काठमांडू : (Nepal Protest) नेपाळमधील 'जेन-झीं'नी सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात हिंसक स्वरूप धारण केल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या शासकीय इमारतींनाही आग लावली. के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेपाळमधील परिस्थितीवर नियंत्रण लष्कर प्रयत्न करत आहे. दरम्यान, काठमांडूमध्ये आंदोलकांनी काही हॉटेल्सला लावलेल्या आगीत एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, रामवीर सिंग गोला आणि त्यांची पत्नी राजेश गोला हे ७ सप्टेंबर रोजी पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी काठमांडूला गेले होते. गोला आणि त्यांची पत्नी हे तिथल्या एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर मुक्कामी होते. मात्र, ९ सप्टेंबरच्या रात्री आंदोलकांनी या हॉटेलला आग लावली. त्यानंतर रामवीर यांनी पडद्याचा वापर करून पत्नीला सुरक्षित ठिकाणी खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हातातून पत्नी निसटली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता राजेश गोला यांचा मृतदेह माझियाबाद येथील त्यांच्या घरी आणला. दरम्यान, त्यांच्या मुलाने म्हटले की, "जमावाने होटलवर हल्ला केला आणि त्यानंतर आग लावली. त्यानंतर माझ्या वडिलांनी खिडकीची काच तोडली. माझी आई खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडली"