मुंबई : भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान आणि पाकिस्तानचे महिमामंडन करणाऱ्या वासिकचा जामिन अर्ज इलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. वासिकविरुद्ध मुजफ्फरनगरच्या चरथावल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. इलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा अपमान हा गंभीर चिंतेचा विषय असून सदर विवादित पोस्ट विषयी समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नोंदीवरील उपलब्ध सामग्री पाहता हेही स्पष्ट होते की, याचिकाकर्त्याच्या भारताविषयीच्या भावना देशभक्तिपूर्ण नाहीत.
न्यायालयाने पुढे म्हटले की, वासिक त्यागीच्या पोस्टमधून "राष्ट्रविरोधी विचारसरणीच्या महिमामंडनाकडे झुकाव दिसून येतो, तसेच त्या पोस्ट सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आरोपांची गंभीरता, गुन्ह्याचे स्वरूप आणि सामाजिक सौहार्दावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता याचिकाकर्त्याला जामिनावर सोडण्याचा कोणताही आधार नाही.
अशी माहिती आहे की, ही तक्रार दि. १६ मे रोजी दाखल करण्यात आली होती. तक्रारीत म्हटले होते की, वासिक त्यागीने आपल्या फेसबुक अकाउंटवर पाकिस्तानचे महिमामंडन केले. इतकेच नाही तर त्याने भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमानही केला. पोलीसांनी वासिकच्या मोबाईल नंबरवर नोंद असलेल्या फेसबुक अकाउंट वरील पोस्टची छाननी केली असता हे प्रमाणित झाले की त्या पोस्टशी संबंधित आयपी अॅड्रेसचा वापर वासिकच्या मोबाईल नंबरवरूनच झाला होता.