
प्राचीन भारतीय ऋषींनी विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी सूक्ष्म विचार करून, संशोधनांती प्रचंड ज्ञानाचा साठा मानवजातीसाठी ठेवला आहे. भारतीयांच्या प्रगतीमध्ये वैद्यकशास्त्राचाही समावेश होतो. प्राचीन भारतीय ऋषींनी वैद्यकशास्त्रामध्येही मोठीच प्रगती केली होती. वैद्यकशास्त्रात भर घालणाऱ्या ऋषींचा घेतलेला आढावा...’कोविड’ टप्प्यातील सर्वांत कठीण दोन वर्षांत आपण, आयुर्वेदिक औषधाचे मूल्य शिकलो. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे परंतु, आपण समाज आणि राष्ट्र निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे लक्ष दिलेले नाही. एका अहवालानुसार, भारताचा आयुर्वेदिक उत्पादन उद्योग आर्थिक वर्ष २०२८ सालापर्यंत १६.२७ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या तो सात अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा ५७ हजार, ४५० कोटी रुपये इतका आहे. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत नैसर्गिक आणि हर्बल औषधांची वाढती मागणी, आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये वाढ, सरकारी प्रयत्न आणि नवीन व्यवसायांचा उदय यामुळे आयुर्वेद उत्पादन बाजारपेठ लक्षणीयरित्या वाढली आहे. वैदिक ऋषींच्या मालिकेच्या या भागात, आपण विविध आयुर्वेदिक आणि योग संशोधनाद्वारे निरोगी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या ऋषी सुश्रुत, ऋषी चरक आणि महर्षी पतंजली या खर्या शास्त्रज्ञांकडे पाहूया. जग निरोगी होण्यासाठी, आपण त्यांच्या संशोधनांवर व्यापक संशोधन केले पाहिजे आणि ते जागतिक स्तरावर लागू केले पाहिजेत.
सुश्रुत : शस्त्रक्रियेचे जनकशस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाणारे सुश्रुत यांचा जन्म, इ.स. पूर्व पहिल्या शतकात काशी (सध्याचे वाराणसी) येथे झाला. त्यांनी आयुर्वेदाचे ऋषी धन्वंतरी यांच्याकडून शिक्षण घेतले आणि आयुर्वेदाच्या शस्त्रक्रियेत अनन्यसाधारण योगदान दिले. त्यांचा प्रमुख ग्रंथ ‘सुश्रुत संहिता’ याला आजही जागतिक वैद्यकीय विज्ञान आणि शस्त्रक्रियांमध्ये एक विशेष आहे. यामध्ये शस्त्रक्रियेच्या विविध पद्धतींचा तपशीलवार अभ्यास केला आहे.
सुश्रुत संहिता हा वैद्यकीय शास्त्राचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो, ज्यामध्ये शस्त्रक्रियेसह शरीरशास्त्र, शारीरिक उपचार, बालरोग, स्त्रीरोग आणि संसर्गजन्य रोगांबद्दल माहिती देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेची गुंतागुंत पाहून, सुश्रुतांनी सुमारे १२५ प्रकारच्या शस्त्रक्रिया उपकरणांचा शोध लावला. यामध्ये विविध प्रकारचे चाकू, सुया आणि संदंश यांचा समावेश आहे.
आचार्य सुश्रुतांनी ३०० प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रक्रिया विकसित केल्या. त्यांच्या विकसित प्रक्रियांमध्ये केवळ साध्या शस्त्रक्रियाच नव्हे, तर जटिल शस्त्रक्रियांचाही उल्लेख आहे. सुश्रुत यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या पद्धतीचे सविस्तर वर्णन केले आहे. याशिवाय, त्यांना सिझेरियन प्रसूतीचेही सखोल ज्ञान होते, जे त्या काळातील वैद्यकीय शास्त्रात एक क्रांतिकारी कामगिरी होती. सुश्रुत यांना तुटलेली हाडे ओळखण्यात आणि जोडण्यात विशेष कौशल्य होते. यासोबतच, त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान वेदना कमी करण्यासाठी भूल देण्याची पद्धतही विकसित केली. ते शस्त्रक्रियेच्या रुग्णाला विशेष औषधे देत असत, जी भूल देण्याचे काम करत. म्हणूनच, त्यांना ‘भूल देण्याचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. ते आधुनिक प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीचे जनकदेखील होते. त्यांनी शस्त्रक्रियेत अद्भुत कौशल्ये आत्मसात केली, ज्यामध्ये शरीराच्या इतर अवयवांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी यांसारख्या पद्धतींचा समावेश होता. त्यांच्या काळात हे विज्ञान अत्यंत विकसित आणि प्रभावी होते. सुश्रुतांनी त्याचा व्यापक प्रसार केला.
