भारतीय रेल्वेच्या नकाशावर मिझोराम...

    12-Sep-2025
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत ईशान्य भारताचा विकासही गतिमान झाला. स्वातंत्र्योत्तर काळापासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशात रस्ते, पूल, रेल्वेमार्गांच्या उभारणीने प्रवासी वाहतुकीसह उद्योग, पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बैराबी-सैरंग रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार असून, मिझोरामसाठी हा रेल्वेमार्ग एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यानिमित्ताने ईशान्य भारताची विकासगाथा अधोरेखित करणारा हा लेख...

अनेक दशकांपासून ईशान्येकडील प्रदेश विकासाच्या प्रतिक्षेतील एक लांबचा भाग मानला जात होता. ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणारे नागरिक प्रगतीची आकांक्षा बाळगत असले, तरी त्यांच्या हक्काच्या पायाभूत सुविधा आणि संधी त्यांना मिळाल्या नव्हत्या, हे वास्तव. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘अॅट ईस्ट’ धोरणानंतर हे चित्र बदलले. ईशान्येकडील राज्य आता ‘फ्रंटरनर’ अर्थात आघाडीवर असलेली राज्ये म्हणून ओळखली जात आहेत.

शांतता, प्रगती आणि समृद्धी

रेल्वे, रस्ते, विमानतळ आणि डिजिटल कनेटिव्हिटीमध्ये विक्रमी गुंतवणुकीद्वारे हे परिवर्तन शय झाले आहे. शांतता करारांमुळे स्थिरता येत आहे. सरकारी योजनांचा लोकांना फायदा होत आहे.स्वातंत्र्यानंतर प्रथमच ईशान्येकडील राज्य ही भारताच्या विकासात केंद्रस्थानी असल्याचे दिसत आहे.

उदाहरणार्थ, रेल्वेमधल्या गुंतवणुकीचा विचार केला, तर २००९-२०१४ सालच्या तुलनेत ईशान्येकडच्या राज्यांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात पाचपटीने वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात १० हजार, ४४० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. २०१४ ते २०२५ सालापर्यंत एकूण अर्थसंकल्पातला वाटा ६२ हजार, ४७७ कोटी रुपये इतका आहे. आज, या प्रदेशात ७७ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. ईशान्येकडे यापूर्वी कधीही इतया विक्रमी पातळीवर गुंतवणूक झालेली नव्हती.

मिझोराम प्रथम


मिझोराम हे राज्य ही या विकासाचा एक भाग आहे. मिझोराम हे राज्य त्याच्या समृद्ध संस्कृती, खेळांबद्दलचे प्रेम आणि सुंदर डोंगराळ भागासाठी ओळखले जाते. तरीही, दशकांपासून ते मुख्य प्रवाहापासून दूर राहिले. या राज्यात रस्ते आणि हवाई वाहतूक मर्यादित होती. रेल्वे त्याच्या राजधानीपर्यंत पोहोचली नव्हती. मात्र, आता तसे राहिलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या बैराबी-सैरंग रेल्वे मार्गाचे होणारे उद्घाटन मिझोरामसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतींचा हा ५१ किमीचा प्रकल्प पहिल्यांदाच ऐझवालला राष्ट्रीय रेल्वेमार्गांशी जोडेल. यासोबतच, पंतप्रधान सैरंग ते दिल्ली (राजधानी एसप्रेस), कोलकाता (मिझोराम एसप्रेस) आणि गुवाहाटी (ऐझवाल इंटरसिटी) या तीन नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील.

हा संपूर्ण रेल्वे मार्ग कठीण प्रदेशातून जातो. रेल्वे अभियंत्यांनी मिझोरामला जोडण्यासाठी १४३ पूल आणि ४५ बोगदे बांधले आहेत. यातील एक पूल कुतुबमिनारपेक्षाही उंच आहे. या भूप्रदेशात इतर सर्व हिमालयीन मार्गांप्रमाणे या रेल्वे मार्गाची बांधणी ही पूल आणि त्यानंतर बोगदा आणि त्यानंतर पूल अशाप्रकारे झाली आहे.

हिमालयीन बोगदे बांधण्याची पद्धत


ईशान्य हिमालय हा तुलनेने तरुण आणि घडीचा पर्वत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात मऊ माती आणि सेंद्रिय पदार्थांचे साठे आहेत. अशा परिस्थितीत बोगदे बांधणे आणि पूल बांधणे ही असाधारण आव्हाने होती. मऊ मातीमध्ये बांधकाम करणे शय नसल्याने पारंपरिक पद्धती अपयशी ठरल्या.

यावर मात करण्यासाठी रेल्वे अभियंत्यांनी एक नवीन आणि कल्पक दृष्टिकोन विकसित केला, ज्याला आता ‘हिमालयीन बोगदे बांधण्याची पद्धत’ म्हणून ओळखले जाते. या तंत्रात माती प्रथम स्थिर केली जाते आणि नंतर बोगदे बांधण्यासाठी घट्ट केली जाते. यामुळे आम्हाला या प्रदेशातील सर्वांत कठीण प्रकल्पांपैकी असलेला हा एक प्रकल्प पूर्ण करता आला.

