नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे ७ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचा भूमिपूजन व शुभारंभ केला. या वेळी त्यांनी मणिपूरच्या जनतेच्या धैर्यशीलतेचे कौतुक केले आणि राज्याला आशा व आकांक्षांची भूमी असे संबोधले. मोदी म्हणाले की, मणिपूर ही संस्कृती, परंपरा, विविधता आणि रंगत यांचा अद्वितीय संगम असून ती भारताच्या एकात्मतेची मोठी ताकद आहे. मणिपूर या नावातच ‘मणि’ म्हणजे रत्न आहे. हे रत्न ईशान्य भारताच्या तेजात भर घालणार आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, जवळपास ७,००० कोटी रुपयांचे नवे प्रकल्प सुरू झाले असून त्यातून विशेषतः डोंगराळ भागातील जनजाती समाजाच्या जीवनमानात सुधारणा होईल. या प्रकल्पांतून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. चुराचांदपूरमध्ये स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत डोंगराळ भागात एकही वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. आज ही कमतरता भरून निघत आहे.
मणिपूर हा सीमावर्ती राज्य असल्याने वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी नेहमीच आव्हानात्मक ठरल्याचे सांगून मोदींनी केंद्र सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांत ३,७०० कोटी रुपयांचा खर्च राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात आला असून ८,७०० कोटी रुपयांचे नवे महामार्ग प्रकल्प जलद गतीने सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, २२,००० कोटी रुपयांच्या खर्चाने जिरीबाम–इंफाळ रेल्वेमार्ग प्रकल्प राबवला जात असून लवकरच इंफाळ राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. ४०० कोटी रुपयांचा खर्च करून बांधलेले नवे इंफाळ विमानतळ आणि सुरू केलेल्या हेलिकॉप्टर सेवा या राज्याच्या हवाई वाहतुकीस नवे बळ देत आहेत.
पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत राज्यातील जवळपास ६० हजार कुटुंबांना घरे मिळाली आहेत. एक लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत वीजजोडणी देण्यात आली असून ‘हर घर नळ से जल’ योजनेअंतर्गत ३.५ लाखांहून अधिक घरांपर्यंत नळपाणी पोहोचले आहे. त्यांनी ‘पीएम-डिव्हाईन’ योजनेतून पाच डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवा उभारली जात असल्याचे सांगितले. ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळत असून मणिपूरमधील सुमारे २.५ लाख रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबांचे जवळपास ३५० कोटी रुपये खर्च वाचले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनजाती समाजाच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख केला. ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत मणिपूरमधील ५०० हून अधिक गावांमध्ये विकासकामे सुरू आहेत. राज्यात १८ एकलव्य मॉडेल निवासी शाळांची उभारणी होत असून महिलांसाठी वर्किंग वुमन्स हॉस्टेलची उभारणी केली जात आहे. “जनजाती समाजाचा विकास हा राष्ट्रीय प्राधान्यक्रम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरची संस्कृती ही महिला सक्षमीकरणाची परंपरा जपणारी असल्याचे सांगून मोदींनी केंद्र सरकार महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे अधोरेखित केले.
संवाद महत्त्वाचा“शांततेशिवाय विकास शक्य नाही. ईशान्येत गेल्या ११ वर्षांत अनेक संघर्ष संपुष्टात आले आहेत,” असे सांगून पंतप्रधान मोदींनी शांततेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. त्यांनी नुकत्याच झालेल्या विविध गटांशी संवादाचा उल्लेख करत संवाद, आदर आणि परस्पर समजुतीवर केंद्र सरकार भर देत असल्याचे अधोरेखित केले. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्तांसाठी ७,००० नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुमारे ३,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज आणि विस्थापितांसाठी ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मणिपूरला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक बनवणे हे आमचे ध्येय आहे. मणिपूरच्या विकासासाठी, विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी आणि शांततेसाठी केंद्र सरकार नेहमीच राज्य सरकारसोबत खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.