आठव्या शतकात ‘सुश्रुत संहिते’चा अरबी अनुवाद ‘किताब-ए-सुश्रुत’ म्हणून प्रकाशित झाला. यामुळे हे पुस्तक अरब आणि पाश्चात्य वैद्यकशास्त्रातही लोकप्रिय झाले. सुश्रुतांचे ज्ञान सीमा ओलांडून जागतिक वैद्यकीय समुदायापर्यंत पोहोचले, ज्यामुळे त्यांना वैद्यकीय पातळीवर मान्यता मिळाली.
ऋषी चरक : आधुनिक आयुर्वेद औषधाचे जनकमहर्षी चरक यांना आधुनिक आयुर्वेद औषधाचे जनक मानले जाते. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की, प्राचीन भारतीय विज्ञान व्यवस्थेतील वैद्यकीय पद्धती अतिशय आधुनिक आणि प्रगत होत्या. चरक हे कुषाण राज्यातील राजवैद्य होते आणि त्यांनी वैद्यकीय शास्त्राला एक नवीन दिशा दिली. ‘चरक संहिता’ हा आज आयुर्वेदावरील एक अद्वितीय ग्रंथ मानला जातो. यामध्ये त्यांनी उपचारात्मक आणि रोगप्रतिबंधक औषधांचे तपशीलवार वर्णन केले आहे. ‘चरक संहिता’ हा विविध ऋषींनी वेळोवेळी संकलित केलेला आयुर्वेदावरील एक महान ग्रंथ आहे. महर्षी चरकांनीही त्यात योगदान दिले. ‘चरक संहिता’ हा केवळ वैद्यकीय ग्रंथ नाही, तर तो भारतीय तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राच्या विविध तत्त्वांवरदेखील प्रकाश टाकतो. या ग्रंथात सोने, चांदी, पारा आणि इतर धातूंची राख आणि त्यांच्या वैद्यकीय वापराचा उल्लेख आहे. महर्षी चरक यांनी आचार्य अग्निवेश रचित अग्निवेशतंत्रात सुधारणा आणि विस्तार केला आणि त्याला एक नवीन रूप दिले, जे आज आपण ‘चरक संहिता’ म्हणून ओळखतो. शारीरिक आणि मानसिक आजारांच्या उपचारांसोबतच, निरोगी जीवनशैलीची तत्त्वेदेखील या ग्रंथात वर्णन केली आहेत.
ऋषी चरक यांचा असा विश्वास होता की, कोणत्याही वैद्याला शरीरातील सर्व घटक, ज्यामध्ये पर्यावरणाचा समावेश आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचा असा विश्वास होता की, वातावरणाचा रोग आणि रुग्ण दोघांवरही खोलवर परिणाम होतो. म्हणून, रुग्णावर उपचार करण्यापूर्वी त्याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. रोगावर उपचार करण्यापेक्षा तो रोखणे अधिक महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
ऋषी चरक यांनी वैद्यकीय शास्त्रात रोग निदानाची एक अनोखी पद्धत विकसित केली. चरक म्हणाले की, "डॉटरांनी त्यांच्या ज्ञानाद्वारे रुग्णाच्या शरीरात प्रवेश केला पाहिजे, जेणेकरून ते रोगाचे योग्य निदान करू शकतील. जोपर्यंत शरीराचे संपूर्ण निदान होत नाही, तोपर्यंत रोगाचा यशस्वी उपचार शय नाही.” ‘चरक संहिते’मध्ये या कल्पनेचे तपशीलवार वर्णन केले आहे, जिथे त्यांनी औषधाच्या या गूढ तत्त्वाचे स्पष्टीकरणही दिले आहे.
महर्षी पतंजली : योग आणि संस्कृत व्याकरणाचे जनकमहर्षी पतंजली हे प्राचीन भारतातील महान ऋषींपैकी एक होते, ज्यांना योग आणि संस्कृत व्याकरणाचे जनक मानले जाते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि प्रगल्भ ज्ञानाचा प्रभाव आज जगभरात जाणवतो. पतंजलीने योगाद्वारे नामशुद्धी आणि मानसिक संतुलन साधण्याची पद्धतच मांडली नाही, तर त्यांनी संस्कृत व्याकरणाचा मुख्य आधार असलेल्या महाभाष्य या संस्कृत ग्रंथाचीही रचना केली.
महर्षी पतंजली यांचे सर्वांत प्रसिद्ध ग्रंथ ‘योगसूत्र’ आहे, ज्यामध्ये त्यांनी योगाचे वर्णन मन आणि शरीराच्या संयोजनाचे विज्ञान म्हणून केले आहे. ‘योगसूत्र’ चार अध्यायांमध्ये विभागले आहे.
१. समाधी पद : ते समाधीची स्थिती आणि मानसिक शांती मिळविण्याच्या पद्धती सांगते.
२. साधना पद : यात योगाच्या आठ अंगांचे म्हणजेच अष्टांगयोगाचे विस्ताराने वर्णन केले आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणून ओळखले जातात.
३. विभूती पद : यात योगसाधनेतून मिळणार्या शक्तींचे वर्णन केले आहे.
४. कैवल्य पद : ही आत्म्याच्या शुद्धतेची आणि देवाशी एकरूपतेची पायरी आहे.
पतंजलीने योगाचे वर्णन केवळ शारीरिक व्यायाम म्हणून केले नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे साधनदेखील त्याला मानले आहे. त्यांच्या मते, योगसाधनेद्वारे, व्यक्तीला त्याची निर्भय शक्ती आणि आंतरिक शांती अनुभवता येते आणि तो त्याला आत्म-साक्षात्काराकडे घेऊन जाऊ शकतो.
पाणिनीच्या प्रसिद्ध संस्कृतच्या व्याकरणावर, महर्षी पतंजली यांनी ‘महाभाष्य’ नावाचे एक विस्तृत भाष्य लिहिले आहे. त्यामध्ये व्याकरणाच्या नियमांची सखोल व्याख्या केली असून, त्यामुळे संस्कृत भाषेची रचना सुलभ होते. हे महाभाष्य आजही संस्कृत व्याकरणाचे विद्यार्थी आणि विद्वान अभ्यासतात. हे महाभाष्य संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी एक अमूल्य संसाधन आहे.
महर्षी पतंजली हे वैद्यकशास्त्र तसेच योग आणि व्याकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात. ते योगाला शरीर आणि मनाचे संतुलन राखण्याचे एक महत्त्वाचे साधन मानत होते. त्यांच्या शिकवणी आजच्या वैद्यकीय पद्धतींमध्येही उपयुक्त ठरल्या आहेत. योगाद्वारे केवळ मानसिक ताण आणि आजार दूर करता येत नाहीत, तर शरीर निरोगी आणि दीर्घायुषी ठेवण्याच्या पद्धतीदेखील ते सांगतात. आपल्या तरुणांसाठी आपल्या महान ऋषींनी दिलेल्या सखोल ज्ञानाचा अभ्यास, विश्लेषण आणि अन्वेषण करण्याचा हा योग्य क्षण आहे. जगाने योग आणि आयुर्वेदाची शक्ती मान्य केली आहे. आरोग्यदायी व सुंदर जगासाठी त्या क्षेत्रांना बळकट करण्यासाठी आपण काम करूया
.
पंकज जयस्वाल
७८७५२१२१६१