प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद!

12 Sep 2025 21:26:49

मुंबई, अटळ सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाणार आहे. त्यासाठी प्रभादेवी पूल बंद करत त्याचे पाडकाम करण्याकरिता एमएमआरडीए फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. आता शुक्रवार,दि.१२ रोजी रात्री ११.५९ वाजता हा पूल बंद करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

पूल बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून हा पूल पुढील किमान २० महिने हा बंद असेल.फेब्रुवारीत पूल बंद करत पाडण्यात येणार होता. मात्र परीक्षांचा काळ लक्षात घेता पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर एप्रिलमध्ये वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकल्पात बाधित होणारे रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोध करत पूल बंद होऊ दिला नाही.

बुधवार,दि.१० रोजी रहिवाशांच्या विरोधानंतर गुरुवार, दि.१३ रोजी बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासंबंधी बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंबंधी बैठक घेत प्रकल्पातील बाधित दोन इमारतींतील रहिवाशांना त्याच परिसरात म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये घरे देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर आता हा पूल बंद करत या पुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.

Powered By Sangraha 9.0