मुंबई : कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी ठेवण्याच्या प्रस्तावावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयाला जनतेने मात्र जोरदार विरोध दर्शवला असून त्यांच्याविरोधात ताशेरे ओढले जात आहेत. सदर मेट्रो स्थानकास शंकर नाग यांचे नाव का ठेवले गेले नाही? असा प्रतिप्रश्न नेटकऱ्यांकडून सोशल मिडियाद्वारे केला जातोय.
मिळालेल्या वृत्तानुसार, सिद्धरामय्या यांनी सेंट मेरी बॅसिलिका येथे एका कार्यक्रमात आर्चबिशप पीटर मचाडो यांना आश्वासन दिले की सरकार आगामी पिंक लाईन मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरीच्या नावावर ठेवण्याचा विचार करेल. यालाच जोडून कर्नाटक विधानसभेचे आमदार रिजवान अरशद यांनी नेटकऱ्यांच्या मताविरोधात असा युक्तीवाद केला की, सेंट मेरी बॅसिलिका शिवाजीनगर बस डेपो जवळच आहे, त्यामुळे प्रवाशांना गोंधळ होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे अनेक आगामी स्टेशन आहेत ज्यांचे नाव शंकर नाग यांच्या नावावर ठेवले जाऊ शकते."
शंकर नाग हे कन्नड भाषेतील प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी १९८० च्या दशकात परदेशातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा अभ्यास केला होता. त्यांनी बेंगळुरूमध्ये शहरी रेल्वे वाहतूक प्रणालीसाठी जोरदार पाठपुरावा केला होता. लोकांचे म्हणणे आहे की, शंकर नाग बेंगळुरूला सिंगापूरसारखे शहर बनवू इच्छित होते.