भूकंप येणाऱ्या प्रदेशात, अशा पर्वतीय प्रदेशात पुलांची स्थिरता सुनिश्चित करणे, हे आणखी एक मोठे आव्हान होते. हा पूल कार्यक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी विशेष डिझाईन आणि प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले. जगभरातल्या अशा प्रकारच्या भूप्रदेशांसाठी हा स्वदेशी नवोन्मेष एक मॉडेल बनले आहे. हे शय करण्यासाठी हजारो अभियंते, कामगार आणि स्थानिक समुदाय एकत्र आले. जेव्हा भारत बांधण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो स्मार्ट बांधतो!

या प्रदेशाला होणारे फायदे


रेल्वेला विकासाचे इंजिन मानले जाते. रेल्वे नवीन बाजारपेठा जवळ आणते आणि व्यापाराच्या संधी निर्माण करते. या नवीन रेल्वे मार्गामुळे मिझोराममधील लोकांचे राहणीमान सुधारेल. मिझोराममध्ये राजधानी एसप्रेस सुरू झाल्यानंतर ऐझवाल ते दिल्ली प्रवासाला लागणारा वेळ आठ तासांनी कमी होईल. नवीन एसप्रेस गाड्यांमुळे ऐझवाल, कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यानचा प्रवास जलद आणि सोपा होईल.

शेतकरी, विशेषतः बांबू लागवड आणि बागायती शेती करणारे शेतकरी, त्यांचे उत्पादन जलद आणि कमी खर्चात राज्याबाहेरील बाजारपेठेत पोहोचवू शकतील. अन्नधान्य आणि खते यांसारख्या आवश्यक वस्तूंची वाहतूक सोपी होईल. वाहतूक अधिक सुलभ झाल्यामुळे मिझोरामच्या पर्यटनालाही चालना मिळेल. यामुळे स्थानिक व्यवसाय आणि तरुणांसाठी संधी निर्माण होतील.

या प्रकल्पामुळे लोकांसाठी शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मिझोरामसाठी ही कनेटिव्हिटी यासारख्या अनेक गोष्टींचे आश्वासन देते. आतापासून ऐझवालला एक दूरचा प्रदेश म्हणून पाहिले जाणार नाही.

देशभरातील विकास


देशभरातील रेल्वेमध्ये विक्रमी परिवर्तन होत आहे. नुकतेच १०० हून अधिक अमृत भारत स्थानके सुरू करण्यात आली, तर १ हजार, २०० अधिक रेल्वेमार्ग प्रगतिपथावर आहेत. ही स्थानके प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि शहरांना विकासाचे नवीन केंद्र प्रदान करतील. १५० हून अधिक हाय-स्पीड वंदे भारत गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन मानके प्रस्थापित करत आहेत. त्याचवेळी, जवळजवळ संपूर्ण रेल्वे प्रणालीचे विद्युतीकरण रेल्वेला अधिक हरित बनवत आहे.

देशभरात २०१४ सालापासून ३५ हजार किमी रुळ बांधण्यात आले आहेत. केवळ गेल्या वर्षातच ३ हजार, २०० किमीचे नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यात आले. विकास आणि परिवर्तनाची ही गती स्पष्ट दिसणारी आहे.

ईशान्येसाठीचा दृष्टिकोन

पंतप्रधान म्हणाले, "आमच्यासाठी पूर्व म्हणजे-सक्षमीकरण, कृती, बळकटीकरण आणि परिवर्तन.” हे शब्द ईशान्येकडच्या राज्यांसाठी असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनाचे सार व्यक्त करतात.

अनेक आघाड्यांवर निर्णायक कृतींमुळे या प्रदेशाचे परिवर्तन सुनिश्चित झाले आहे. आसाममधील ‘टाटा’ची सेमीकंडटर सुविधा, अरुणाचल प्रदेशातील ‘टाटो’सारखे जलविद्युत प्रकल्प आणि बोगीबील रेल्वे-कम-रोड पूलसारख्या पायाभूत सुविधा या प्रदेशाला आकार देत आहेत. यासोबतच, गुवाहाटी येथे एम्सची स्थापना आणि दहा नवीन ग्रीनफील्ड विमानतळांनी आरोग्यसेवा आणि कनेटिव्हिटी मजबूत केली आहे.

सीमावर्ती प्रदेश ते आघाडीचा प्रदेश

अनेक दशकांपासून मिझोरामच्या लोकांना रस्ते, शाळा आणि रेल्वेची वाट पाहण्यास सांगितले जात होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. हे प्रकल्प ईशान्येकडे म्हणजेच एकेकाळी सीमावर्ती मानले जाणारे, आता भारताच्या विकासाचे अग्रणी बनले आहेत. हे पंतप्रधानांच्या ईशान्येकडच्या भागासाठी असलेल्या व्हिजनचे दाखले आहेत.

अश्विनी वैष्णव
(लेखक हे केंद्रीय रेल्वे, इलेट्रॉनिस व माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती आणि प्रसारणमंत्री आहेत.)