते. गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याची एक शौर्यशाली तुकडी, जी मूळतः नेपाळमधील गोरखा समुदायातील सैनिकांची बनलेली आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश भारतीय सैन्यातील, सहा गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याचा भाग झाल्या. हे सैनिक त्यांच्या धाडस, शिस्त आणि ‘खुखरी’ या शस्त्रासाठी प्रसिद्ध आहेत. गोरखा रेजिमेंटला अनेक युद्ध सन्मान मिळाले आहेत आणि त्यांनी शेकडो ‘वीरचक्र’सारखे पुरस्कारही जिंकले आहेत. ते ‘जय महाकाली, आयो गोरखाली’ या घोषणेने शत्रूंवर हल्ला करतात. त्यांचे ब्रीदवाय ‘कफर हुन्नू भंडा मारनु रामरो’ (भित्रेपणाने जगण्यापेक्षा मरणे चांगले)असून, हेच त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. थोडयात, गोरखा रेजिमेंट हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे.

रणांगणावर जसे नेपाळी युवक दिसतात, तसेच हे क्रीडांगणावरही काही वेळा आढळतात. उदाहरणार्थ भारतीय सैन्यातील अनुभवी नेमबाज जितू राय हा, गोरखा रेजिमेंटमधील एक प्रसिद्ध ऑलिम्पियन. जितू राय हा ११ गोरखा रायफल्समध्ये सुभेदार मेजर म्हणून सेवा बजावतोय. तो भारतीय सैन्यात २००६ पासून कार्यरत असून, त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जितू रायने नेमबाजीमध्ये, अनेक आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली आहेत. सैन्यात सेवा बजाताना त्याने, आपल्या क्रीडा कौशल्याने देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले. जितू राय हा अनेक युवकांसाठी प्रेरणास्रोत आहे, जो सैन्यात सेवा करण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करू शकतो.

व्हॉलीबॉल हा नेपाळचा राष्ट्रीय खेळ असला, तरी क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांमध्ये नेपाळचे खेळाडू सक्रिय आहेत. या लोकप्रिय खेळांमध्येही नेपाळचे संघ असतात आणि त्यांची उपस्थिती जाणवतेही.

नेपाळमध्ये क्रीडा क्षेत्राला मोठा चाहता वर्ग आहे. फूटबॉल, क्रिकेट आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धांदरम्यान तेथे, मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतात. नेपाळमधील क्रीडाविश्व हे अशा खेळांनाही प्रोत्साहन देत असते. क्रीडाक्षेत्रात नेपाळमधील युवक रस घेत असले, तरी जागतिक स्तरावर नेपाळमधील युवक नावारूपास आलेला आढळत नाही. कदाचित यापुढे यामध्ये बदल घडेल अशी आशा आपण बाळगू.

पर्वतारोहकांना नेपाळ आधिकच जवळचा वाटत असेल. ‘टायगर ऑफ द स्नो’ हे आत्मचरित्रकार, ‘नेपाळतारा’ म्हणून सन्मानित केलेली एक आसामी, आपणा सर्वांना शालेय जीवनापासून सुपरिचित आहे. ती आसामी म्हणजे शेर्पा तेनसिंग, हा एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट सर करणारा पहिला शेरपा होय. शेरपा म्हटले की, नेपाळचं नाव आपल्या तोंडी येणारच. शेर्पा ही नेपाळमधील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे एव्हरेस्ट व लोत्से या हिमालयाच्या अतिउंच पर्वतरांगांत असून, इतरत्रही विशेषतः भारतातील दार्जिलिंगमध्येही ती आढळते. ‘पूर्वेकडील रहिवासी’ या अर्थाच्या ‘शर-पा’ या मूळ तिबेटी शब्दांपासून, ‘शेर्पा’ हा शब्द तयार झाला. नेपाळचे काही शेर्पा गिर्यारोहकांना मार्गदर्शन व मदत करताना दिसतात. या लोकांबद्दल आपल्या क्रीडाप्रेमींमध्ये विशेष स्नेहाची भावना आहे. हिमालयातील अनेक पर्वतरांगाना भेटी देणार्या अनेकांचे, नेपाळी शेर्पांशी घनिष्ट संबंध आहेत. याबाबतीत पुण्याच्या सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे ‘पर्वतपुत्र शेर्पा’ नावाचे पुस्तक मला स्मरते.

पर्वतरोहणामध्ये अनेक अडथळे येतात. गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दर्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑसिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग! या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात. एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा, अर्थात गिर्यारोहणाची खरी ‘लाईफ लाईन’. आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून, त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे. उमेश झिरपे यांनी त्यांच्या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत. शेर्पा म्हणजे केवळ सामान उचलणारे नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खर्याखुर्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाची ही एक झलक त्या काटक नेपाळी पर्वतपुत्राबद्दल आपण वाचतो आणि आपण नेपाळच्या आधिकच प्रेमात पडतो.

हिंदूराज्याचं समर्थन करण्यात पुढाकार घेणार्या नेपाळी युवकांबद्दल, माझ्यासारख्या खेलकूद वेड्याला विशेष आपुलकी वाटते. कारण नेपाळमधील युवकांचं अजून एक कनेशन याप्रसंगी मलाही नमूद करावेसे वाटते. आपणास माहीत असेलच की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात ‘आरएसएस’ प्रणित ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ हा राष्ट्रीय स्तरावर ‘एकलव्य खेलकूद प्रतियोगिता’ आयोजित करतो. त्या स्पर्धांमध्ये विविध स्पर्धा होतात. राष्ट्रीय स्तरावर चालणार्या स्पर्धेत, ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या जवळपास सर्वच प्रांतांच्या मुलामुलींचा सहभाग असतो. त्यात भारतातील राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील जनजातीय खेळाडू सहभाग घेतात. ‘आरएसएस’च्या धर्तीवर स्थापन झालेला व नेपाळमध्ये कार्यरत असलेला ‘एचएसएस’ म्हणजेच हिंदू स्वयंसेवक संघाकडून, नेपाळ देशातील जनजातीय खेळाडू या खेलकूद स्पर्धेत सहभागी होतात. नेपाळमधील हे खेळाडू, भारतीय खेळाडूंना अनेकदा ‘काटे की टक्कर’ देत अनेकदा प्रशस्तिपत्र मिळवताना दिसतात.

तर असा हा आपला ‘पर्वतपुत्र’ अन् ‘जेन झीं’चा देश असलेला शेजारी, इतर संघटनांच्या कचाट्यात कदापि सापडू नये. राजकारण वगळता खेळात रस घेत ऑलिम्पिकलाही गवसणी घालणारा आमचा शेजार जगाला दिसावा, एवढीच आम्हा खेलकूदवाल्यांची माफक मागणी असेल.


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४