उल्हासनगर पोलीस ठाण्यातर्फे समाजप्रबोधन करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव

14 Sep 2025 20:06:29

उल्हासनगर, पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सव २०२५ मध्ये उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेश उत्सवादरम्यान ५५ सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यापैकी सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवणारे, जनजागृती करणारे आणि शिस्तबद्ध मंडळांची निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये मेघराज लुंड, साबीर शेख आणि रमेश केदार यांचा समावेश होता.

या समितीच्या निर्णयानुसार, 'मानव मित्र मंडळ' (महात्मा फुले चौक, शिवरोड) या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. 'श्री बालाजी मित्र मंडळ' (हरमन मेहता गेट) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तर 'स्टार फ्रेंड्स सर्कल' (खेमानी) या मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. 'आदर्श क्लब गणेश मित्र मंडळ' (बिर्ला गेट) या मंडळाला उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या सर्व मंडळांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी १५ ते २० मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात पोलिसांनी सर्व मंडळांना आगामी उत्सवांमध्ये डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याचे आवाहन केले. तसेच, इतर मंडळांनाही समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस दलाचे आभार मानले आणि समाजात शांतता व एकोपा टिकवून ठेवण्याचा संदेश दिला.- उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश उत्सव २०२५ मध्ये उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.


Powered By Sangraha 9.0