मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास गुरुवार, ११ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
राज्य सरकारतर्फे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा लाभ कधी मिळणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, आता ऑगस्ट महिन्याचाही १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरु
याबाबत माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरु असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे."