नवी दिल्ली, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी मांडलेला कथित ‘मतचोरी’चा दस्तऐवज प्रत्यक्षात म्यानमारमध्ये तयार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा खुलासा झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन ‘मतचोरी’चा पुरावा म्हणून काही दस्तऐवज मांडले होते. हेच दस्तऐवज त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ‘व्होट चोरी प्रुफ’ या नावाने अपलोड करण्यात आले होते. गूगल ड्राईव्हवरील ‘राहुल गांधीज प्रेझेंटेशन’ नावाच्या फोल्डरमध्ये इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषेत असे तीन पीडीएफ फाईल्स सापडल्या.
एक्स हँडल ‘खुरपेंच’ने या फाईल्सचे मेटाडाटा तपासले. त्यात उघड झाले की हे सर्व दस्तऐवज म्यानमार स्टँडर्ड टाइम (एमएमटी) या वेळेच्या पट्ट्यात तयार झाले आहेत. एमएमटी हा म्यानमारचा वेळेचा पट्टा असून तो यूटीसी पेक्षा 6 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारताची प्रमाणवेळ (आयएसटी) मात्र यूटीसीपेक्षा फक्त 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळे भारतात तयार झालेल्या पीडीएफ फाईल्समध्ये नेहमी युसीटी+5:30 दिसतो, परंतु राहुल गांधींच्या फाईल्समध्ये युटीसी+6:30 म्हणजेच म्यानमारचा टाइमझोन दिसला. ‘खुरपेंच’ने हेही स्पष्ट केले की व्हीपीएन वापरून किंवा गूगल ड्राईव्हवरून फाईल शेअर केल्यावरही मेटाडाटा बदलत नाही.
या प्रकरणानंतर काँग्रेस समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले. गुरुवारी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या बचावासाठी पुढाकार घेतला. त्यांनी दावा केला की ही वेळेतील गफलत ही “सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनची समस्या किंवा अडोबी बगमुळे” झाली आहे. त्यांचा युक्तिवाद असा होता की, मेटाडाटा फील्ड्समध्ये वेळेचा ऑफसेट नेहमीच जुळत नाही. मात्र, ‘खुरपेंच’ने त्यावर प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की लाइटरूममधील टाइमझोन बग 14 वर्षांपूर्वीच दुरुस्त झाला होता आणि राहुल गांधींच्या फाईल्स तयार झालेल्या अडोबी इलुस्ट्रेटर सॉफ्टवेअरमध्ये असा कोणताही बग नव्हता. त्यामुळे काँग्रेसची सफाई अधिकच संशयास्पद ठरत असल्याचे स्पष्ट आहे.
संशयाचे धुके गडदराहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीत परदेशी हस्तक्षेपाचे आरोप नवे नाहीत. काँग्रेसचा चीनी कम्युनिस्ट पक्षासोबतचा करार असो किंवा त्यांच्या रहस्यमय परदेश दौऱ्यांचा मुद्दा असो, गांधींच्या हालचाली नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर ‘मतचोरी’ दस्तऐवज परदेशात तयार झाल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावरचे प्रश्नचिन्ह अधिकच गडद झाले आहे.