मुंबई : जगातील देशांना वाटते की भारत मजबूत झाला तर त्यांचे काय होईल. काही देश भारताच्या प्रगतीने भयभीत झाले असून, त्यामुळेच भारतावर टॅरिफ लावून आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व स्वार्थी विचारांचे परिणाम आहेत. आज जागतिक शांततेसाठी ऐक्य आणि परस्पर सहकार्य हाच उपाय आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर येथील ब्रह्माकुमारी संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
सरसंघचालक पुढे म्हणाले की, लोकांना भीती वाटते की दुसरा कुणी मजबूत झाला तर त्यांचे काय होईल. भारत मजबूत झाला तर ते कुठे उरतील? त्यामुळे टॅरिफ लावले गेले. भारताने काही केले नाही, पण असे प्रकार ‘मी आणि माझे’ या मानसिकतेतून होतात. ज्यावेळी त्यांना कळेल की ‘मी आणि माझे’ या मानसिकतेपेक्षा प्रत्यक्षात ‘आम्ही आणि आमचे’ असे होईल, तेव्हा सर्व समस्या संपतील.
पुढे ते म्हणाले की, जर आपल्यामध्ये वैरभाव नसेल, तर बाहेरचा कोणीच आपला शत्रू होऊ शकत नाही. पूर्वी आपण सापांपासून घाबरत होतो, पण ज्ञान मिळाल्यावर कळले की सर्व साप विषारी नसतात. त्यामुळे आपण त्यांना सोडून देतो. ज्ञानामुळे भीती आणि भेदभाव नाहीसे झाले.