जेव्हा ‘लिव्ह-इन’ आणि लग्न आले ‘आमने-सामने'

    13-Sep-2025
Total Views |

मराठी रंगभूमीवर सध्या ‘आमने-सामने’ हे नाटक चांगलंच गाजताना दिसत आहे. तब्बल ३५० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाने पूर्ण केले, तर ‘हाऊसफुल’चे बोर्ड नाट्यगृहांबाहेर लागलेले पाहायला मिळतात. यानिमित्ताने या नाटकातील कलाकार लीना भागवत, रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने बातचीत केली आणि या नाटकाचे काही रंजक किस्से जाणून घेतले.

आमने-सामने’ या नाटकाचा विषय हा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि लग्न. ‘लिव्ह-इन’चा मुद्दा आजही आपल्या देशात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो, तर या विषयावर हे नाटक नेमकं काय भाष्य करतं आणि वैयक्तिकरित्या या कलाकार मंडळींनाही या विषयी काय वाटतं, त्याचाही आम्ही कानोसा घेतला. याविषयी बोलताना अभिनेता रोहन गुजर म्हणाला की, "आमच्या नाटकाच्या शेवटी एक वाय आहे, "तुम्ही लग्न करून एकत्र राहा किंवा न करता एकत्र राहा. तुमच्यात भांडणं होणार, वाद होणार, रुसवे-फुगवे होणार; पण ते सगळं झाल्यानंतर त्या व्यक्ती एकमेकांसमोर कशा राहतात, इथेच कळतं की त्यांचा संसार कसा होणार आहे!”

याविषयी बोलताना अभिनेत्री लीना भागवत म्हणाल्या, "ज्या काही गाजलेल्या ‘लव्ह स्टोरीज’ आहेत, त्यांपैकी कुणाचंच लग्न झालेलं नाही; मग ते सलीम अनारकली असो किंवा लैला मजनू. त्यामुळे आपल्याला वाटतं की, ‘लिव्ह-इन’चा मुद्दा आता आला आहे. पण, दोन नितांत प्रेम करणारी एकत्र आलेली माणसं, मग त्याला ‘टॅग’ कोणताही असो, ‘लिव्ह-इन’चा किंवा लग्नाचा.”

तर पुढे त्यांनी एक उदाहरण देत सांगितलं की, "एकदा आमचा प्रयोग संपल्यानंतर ७०-७५ वर्षांच्या दोन आजी आम्हाला भेटायला आल्या होत्या. तेव्हा त्या आपापसांत बोलत होत्या, छान आहे ना हे ‘लिव्ह-इन’ वगैरे, आपल्या वेळी नव्हतं असं काही. फक्त त्यांनी असा सुंदर प्रश्न उपस्थित केला की, पण हे ‘लिव्ह-इन’मध्ये मुलंबाळं झाली की त्याला आडनाव कोणाचं द्यायचं? आणि यावर सगळेच हसू लागले.”


दरम्यान, या नाटकात अभिनेत्री लीना भागवत यांच्यासह त्यांचे पती अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश कदमदेखील आहेत, तर मंगेश कदम यांनीच नाटकाचं लेखनही केलेलं आहे. चारच पात्रे असणारं हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. लवकरच नाटकाचे ४०० भागसुद्धा पूर्ण होणार आहेत. नाटकाच्या इतरही काही गमतीजमती तसेच प्रेक्षकांनी दिलेली पोचपावती यावेळी त्यांनी सांगितली. रोहन म्हणाला, "आमच्या पुण्याच्या प्रयोगाला एक जोडपं आलं होतं. नाटक संपल्यावर ते आम्हाला भेटायला आले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आमची आता घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही आता घटस्फोट घेत आहोत. पण, डॉ. मोहन आगाशे यांनी आम्हाला तुमचं नाटक एक थेरपीचा भाग म्हणून पाहायला सांगितलं आहे. तेव्हा आम्हाला जाणवलं की, किती जबाबदारीचं काम आम्ही करत आहोत.”