‘हे’ ब्रह्मा-विष्णु-महेश?

11 Sep 2025 14:47:33

लाख छुपावो छुप ना सकेगा, राज वो दिलका गहरा,
दिल की बात बता देता हैं, असली नकली चेहरा!

हे गीत आठवण्याचे कारण राहुल गांधी हे ब्रह्मा, अखिलेश हे विष्णु आणि तेजस्वी यादव हे महेश आहेत, असे पोस्टर्स-बॅनर्स उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी लावले आहेत. पण, त्या पोस्टरमधले या तिघांचे चेहरे? अर्थात चेहरेपट्टी, शरीरयष्टी आपल्या हातात नसते. पण, चेहर्‍याचे ते सत्तेसाठी वखवखलेले भाव, डोळ्यातली ती सत्तेसाधी स्वार्थी वृत्ती यांचे काय करायचे?

राहुल गांधी, अखिलेश आणि तेजस्वी यादव यांची हिंदू समाज, धर्म आणि श्रद्धा यांवर काय मते आहेत, हे जगजाहीर आहे. दुसरीकडे ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे हिंदू धर्मातील त्रिमूर्ती आहेत, ज्यामध्ये ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता, तर विष्णु सृष्टीचे पालनकर्ता आणि महेश किंवा शिव हे संहारकर्ता आहेत. हे तिघे मिळून जगाची निर्मिती, पालन आणि संहार या वैश्विक कार्यांचे प्रतिनिधित्व करतात, अशी हिंदूंची श्रद्धा. मात्र, उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांच्या नेत्यांना ब्रह्मा, विष्णु, महेशाची उपमा देणे, देवस्थानी मानणे हे अपचनीयच!

त्या पोस्टरबद्दल समाजवादी पक्षाचे नेते म्हणतात की, राहुल, अखिलेश आणि तेजस्वी हे शोषित-वंचित समाजाचा आवाज बनले. ते मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याकांसाठी लढाई लढतात. ते या कलियुगातील ब्रह्मा, विष्णु, महेश आहेत. काय म्हणावे? हिंदूंच्या देवदेवतांची यापेक्षा मोठी नालस्ती यापूर्वी कधी झाली नसेल! हिंदू सहिष्णू आहेत, म्हणून काय त्यांच्या श्रद्धांवर असा घाला घालायचा? राहुल गांधी म्हणा, अखिलेश म्हणा किंवा तेजस्वी म्हणा, यांचे सृष्टीचे आणि देशाचेही सोडाच; पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीही काय योगदान आहे, हा एक संशोधनाचाच विषय. मागासवर्गीय समाज, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याक समाज यांचे उत्थान तर सोडाच; पण त्यांच्या साध्या प्रश्नांसाठीही या तिघांचे काय काम आहे? या तिघांचेही योगदान हेच आहे की, हे तिघेही प्रस्थापित राजकीय कुटुंबात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले आणि या तिघांनाही सत्तेची खुर्ची आयतीच मिळाली. त्यामुळे अशा या तिघांना ‘ब्रह्मा, विष्णु, महेश’ म्हणून संबोधणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा घोर अपमान. निषेध!

दहा म्हणजे एकावर शून्य!

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे सी. पी. राधाकृष्णन हे जिंकूनही आले, तर ‘इंडी’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे पराभूत झाले. अर्थातच, या सगळ्यामध्ये ‘इंडी’ आघाडीचे धोरण आहे ‘गिरे तो भी टांग उपर.’ काँग्रेस पक्ष म्हणत आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकली. पण, त्यांचा नैतिक पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या तोंडून नैतिकतेच्या गोष्टी ऐकून समस्त देशाचे मनोरंजन होत आहे इतकेच!

असो! या निवडणुकीमध्ये ‘इंडी’ आघाडीच्या दहाजणांनी पक्षादेश झुगारून भारतीय जनता पक्षप्रणित उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान केल्याची अशी चर्चा आहे. यावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, ते दहाजण कोण, याचा अंदाज आधीच होता. पण, अंदाज आधीच होता, तर मग त्यावर उपाययोजना का बरं केली नसावी? तसेच, काँग्रेस आणि त्यांचे समर्थक मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला कशी कमी मतं पडली आणि बी. सुदर्शन यांच्या मतांची टक्केवारी कशी वाढली, असेही मत मांडत आहेत. अर्थात, मतांच्या टक्केवारीची कितीही मोजामोज केली, तरी सत्य हेच आहे की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमध्ये भाजपप्रणित उमेदवारच जिंकला आहे. एक मतानेही एखादा उमेदवार जिंकला तर तो जिंकलाच! ‘जो जिता वही छत्रपती!’ हे साधे गणित. अरे हो, पण हे साधे गणित साध्या साध्या निवडणुकीमध्ये भोपळाच मिळवणार्‍यांना कसे कळणार, नाही का? दुसरीकडे निवडणुकीमध्ये ‘इंडी’ आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले होते की, "ही निवडणूक माझ्यात आणि सी. पी. राधाकृष्णन यांच्यात नसून रा. स्व. संघ आणि सामाजिक न्याय यांच्यात आहे.” या परिप्रेक्ष्यात असे वाटते की, बी. सुदर्शन रेड्डी पराभूत होणे, हासुद्धा एक सामाजिक न्यायच आहे. सलवा जुडूम, भोपाळ वायुकांड यांच्याबाबत त्यांनी जो न्याय दिला होता, त्याचाच हा परिपाक म्हणून सामाजिक न्याय करताना त्यांना पराभूत व्हावे लागले. बाकी शून्य म्हणजे भोपळा काही ‘इंडी’ आघाडीची पाठ सोडत नाही. इथेही पाहा, दहा म्हणजे एकावर शून्य म्हणजे भोपळा आहेच!
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0