पत्राचाळ वासियांना ताबापत्र देण्यास सुरुवात ; 'या' कालावधीत देणार ताबापत्र

12 Sep 2025 20:30:00

मुंबई, उच्च न्यायालयाच्या दि.१० सप्टेंबर २०२५ रोजीच्या निर्देशानुसार गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पात्र सभासदांना म्हाडा मुंबई मंडळातर्फे शुक्रवार, दि. १२ सप्टेंबरपासून वितरण पत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, दि.१५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विहित वेळापत्रकानुसार विंगनिहाय सदनिकाधारकांना ताबापत्र देण्यात येणार आहे.

सदनिकाधारकांची तपासणी करून भूखंड क्र. आर-९, पत्राचाळ सिद्धार्थनगर, गोरेगाव [प.], मुंबई येथील प्रकल्पस्थळी सकाळी ९ ते सायं.६ वाजेपर्यंत ही ताबा पत्रे देण्यात येणार आहेत. सर्व पात्र सभासदांनी दिलेल्या वेळेत त्यांचे फोटो ओळखपत्रासह सदर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. या इमारतींना दि.२ एप्रिल रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

तसेच भुखंड क्र.आर-९ येथील पुनर्विकसित इमारतीमधील सदनिकांची तपासणी संस्थेचे दोन प्रतिनिधी, म्हाडाने प्राधिकृत केलेले अधिकारी, कंत्राटदार मे.रेलकॉन यांचे प्रतिनिधी व सदनिकाधारक (सभासद) यांच्यासमवेत पुढीलप्रमाणे एका दिवशी एका विंगची तपासणी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेदरम्यान करून व सदनिकांचा ताबा देणार आहेत, अशी माहिती म्हाडाने दिली आहे.

गोरेगाव सिध्दार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना जाहीरपणे कळविण्यात येते की, दिनांक ०४/०४/२०२५ रोजीच्या संगणकीय सोडतीमधील निकालाच्या आधारे प्रत्येक विंगमधील सदनिकाधारकांनी वरील वेळापत्रकानुसार प्रकल्पस्थळी उपस्थित राहावे व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित सदनिकाधारकांनी सदनिकांची तपासणी करुन तात्काळ सदनिकांचे ताबापत्र घेऊन सदनिकांचा ताबा घेण्यात यावा. तसेच येताना सोबत तीन पासपोर्ट साईजचे फोटो व ओळखपत्र घेऊन यावे.

Powered By Sangraha 9.0