मुंबई : देशातील एक प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था म्हणून आयआयटी बॉम्बेची विशेष ओळख आहे. मात्र ही संस्था सध्या वादात सापडली आहे. दक्षिण आशियाई पूंजीवाद (South Asian Capitalism(s)) या नावाने दोन दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आयआयटी बॉम्बेने यूसी बर्कले आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स-एमहर्स्ट यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. संस्थेच्या प्रायोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे.
या कार्यशाळेचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये भारताचा एक कथित ‘कॅपिटलिस्ट पिरॅमिड’ दाखवलेला होता. पिरॅमिडच्या एका भागात 'वी फूल यू' असे लिहिलेले होते आणि त्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांचे व्यंगचित्रांसारखे फोटो लावलेले होते. ही कार्यशाळा मोफत असून ती दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यात दक्षिण आशियामध्ये पूंजीवादी व्यवस्था सामाजिक रचनेद्वारे कशी टिकवली गेली आहे यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन न्यू पॉलिटिकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह करत आहे.
वाद उफाळल्यानंतर आयआयटी बॉम्बेने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांना या कार्यशाळेच्या पोस्टरबद्दल काहीही माहिती नव्हती. ते म्हणाले की, “आयआयटी बॉम्बेचा ‘न्यू पॉलिटिकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह’ नावाचा एक प्रकल्प आहे, मात्र प्रसिद्ध झालेल्या फ्लायरची माहिती आम्हाला नव्हती. हे कळताच आयोजकांना सर्व सोशल मीडियावरून फ्लायर काढून टाकण्याचे आणि या कार्यक्रमातून आयआयटी बॉम्बेचे नाव हटवण्याचे निर्देश दिले.” याशिवाय, आयआयटी बॉम्बेने या घटनेनंतर यूसी बर्कले आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स-एमहर्स्टसोबतचे संबंध तोडण्याची घोषणा केल्याले लक्षात येते आहे.