उद्धव ठाकरेंकडून अस्लम शेख यांना उपमुख्यमंत्रीपदाचा शब्द - मंत्री नितेश राणे

13 Sep 2025 18:37:49

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कालावधीत ५ वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते, तर महाराष्ट्राला पहिला मुस्लिम उपमुख्यमंत्री मिळाला असता. उद्धव ठाकरेंनी अस्लम शेख यांना तसा शब्द दिला होता, अशी टीका मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी केली.

वरळी कोळीवाडा येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “तू माझ्या मुलाला दिशा सालियान प्रकरणातून वाचव, मी तुला उपमुख्यमंत्री बनवतो, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी अस्लम शेख यांना दिला होता. तेव्हा तुम्हाला पाकिस्तान आठवले नाही का? अस्लम शेखने मालवणीला मिनी पाकिस्तान बनवून ठेवला आहे. आता, हे भारत-पाक मॅचबद्दल बोलतात. त्यामुळे आम्हाला या जिहादी हृदय सम्राटकडून राष्ट्रभक्तीच्या सर्टिफिकेटची गरज नाही.”

“६ हजार मतांनी निवडून येणे म्हणजे बालेकिल्ला असेल तर बालेकिल्ल्याची व्याख्या बदलली पाहिजे. वरळी मतदारसंघातील आताचे आमदार राजकीय व्हेंटिलेटवर आहेत. आम्ही २०२९ मध्ये इथे काय करायचे ते करू. अडीच वर्षे येथील आमदारांचे वडील मुख्यमंत्री होते आणि ते स्वत: मंत्री होते, तरी या मतदारसंघाची अवस्था बघा. कोळीवाड्याकडे जात असताना मोटरबाईकवर इकडे जावे लागते. किती मोठा बालेकिल्ला आहे हा? ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत,” असेही ते म्हणाले.

तेव्हा हिंदू समाज आठवला नाही का?

“ऑपरेशन सिंदूर सुरु असताना उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसले होते. तेव्हा तुम्हाला हिंदू समाज आठवला नाही का? हिंदू समाजाचे कुंकू पुसले जात होते तेव्हा लंडनवरुन परत यावे असे का वाटले नाही? आमच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. उद्धव ठाकरेंकडे महापालिका देणे म्हणजे पुढचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणे आहे,” अशी टीकाही मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.


Powered By Sangraha 9.0