‘इन्स्पेटर झेंडे’ : ८०-९०च्या दशकातला सस्पेन्स-थ्रीलर

    13-Sep-2025
Total Views |

‘इन्स्पेटर झेंडे!’ ८०-९०च्या दशकात हे नाव प्रचंड चर्चेत होतं. कोण होते इन्स्पेटर झेंडे? अर्थातच इन्स्पेटर मधुकर झेंडे, ज्यांच्या कर्तृत्वाची चर्चा त्याकाळी देशभरासह अगदी जगभरातही झाली आणि यावरच आधारित ‘इन्स्पेटर झेंडे’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मोठ्या पडद्यावर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिस’वर हा चित्रपट पाहता येईल. मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांचा हा चित्रपट असून; बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, बरेच मराठमोळे चेहरे या हिंदी सिनेमात झळकले आहेत. अशा या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाविषयी...

१९८६ साली चार्ल्स शोभराज या ‘सीरियल किलर’ची भलतीच दहशत मुंबईसह अन्य शहरांमध्येही पसरली होती. खून, दरोडे यांसारखे गुन्हे तर तो अगदी सराईतपणे करायचा. केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये त्याने आपल्या गुन्ह्यांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. चार्ल्स शोभराज अर्थातच सिनेमातला कार्ल भोजराज (नावात बदल केलेला आहे). तिहार जेलमधून त्याने पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करून पळ काढला होता. मग निरनिराळ्या ठिकाणी स्वतःला लपवण्यासाठी त्याने विविध उद्योग केले. चार्ल्सची आई व्हिएतनामची; वडील भारतीय सिंधी, तर त्याचा जन्म फ्रान्सचा. त्यामुळे तिन्ही देशांशी त्याचे संबंध होते.

कार्ल दिसायलाही गोरागोमटा परदेशी. भारतातच नाही, तर अनेक देशांमंध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल होते. सराईतरित्या खून करणे, तस्करी करणे या गोष्टींमध्ये तो पारंगत होता. अगदी लहान वयातच गंभीर गुन्ह्यांना तो सरावला होता. कार्लला ‘बिकिनी किलर’, ‘स्प्लिटिंग किलर’ अशी बरीच नावंही होती. तो परदेशी पर्यटकांना लक्ष्य करून ठार मारायचा. पोलिसांच्या डोळ्यांत सहज धूळ फेकायचा. निरनिराळी नावं बदलून, अनेक खोटे पासपोर्ट बनवून त्याने अनेक देशांत वास्तव्य केलं. अशा या खूंखार गुन्हेगाराला गजाआड करण्याचं आव्हान होतं ते इन्स्पेटर झेंडेंवर!

या चित्रपटात मनोज बाजपेयी पोलीस अधिकारी अर्थात इन्स्पेटर झेंडेंच्या भूमिकेत शोभून दिसतात. गुन्हेगार कितीही धूर्त असला, तरीही एक चाणाक्ष पोलीस ऑफिसर त्याला नक्कीच शोधून काढतो. तसं कार्लला शोधणं सोपं नव्हतं. फक्त शोधणंच नाही, तर त्याला बेड्या ठोकून शिक्षा देणंही कठीणच. मात्र, इन्स्पेटर झेंडेंनी ते करून दाखवलं. कोण होते हे इन्स्पेटर झेंडें? हेच या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. त्यांच्या या कामाची दखल त्याकाळी जगभरात घेतली गेली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीदेखील त्यांचा गौरव केला होता, तर स्वतः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी झेंडे यांचा ऑटोग्राफ मागितला होता.

