मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दलाई लामा कृतज्ञतेचे व आदराचे प्रतीक आहेत. जगाची शांतता व मानव कल्याणासाठी त्यांचे आयुष्य समर्पित आहे. त्यांनी जगाला मानवतेचा संदेश देत, सर्व देशांना संघर्ष सोडून शांतीचा मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. परस्पर विश्वास व मानवतेच्या तत्वावर आधारित नवे युग उदयास येईल हा विश्वास आहे, असे मत 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'चे संरक्षक डॉ. इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. धर्मशाला येथील दलाई लामा यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
इंद्रेश कुमार म्हणाले, यावर्षी दलाई लामा यांचा ९०वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभेच्छांसह त्यांच्या कार्यासाठी पुष्पगुच्छ अर्पण केला. त्यांच्यासोबत जागतिक शांतता, सौहार्द आणि पर्यावरण संवर्धनावर सविस्तर चर्चा झाली. सर्व शेजारी राष्ट्रांनी सहकार्य, परस्पर आदर व शांततेला प्राधान्य द्यावे. अन्यथा आर्थिक प्रगती व सामाजिक सौहार्द यावर परिणाम होतो.
इंद्रेश कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीतील उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, येत्या ऑक्टोबरमध्ये संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात हजारो कार्यक्रम होणार आहेत. विद्वान, विचारवंत आणि समाजातील मान्यवरांना सहभागी करून संवाद, ऐक्य व सौहार्द वाढवणे हा यामागचा हेतू आहे. १२ ते १५ कोटी कुटुंबांना पर्यावरण संरक्षणाची शपथ घ्यायला प्रोत्साहित केले जाणार आहे. भेदभाव व असमानतेपासून मुक्त, पर्यावरणपूरक व ऐक्याने नटलेला समाज निर्माण करणे, हा संघाचा उद्देश आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ. रामलाल, तिबेट संग्रहालयाचे संचालक तेनझिन टॉपढेन उपस्थित होते.