PM Modi in Manipur LIVE: केंद्र सरकार मणिपूरच्या विकासासाठी वचन बद्ध !: पंतप्रधान मोदी

13 Sep 2025 15:53:35

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी मणिपूर दौऱ्यावर असून, २०२३ च्या मे महिन्यात मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विस्थापित व्यक्तींच्या कुटुंबांच्या समस्या समजून घेतल्या आणि राज्यात शांतता आणि समरसता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्राच्या वचनबद्धतेचे आश्वासन देखील दिले.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. मात्र काही कारणाने या सुंदर प्रदेशात हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण आता तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शांतता स्वीकारणं हा एकमेव मार्ग आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ₹७,३०० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये ३,६४७ कोटी रुपयातून साकारण्यात येणारे मणिपूर शहरी रस्ते, ड्रेनेज आणि मालमत्ता व्यवस्थापन सुधारणा उपक्रम आणि ₹५५० कोटी किंमतीचे मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंट (MIND) प्रकल्प यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

शिवाय, त्यांनी ₹१४२ कोटी किंमतीच्या नऊ महिला वसतिगृहांची आणि १०५ कोटी रुपयांच्या सुपर-स्पेशालिटी आणि आरोग्य सेवा सुविधांची, सोबतच १०२ कोटी रुपयांच्या ग्रामीण संपर्क, शिक्षण आणि पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.

यापूर्वी पंतप्रधान मोदी मिझोरम दौऱ्यावर होते, परंतू प्रतिकूल हवामानामुळे मोदींचा मिझोरममधील दौरा प्रभावित झाला होता. मुसळधार पावसामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या लम्मुअल मैदानावर पंतप्रधान मोदी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फर्न्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने त्यांनी ऐझॉलजवळील लेंगपुई विमानतळावरून एका सार्वजनिक सभेला संबोधित केले, सोबतच मिझोरममधील ९,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले.

व्हिडिओ कॉन्फर्न्समध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि, केंद्राच्या 'अ‍ॅक्ट ईस्ट' धोरणात मिझोरमने महत्वाची भूमिका बजावली आहे तसेच 'कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट' प्रकल्प आणि रेल्वे मार्ग राज्याला आग्नेय आशियाशी जोडणे आदी प्रकल्पांना यामध्ये विशेष महत्व आहे.


Powered By Sangraha 9.0