
मुंबई : बांगलादेशच्या ढाका विद्यापीठाच्या यंदाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीत जमात-ए-इस्लामी बांगलादेशची विद्यार्थी शाखा इस्लामी छात्र शिबिर संघटनेने विजय मिळवला. उपाध्यक्ष, महासचिव आणि सहाय्यक महासचिवांसह सर्व पदांवर मोठ्या बहुमताने संघटनेने विजय मिळवला आहे. मात्र कट्टरपंथी विचारसरणी असलेल्या संघटनेचा कट्टरपंथीपणा उघडपणे निवडणुकीच्या निकालादरम्यान दिसून आला. यावेळी हिजाबच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली असून त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्येही हिजाब अनिवार्य करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
ढाका विद्यापीठात एकूण ४८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. विद्यापीठात शिबिरचा असा विजय काही वर्षांपूर्वी अकल्पनीय मानला जात होता, पण त्यांनी ते शक्य करून दाखवले. दुसरीकडे बीएनपीच्या विद्यार्थी संघाला पराभव पत्करावा लागला. शेख हसीना यांच्या आवामी लीगवर बंदी आल्यानंतर बीएनपी सत्तेच्या अगदी जवळ आहे असे मानले जात होते, पण त्यांना मोठा धक्का बसला.
विद्यार्थी संघ निवडणुकीच्या निकालानंतर एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला ज्यामध्ये सबीकुन नाहर तमन्नाच्या समर्थनात 'हिजाब हिजाब' असे नारे लगावण्यात आले. सबीकुन ही हिजाबधारी विद्यार्थीनी असून बांगलादेश इस्लामी छात्री संघटनेची अध्यक्षा आहे. ही संघटना विशेषतः मुलींसाठी कार्यरत असलेली एकमेव राजकीय संघटना आहे.
सदर घोषणा जरी इतर मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडण्याशी संबंधित नसली तरी, बांगलादेशची सद्यस्थिती पाहता ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा एखादी विजयी मुलगी हिजाब-नकाबमध्ये असेल, तेव्हा इतर मुलींवर नैसर्गिक दबाव पडतो. लोकांची अपेक्षा वाढते की बाकी मुलीही त्याच मार्गावर चालतील. त्यामुळे हा नारा सक्तीचा नसला तरी हिजाब न घालणाऱ्या किंवा हिजाबचा विरोध करणाऱ्या मुलींसाठी तो घातक ठरू शकतो, यात शंका नाही.