पुण्यात नुकताच श्री गणेशोत्सव पार पडला. तसे तर उत्साही पुणे आता उत्सवातच रममाण होणार आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हे पारंपरिक उत्सव असतानाच, निवडणुकीचा उत्साहदेखील द्विगुणित झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५वा वाढदिवस साजरा करण्यासाठीदेखील पुणेकर सज्ज झाले आहेत. खुद्द खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता या उत्सवाचीही पुण्याचे नागरिक तयारी करीत आहेत. भाजप या सेवा पंधरवड्यात, विविध उपक्रम दोन्ही महानगरात राबविणार आहेत. या उपक्रमाचा गरजू नागरिकांना लाभ होणार आहे. तिकडे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या विशाल पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार असून, त्यानिमित्ताने भाजप आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृतीसाठी तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि ५०० ध्वज अशी ऐतिहासिक मानवंदना महाराजांना दिली जाणार आहे.
ऐतिहासिक गडांचा जागतिक वारसायादीत समावेश झाल्यानंतर, जिल्ह्यातील पर्यटन विभागदेखील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ ऐतिहासिक सातारा नगरीत होत असल्याने, यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या अध्यक्ष पदाची निवड होत असून, तत्पूर्वी या संमेलनाचा लोगो वयाची शताब्दी गाठणारे प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस यांनी तयार करून देणे, हे पुणेकरांसह संपूर्ण सांस्कृतिक-कला विश्वासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद असेच. त्यात संपूर्ण नाट्यविश्वाला उत्तमोत्तम कलाकार देणार्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचेही, हे हीरक महोत्सवी वर्ष आहे.
त्यामुळे हा करंडक मिळविण्यासाठी नव्या दमाचे तरुण, रसिकांना आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविण्यासाठी उत्सुक आहेत. उत्सवाचे हे दिवस आगामी काळात सर्वांसाठी आनंद घेऊन येतील, यात संदेह नाही. सगळीकडे नकारात्मक वातावरण असल्याची पेरणी करणार्या निरुपयोगी विकाराचे गाजर निर्माण करणार्या या विषारी तणकटाकडे कोणीही फारसे लक्ष देऊ नये. अशी जमात पुण्यात कानाकोपर्यातून रिकामी कामे करण्यात पटाईत आहे. त्यामुळे सर्वांनी केवळ आनंद घ्यावा आणि सेवेचा लाभ घ्यावा, यातूनच जनहित साध्य होईल एवढे खरे.
संस्कृतीचा द्वेष
काहीजणांना रडायची खूप सवय असते. अशी नकारात्मकता पसरवणारेच आजकाल समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होतात. देशात जे काही चांगले सुरू आहे, त्याचे कौतुक करायचे सोडून, उगा वड्याचे तेल वांग्यावर काढायचे आणि विरोधात गरळ ओकत राहायची. यांना उत्सवाचा आनंद घेणे, आपली नवी पिढी सक्षम आणि प्रतिभासंपन्न कशी होईल, याचा कधी विचारच करायचा नसतो. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, रोजगारप्रणित उद्योग आणून राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात विकास आणि पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. यामधून देखील रोजगारनिर्मिती होत आहे. पुण्यात तर नव्या कंपन्या आणि पायाभूत प्रकल्पात कामे सुरू असल्याने, रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. तरीही विरोधक अमेरिकेने काही निर्णय भारतविरोधी घेतल्याने, आसूड ओढत आहेत. भारत अमेरिकेवर विसंबून काँग्रेसच्या काळात असे, भाजप नेतृत्वाच्या काळात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केव्हाच सुरू झाली आहे.
आपल्या शेजारी असलेल्या लहान देशांच्या प्रगतीसाठी आपण फार मोठा हातभार लावत असल्याने, आपल्या आर्थिक क्षमतेत वाढ झाली आहे. हे समजूनदेखील दिशाभूल करीत जनतेला सरकारविरोधी मानसिकतेत न्यायचे, हा एकच अजेंडा विरोधकांनी ठरवलेला आहे. त्यामुळे लोकांनी अशा देशहिताचे सोयरसुतक नसलेल्यांपासून सावध राहायला पाहिजे. विनाकारण काहीही, कोणतीही माहिती नसलेल्या, अभ्यास नसलेल्या मुद्द्यावर बोलत राहतात आणि जे घडणार नाही, त्यावर भविष्य वर्तवत बसतात. त्यामुळे खरे तर आपल्या देशाची चांगली असलेली प्रतिमा मलीन होत असते. सर्व जगात आज आपल्या देशाबद्दल, देशाच्या उज्ज्वल संस्कृतीबाबत गोडवे गायले जातात मात्र, येथे काही संस्कृतीभक्षक विघ्नसंतोषीपणा करतातच. भारताला गुलामगिरीकडे नेण्याची कृती करणार्या काँग्रेस पक्षाच्या कर्नाटकातील सरकारने, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलून ख्रिश्चन नाव रेल्वे स्थानकास देण्याचा प्रताप केला आहे. तिकडे केरळचे मुख्यमंत्री तेथील उत्सव म्हणजे, स्वतःची सांस्कृतिक मक्तेदारी समजत आहेत.
अतुल तांदळीकर