Inspector Zende Review : मोस्ट वॉन्टेड कार्लचा सस्पेन्स संपवणारा ‘इन्स्पेक्टर झेंडे’

    11-Sep-2025
Total Views |


मुंबई : ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ८०-९० च्या दशकात हे नाव प्रचंड चर्चेत होतं. कोण होते इन्स्पेक्टर झेंडे अर्थातच इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. ज्यांच्या कर्तृत्वाची चर्चा त्या काळी देशभरासह – जगभरातही झाली होती. आणि यावरच आधाऱीत इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल. सध्या नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरचा हा चित्रपट आहे. तर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय बरेच मराठमोळे चेहरे या हिंदी सिनेमात पाहायला मिळतात. सत्यघटनेवर आधारीत हा सिनेमा आहे.

चित्रपटाची कथा

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. १९८६ साली चार्ल्स शोभराज या सिरीयल किलरची भलतीच दहशत मुंबईसह अन्य शहरांमध्ये होती. खून, दरोडे या गोष्टी अगदी सराईतरित्या तो करायचा. अनेक देशांमध्येही त्याने गुन्हे केले होते. चार्ल्स शोभराज अर्थातच सिनेमातला कार्ल भोजराज. तिहार जेलमधून त्याने पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करुन पळ काढला होता. मग निरनिराळ्या ठिकाणी स्वतःला लपवण्यासाठी त्याने केलेले निरनिराळे उद्योग दुसरीकडे पोलिसांची शोधमोहीम अशी एकूनच सिनेमाची कथा आहे. इन्स्पेक्टर झेंडेंनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गोव्यात फत्ते केलेली ही मोहीम त्याकाळी विशेष गाजली होती.

भूमिका, अभिनय आणि कलाकार

चित्रपटात मनोज वाजपेयींसह बरेच मराठी कलाकार दिसतात. जसे की भाऊ कदम, गिरीजा ओक, ओंकार राऊत, सचिन खेडेकर, हरिष दुधाडे, वैभव मांगले तर मुख्य आरोपी कार्लच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनजिम सार्भ आहे. मनोज वाजपेयी पोलीस अधिकारी अर्थात इन्स्पेक्टर झेंडेंच्या भूमिकेत आहे. अतिशय हुशार आणि मुंबई पोलिसांची सान राखण्यासाठी, त्या किलरला पकडण्यासाठी घेत असलेली मेहनत दिसून येते. नेहमीप्रमाणे मनोज वाजपेयीची संवादफेक आणि टायमिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कार्ल भोजराजच्या भूमिकेत अभिनेता जिम सार्भ आहे. त्याने देखील त्याची भूमिका देखील फारच रंजक बनवली आहे. बाकी कलाकारांनी देखील आपापल्या ठिकाणी आपलं काम उत्तमरित्या निभावलं आहे. भाऊ कदम विशेषतः पुन्हा एकदा कॉमेडी हवालदाराच्या भूमिकेत दिसतात. पण भाऊ कदमला पाहताना ही भूमिका काहीशी अपूरी वाटते. या ताकदीच्या अभिनेत्याला सिनेमात पुरेपूर बसवण्यात कमतरता वाटते. आणखी डायलॉग्स आणि कॉमेडीने चित्रपटात रंगत आणता आली असती. तसेच अभिनेता जिम सार्भ देखील उत्तम अभिनेता आहे मुख्य पात्र कार्लला आणखी रंगतदार करता आलं असतं असं वारंवार जाणवतं.



दिग्दर्शन आणि सस्पेन्स

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाला पूरपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा फार किचकट न करता अगदी साधी सरळ ठेवली आहे. मुंबईतील जुने रस्ते, पोलिस स्टेशन आणि त्या काळातील स्थानिक जीवन प्रत्यक्ष दाखवण्यात आले आहे. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील थरार आणि सस्पेन्स वाढतो. पण आणखी सस्पेन्स आणि थरार याची कमतरता कुठेतरी जाणवते, ती आणखी रंजक करता आली असती. मात्र असं असली तरीही कथा उत्तमरित्या हाताळली आहे. त्यामुळे अगदी ओटीटीवरही हा सिनेमा पाहताना कंटाळा अजिबातच येणार नाही. ओटीटीचा चित्रपट असूनही विनाकारण कोणतेही इन्टीमेट सीन्स आणि शिव्यांचा समावेश नाही हेही तितकच महत्त्वाचं.


त्यामुळे ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करतो. त्यात सस्पेन्स, थ्रील आणि कॉमेडी देखील आहे. त्य़ामुळे ओटीटीवर काही उत्तम पाहायचं असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहू शकता. चित्रपटाच्या शेवटी खऱ्या खुऱ्या इन्स्पेक्टर झेंडेंना देखील पाहायला मिळतं.

- अपर्णा कड 
  मनोरंजन प्रतिनिधी