
मुंबई : उत्तर अमेरिकेतील ग्रेटर टोरांटो एरियात भगवान शिवाची तब्बल ५४ फूट उंच भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ही मूर्ती ब्रॅम्प्टन येथील भवानी शंकर मंदिरात बसवण्यात आली असून, या सोहळ्याला हजारो भक्त आणि पर्यटक उपस्थित होते. या रंगतदार आयोजनात रथयात्रा आणि पारंपरिक पूजा-अर्चाही पार पडल्या. ही देखणी मूर्ती नरेश कुमार कुमावत यांनी साकारली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, भगवान शिवाची मूर्ती तयार करण्याकरीता जवळपास दोन वर्षे लागली. या मूर्तीकडे पाहताना त्यातील चमकदार रंग आणि मोठा त्रिशूल नजरेत भरतो. मूर्तीची उंची आणि जागेचे स्थान यामुळे ती संपूर्ण शहराच्या अनेक भागातून सहज दिसते. ब्रॅम्प्टनचे हे भवानी शंकर मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाशी निगडित विविध कार्यक्रमांचे केंद्र मानले जाते. भगवान शिवाची ही मूर्ती केवळ एक रचना नसून, ती भारतीय वारसा आणि कॅनडातील हिंदू समुदायाची सांस्कृतिक ओळख यांचे प्रतीक आहे.
याचबरोबर मिसिसॉगा येथे नुकतीच प्रभू श्रीरामाची ५१ फूट उंच मूर्तीही उभारली गेली आहे. ही मूर्ती हिंदू हेरिटेज सेंटरमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात स्थापित झाली होती. या राममूर्तीचा काही भाग भारतात तयार करण्यात आला होता आणि सुमारे चार वर्षांपूर्वी तेथे आणण्यात आला होता.