Dashavatar Review : ८१ वर्षीय दिलीप प्रभावळकरांची जादू, ‘दशावतार’

13 Sep 2025 18:54:16


गेले अनेक दिवस मल्टीस्टारर ‘दशावतार’ या सिनेमाची बरीच चर्चा होती. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. आणि अखेर आता १२ सप्टेंबरला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी दाक्षिणात्य चित्रपटांशी तुलना केली होती. अर्थातच त्या धाटणीची कथा आणि काही साम्य यामुंळे अशा प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे. कलाकारांची मोठी फौज देखील या सिनेमात असल्याने प्रेक्षकांना फारच उत्सुकता होती. पण आता सिनेमा नेमका कसा आहे. पाहूयात,

कथा आणि चित्रपट

कोकणातील घनदाट जंगलात रात्रीच्या अंधारात काजव्यांचा लखलखाट होत असतो. गर्द झाडीत रात्रीच्या अधांरात पहिलं दृश्य दिसतं ते कातोळबाचं. कातोळबा अर्थातच कातळ शिल्प. कोकणातलं एक साधं निसर्गरम्य गाव, गावातली साधी माणसं आणि त्यापैकीच एक बाबुली मेस्त्री. प्रसिद्ध दशावतारी कलाकार, अत्यंत साधा, भाबडा, गरीब पण मनाने आणि कलेने अत्यंत श्रीमंत. त्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे माधव (अभिनेता सिद्धार्थ मेनन). घरात दोघेच एकमेकांचा आधार, तर साध्या माधवच्या प्रेमात पडलेली वंदू (प्रियदर्शिनी इंदलकर). अशी एकूनच कथेला सुरुवात होते. बाबुलीचं आता वय झालं आहे. त्याला धुकट दिसतं, अशक्तपणा आहे. आणि त्यामुळेच लेक माधवला त्याची फार काळजी वाटते. त्याने दशावतारातून निवृत्त व्हावं अशी त्याची इच्छा पण कलासक्त, कलाप्रेमी बाबुलीला ते मान्य नाही. पण लेकाच्या आग्रहाखातर ‘तुला नोकरी लागली की मी हे सगळं सोडेन’ असं वचन तो देतो. आणि या महाशिवरात्रीला शेवटचा दशावतार करुन माझा नवस पूर्ण करतो. अशी ग्वाही बाबुली देतो.

शेवटच्या दशावताराचा दिवस उजाडतो पण हा दिवस बाबुलीच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येतो. आणि संपूर्ण कथेला वेगळं वळण मिळायला सुरुवात होते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन वेगळ्या कथा सिनेमात दिसतात. आता हा बाबुलीच्या आयुष्यातला नेमका ट्वीस्ट काय आहे यासाठी सिनेमा पाहावा लागेल. पुढे कथेत आणखी पात्र वाढतात, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, भरत जाधव असे बरेच कलाकार हे मध्यंतरानंतर कथेत सामील होतात. गाव, गावातलं जंगल, कातोळबा, राखणदार आणि गावातील लोकांची त्यावर असणारी नितांत श्रद्धा अशा बऱ्याच छटा कथेत दिसून येतात. याशिवाय निरनिराळे अवतार जे दशावतारांपैकी आहेत ते देखील दिसतात.

दिग्दर्शन

दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कथा दोन भांगामध्ये विखुरलेली आहे. सुरुवातीचं बाप-लेकाचं, प्रियकर-प्रेयसीचं गोड नातं, आणि दुसऱ्या भागात कथेनं घेतलेलं अतिशय वेगळं रुप पाहायला मिळतं. दिग्दर्शकाने उत्तम प्रयत्न केला असला तरी, कथेची योग्य सांगड घालण्यात दिग्दर्शकाची बरीच तारांबळ उडाली आहे. दुसऱ्या भागातील बरेच सीन मनाला पटत नाहीत. असं असलं तरीही सिनेमा प्रेक्षकांना खूपच भावनिक करुन जातो. नकळत प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पान्हावतात. याशिवाय बाबुलीची दशावतारातली बरीच रुपं पाहायला मिळतात, सुंदर कथा पण त्याला दशावताराची गुंफण मजबूत बसलेली नाही. सिनेमात अजिबातच सस्पेन्स वाढत नाही. अगदी साहजिक घटना घडताना दिसतात. दाक्षिणात्य सिनेमाशी तुलना नाही होऊ शकत पण मराठीतला उत्तम प्रयत्न नक्कीच म्हणता येईल.


कलाकार आणि भूमिका

बाबुली म्हणजे अभिनेते दिलीप प्रभावळकर. एका वाक्यात सांगायचं तर बाबुलीने म्हणजेच दिलीप यांनी संपूर्ण सिनेमा काबीज केला आहे. एका एका फ्रेममध्ये ते अतिशय उत्कृष्ट दिसत आहेत. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल, असे बरेच कलाकार सिनेमात असले तरीही ८१ वर्षीय दिलीप प्रभावळकरांचा प्रभाव जराही कमी झालेला दिसला नाही. त्यानंतर माधव म्हणून सिद्धार्थ मेनन आणि वंदू म्हणजेच प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या भूमिका देखील लक्षात राहण्यासारख्या आहेत.

अभिनेते भरत जाधव देखील फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमितकेत दिसतात. पण या अभिनेत्याला ही भूमिका काहीशी अपूरी वाटते. भरत जाधव आणखी प्रभावी भूमिकेत किंवा आणखी महत्त्वपूर्ण पात्रात असू शकत होते. बाकी कलाकारांनी आपापलं काम योग्यरित्या साकारलं आहे.

एकंदरितच सिनेमाविषयी बोलायचं तर गुरु ठाकूर यांनी उत्तम संवाद लिहीले आहेत. कलाकारांनी त्यासह उत्तम अभिनय केलाय. सिनेमॅटोग्राफीसुद्धा उत्तम झाली आहे. कोकणातील गर्द हिरवाई, घरं नक्कीच नयनसुख देणारं आहे. कलाकारांनी मालवणी भाषासुद्धा बऱ्यापैकी आत्मसात केलेली दिसत आहे. सिनेमाला संगीतही चांगलं मिळालं आहे. त्यातील रंगपूजा हे गाणं विशेष लक्षात राहणारं आहे. गावातल्या दशावताराच्या कार्यक्रमांचं सुंदर चित्रण पाहायला मिळतं.
बाप-लेकाचं प्रेम अगदी सुंदररित्या सिनेमातून दाखवलं आहे. अनेक सीन्स डोळ्यातून पाणी आणतात. मराठी सिनेमाची मराठीतच तुलना झाली तर दशावतार नक्कीच निराश करत नाही. दिग्दर्शक सुबोध खानोलकरांचा हा पहिला सिनेमा आहे मात्र त्यांनी बरीच मेहनत घेतल्याचं दिसून येतं. मराठीतला अतिशय उत्तम प्रयत्न म्हणजे ‘दशावतार’ आहे. अडीच तासांचा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव देऊन जातो. कुटुंबासह मराठी सिनेमा पाहायचा असेल तर दशावतार तुम्ही नक्की पाहू शकता.

रेटींग - ३.५/५
Powered By Sangraha 9.0