एकत्रिकरणाच्या उपक्रमामुळे मुंबई मराठी साहित्य संघाच्या मतपत्रिका पोहोचण्यास उशिर!

11 Sep 2025 15:54:16

मुंबई : "मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणूकीसाठी मतपत्रिका स्पीड पोस्टाने पाठवल्या होत्या. परंतु, त्याच काळात पोस्टाने स्पीड पोस्ट व रजिस्टर पोस्ट यांचे एकत्रिकरण करण्याचा उपक्रम हाती घेतल्यामुळे मतपत्रिका पोहोचण्यास उशिर झाला." असे स्पष्टीकरण ऊर्जा पॅनलच्या उमेदवार तथा मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे यानी दिले.

दि.९ सप्टेंबर रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव विचार मंचाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती, ज्यामध्ये मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. तब्बल ६०० मतपत्रिका गहाळ झाल्याचा गंभीर आरोप डॉ. भालेराव विचार मंचाचे उमेदवार प्रमोद पवार यांनी केला होता. दि. ११ सप्टेंबर रोजी, माध्यमांना दिलेल्या एका निवेदनात ऊर्जा पॅनेलच्या उमेदवार उषा तांबे यांनी या बद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रामध्ये डॉ. भालेराव विचार मंचाच्यावतीने केलेल्या आरोपांचे प्रतियुत्तर दिले आहे. या निवेदनामध्ये उषा तांबे म्हणतात की साहित्य संघात अनेक वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे. २०१३ सालच्या निवडणुकीत सध्याचे नियामक व कार्यकारी मंडळ निवडून आले. २०१८ साली निवडणुकीत हेच नियामक व कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले. २०२३ साली निवडणूक व्हायची होती, परंतु २०२२ ते २०२५ या काळासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे असल्यामुळे कार्यकारी मंडळानेच तत्तकालीन नियामक / कार्यकारी मंडळाला दोन वर्ष मुदतवाढ दिली म्हणून आता २०२५ साली निवडणूक होत आहे.

स्पीड पोस्ट व रजिस्टर पोस्ट यांचे एकत्रीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतल्याने मतपत्रिका, मतदारांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. त्याबद्दल झालेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अखेरची तारीख ३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर अशी कार्यकारी मंडळाच्या संमतीने वाढवून दिली. असे उषा तांबे आपल्या निवेदनात म्हटले. त्याच बरोबर ४०० ते ६०० मतपत्रिका काढून घेण्याचा आरोप सुद्घा त्यांनी फेटाळून लावला. भालेराव विचार मंचाकडून मतपत्रिका गोळा करण्यासाठी अनेक व्यक्तींची नेमणूक झाली असून ते "आम्ही साहित्य संघाकडून आलो आहोत" असे सांगत आहेत. मात्र असा अधिकार साहित्य संघाने कोणालाही दिलेला नाही असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर साहित्य संघाची निवडणूक ही संस्थेची अंतर्गत निवडणूक आहे, त्याबद्दल जाहीर चर्चा, तक्रारी करणे सर्वाथाने अयोग्य आहे असे सुद्धा त्यांनी नमूद केले.


Powered By Sangraha 9.0