ईशान्य भारतासाठी विकासाचे नवे पर्व : आयझॉलला राजधानी एक्सप्रेसची थेट जोडणी

13 Sep 2025 16:42:24
   
नवी दिल्ली, 
ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला मोठी गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरमच्या आयझॉल येथे ९,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे आज भूमिपूजन व उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. या निमित्ताने पंतप्रधानांनी आयझॉल आता भारताच्या रेल्वे नकाशावर अधिकृतपणे स्थान मिळाल्याचे घोषित केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘ब्लू माऊंटन्स’च्या पवित्र भूमीवर लक्ष ठेवणाऱ्या सर्वोच्च देव ‘पाथियन’ला वंदन केले. खराब हवामानामुळे ते आयझॉलला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली. तथापि, मिझो जनतेच्या प्रेमाचा स्पर्श आपल्याला माध्यमातूनही जाणवत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी मिझोरमच्या स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे कौतुक करत लालनु रोपूइलियानी आणि पासलथा खुआंगचेऱा यांसारख्या व्यक्तींच्या आदर्शांनी राष्ट्राला प्रेरणा दिली असल्याचे सांगितले. बलिदान, सेवा, धैर्य आणि करुणा या मूल्यांचा मिजो समाजात खोलवर संस्कार झालेला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैराबी–सैरांग रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आणून मिझोरमची स्वप्ने पूर्ण झाल्याचे सांगत मोदी यांनी अभियंते आणि कामगारांच्या कौशल्याचे कौतुक केले. त्यांनी जाहीर केले की, सैरांग आता पहिल्यांदाच राजधानी दिल्लीशी ‘राजधानी एक्सप्रेस’द्वारे थेट जोडले जाणार आहे. ही केवळ रेल्वे कनेक्टिव्हिटी नसून जीवन आणि उपजीविकेला नवे रूप देणारी ‘लाईफलाईन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ असल्याचे ते म्हणाले. यामुळे शेती, व्यापार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना चालना मिळेल.

मिझोरमसह ईशान्येकडील राज्यांकडे पूर्वी दुर्लक्ष झाले, मात्र गेल्या ११ वर्षांत या भागाचा विकास हा सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू ठरल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मिझोरमलाही उडान योजनेचा लाभ मिळणार असून लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. यामुळे दुर्गम भागांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘नॉर्थ ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर’मध्ये मिझोरम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून मोदी यांनी कालयान मल्टी-मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प आणि सैरांग–हमावंगबुच्छुआह रेल्वेमार्गाद्वारे मिझोरमचा बंगालच्या उपसागराशी आणि दक्षिण-पूर्व आशियाशी थेट संपर्क होणार असल्याचे नमूद केले.

तरुणाईला सक्षम बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मिझोरममध्ये ११ एकलव्य निवासी शाळा सुरू झाल्या आहेत व आणखी सहा सुरू होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ईशान्य भारतातील ४,५०० हून अधिक स्टार्ट-अप्स व २५ इनक्युबेटर्समुळे हा प्रदेश उद्योजकतेचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी सुधारणा, वस्तूंच्या किमतीत झालेली घट, परवडणारे औषधोपचार आणि पर्यटनाला चालना देणारे निर्णय यांचा उल्लेख करून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गतिमानतेचे चित्र मांडले. त्यांनी अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा अभिमान व्यक्त केला व ‘मेड इन इंडिया’ शस्त्रास्त्रांची भूमिका अधोरेखित केली.


Powered By Sangraha 9.0