मुंबई : "राष्ट्रीय जीवनात जसे राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व आहे, तसेच धार्मिक जीवनात श्रद्धेच्या प्रतीकांचे महत्त्व आहे. अयोध्या, काशी, मथुरा यांसारख्या धर्मस्थळांची पुनर्प्रतिष्ठा हा सनातन धर्माचा संकल्प आहे", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. श्री अयोध्या धाम येथे पूज्य स्वामी हर्याचार्यजी महाराज यांच्या १७व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, प्रत्येक सनातनीने हा प्रण करावा की आपण जर आपल्या धार्मिक प्रतीकांचा सन्मान करतो, तर आपण तिरंगा आणि संविधान यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचाही सन्मान केला पाहिजे. आपल्या सैनिकांप्रती असलेली श्रद्धा हीच खरी सनातनीची ओळख आहे. सनातन धर्मावलंबींनी जीवनातील रहस्यांचा गाभा समजून घेतला आहे. आपण मोक्षाला सर्वोच्च ध्येय मानले. हेच संन्याशांचे आणि योगींचे लक्षण आहे की ते आपल्या व्यक्तिगत मोक्षासाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्य करतात.
अयोध्या आंदोलनातील संतांच्या योगदानाबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्या आंदोलनात संतांचा मोठा सहभाग होता. ज्यांनी आपले जीवन, आरोग्य आणि सुख यांची पर्वा न करता 'रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे' हे एकच ध्येय केले. त्याच संतांच्या साधना आणि तपश्चर्येचे हे फळ आहे की आज अयोध्येत भव्य राममंदिर उभारले गेले आहे. पुढे म्हणाले की, पूज्य स्वामी हर्याचार्यजी महाराजांचे सान्निध्य त्यांना अनेक वेळा लाभले. त्यांच्यात श्रीराम जन्मभूमीबद्दल एक अदम्य जिद्द होती आणि सनातन धर्माच्या एकतेसाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.