चित्रपटात मनोज बाजपेयींसह बरेच मराठी कलाकारही दिसतात. जसे की, भाऊ कदम, गिरिजा ओक, ओंकार राऊत, सचिन खेडेकर, वैभव मांगले, तर मुख्य आरोपी कार्लच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता जिम सार्भ आहे. मनोज बाजपेयी पोलीस अधिकारी अर्थात इन्स्पेटर झेंडेंच्या भूमिकेत आहे. अतिशय हुशार आणि मुंबई पोलिसांची शान राखण्यासाठी, त्या खुन्याला पकडण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा दिसून येते. नेहमीप्रमाणे मनोज बाजपेयींची संवादफेक आणि टायमिंग प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. कार्ल भोजराजची भूमिका अभिनेता जिम सार्भने लीलया साकारली आहे. अन्य कलाकारांनीदेखील आपापल्या भूमिका उत्तमरित्या वठविल्या आहेत. गिरिजा ओक, हरिष दुधाडे, सचिन खेडेकर यांच्या भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पडल्याशिवाय राहणार नाही.

भाऊ कदम विशेषतः पुन्हा एकदा कॉमेडी हवालदाराच्या भूमिकेत भाव खाऊन गेले. पण, भाऊ कदम यांना पाहताना ही भूमिका काहीशी अपुरी वाटते. भाऊ कदमसारख्या ताकदीच्या अभिनेत्याला चित्रपटात आणखीन ‘स्क्रिन टाईम’ मिळायला हवा होता, असे वाटते.एकूणच आणखीन रंजक संवाद आणि हास्यफवार्‍यांनी या व्यक्तिरेखेत नक्कीच रंगत आणता आली असती. तसेच अभिनेता जिम सार्भदेखील उत्तम अभिनेता आहेच. पण, मुख्य पात्र असलेल्या कार्लच्या व्यक्तिमत्त्वातील गहिरी बाजू आणखीन खोलात जाऊन मांडता आली असती. असे असले तरी बाजपेयींच्या भूमिकेतील इन्स्पेक्टर झेंडे हे चित्रपटाचे खरे नायक तर आहेतच, तर कार्ल पक्का खलनायकही शोभून दिसतोच.

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाला पूरपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा फार क्लिष्ट, गुंतागुतींची न करता अगदी साधी सरळ मांडली आहे. मुंबईतील जुने रस्ते, वस्त्या, माणसं, त्यांचं राहणीमान, पोलीस स्थानक आणि त्या काळातील स्थानिक जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील थरार आणि सस्पेन्सही वाढतो. एकूणच चित्रपटाची कथा उत्तमरित्या हाताळली आहे. ओटीटीवरील चित्रपट असूनही विनाकारण कोणतेही प्रणय प्रसंग अथवा शिवीगाळ यांचा समावेश नाही, हेही तितकंच महत्त्वाचं. गरज नसताना कोणतीही अधिकची दृश्य आणि संवादही खेचलेले नाही. त्यासाठी लेखकांचं कौतुक व्हायलाच हवं. असा हा चित्रपट कुठेहीरेंगाळत नाही. त्यामुळे अगदी ओटीटीवरही हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना तो अजिबात कंटाळवाणा, रटाळ वाटणार नाही. चित्रपटात फार गाणी किंवा एखादं आयटम साँगही नाही. पण, त्याची उणीव अजिबातच भासत नाही.

त्यामुळे ‘इन्स्पेटर झेंडे’ प्रेक्षकांचं १०० टक्के मनोरंजन नक्कीच करतो. त्यात सस्पेन्स, थ्रील आणि कॉमेडीचा तडका आहेच. ओटीटीवर असला, तरी हा सिनेमा कुटुंबाबरोबरही तुम्ही नक्कीच पाहू शकता. चित्रपटाच्या शेवटी खर्‍याखुर्‍या इन्स्पेटर झेंडेंनादेखील पाहायला मिळतं. त्यामुळे ओटीटीवर या आठवड्यात काही उत्तम पाहायचं असेल, तर ‘नेटफ्लिस’वर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहू शकता.

दिग्दर्शकाचे नाव : चिन्मय मांडलेकर
निर्माते : ओम राऊत, जय शेवकरमानी
कलाकार : मनोज बाजपेयी, भाऊ कदम, गिरीजा ओक, ओंकार राऊत, सचिन खेडेकर, वैभव मांगले, जिम सार्भ,
संगीत : संकेत साने
पटकथा लेखक : चिन्मय मांडलेक

- अपर्णा कड