सरकारी नोकरीसाठी घेतली जाणाऱ्या परिक्षेत नियोजनाचा अभाव; सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परिक्षार्थींची स्टाफ सिलेक्शन परिक्षा हुकली

14 Sep 2025 15:57:10

कल्याण : सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेत परिक्षा घेणाऱ्या केंद्रांकडून नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे परिक्षार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुरेखा इन्फोटेक या परिक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प झाल्याने १७८ परिक्षार्थींना स्टाफ सिलेक्शन कमिनशनची ऑनलाईन परिक्षा देता आली नाही. त्यामुळे या केंद्रावर जवळपास तीन तास गोंधळ सुरु होता. त्याठिकाणी पाेलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

कल्याण डोंबिवलीतील ४९० पदांसाठी ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान राज्यातील १४ जिल्ह्यात २५ केंद्रावर परिक्षा आयोजित केली होती. ९ सप्टेंबरला काही परिक्षार्थींकरीता मुंबईतील पवई येथे परिक्षा केंद्र देण्यात आले होते. जवळपास १५० पेक्षा जास्त परिक्षार्थी वाहतूक काेंडीमुळे परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचू शकले नाही. काही विद्यार्थी केवळ एका सेकंदासाठी उशिरा पोहचले तरी त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे १५० पेक्षा जास्त परिक्षार्थींची परिक्षा हुकली आहे. त्यांनी त्यांना परिक्षेची देण्याची पुन्हा एक संधी द्यावी अशी मागणी परिक्षार्थींनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात महापालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे परिक्षार्थी दररोज महापालिका मुख्यालयासमाेर येऊन उभे राहतात. डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक या परिक्षा केंद्रावर स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑनलाईन परिक्षा होती. शुक्रवारी दुपारी परिक्षा होती. या केंद्रावर तीन सत्रात परिक्षा सुरु आहे. शुक्रवारी परिक्षेच्या दुसऱ्या सत्रात गोंधळ झाला. परिक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्याने ही परिक्षा १७८ परिक्षार्थींना देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती होती. आत्ता ही परिक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले जात आहे. ती कधी घेतली जाईल या विषयी सुस्पष्टता नाही. या परिक्षेसाठी देशातील अनेक राज्यातून परिक्षार्थी आले होते. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.


Powered By Sangraha 9.0