एक कोटी इनामी मनोजसह १० नक्षलवाद्यांचा छत्तीसगढमध्ये खात्मा

11 Sep 2025 20:06:54

नवी दिल्ली : छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १ कोटी रुपयांचा इनाम असलेला नक्षलवादी मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याच्यासह १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

छत्तीसगढमधील गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर पोलिस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी सकाळी, माहितीच्या आधारे ई-३०, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथकाने घनदाट जंगलात नक्षलवाद्यांवर कारवाई सुरू केली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये सुमारे १० नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत मोठे यश मिळाले आहे. एक कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण उर्फ भास्कर देखील मारला गेला. अनेक हिंसक घटनांचा मास्टरमाईंड असलेला ५८ वर्षीय मनोज हा तेलंगणाचा रहिवासी होता आणि ३५ वर्षांपासून सक्रिय होता. मनोज हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देखील होता. पोलिस बराच काळ त्याचा शोध घेत होते. नक्षलवादी मनोज हा गरियाबंद मार्गे ओडिशाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा केला आहे.

रायपूर रेंजचे आयजी अमरेश मिश्रा यांनी सांगितले की, सुरक्षा दले गस्तीवर असतानाच त्यांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या कारवाईमध्ये एसटीएफ, कोब्रा (सीआरपीएफची कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन) आणि राज्य पोलिस कर्मचारी सहभागी आहेत. नक्षलवाद्यांविरोधात सायंकाळी उशीरापर्यंत चकमक सुरू होती.

त्याचवेळी छत्तीसगढच्याच नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलिस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, सर्व १६ नक्षलवादी हे कनिष्ठ फळीत कार्यरत होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळ आणि माओवाद्यांच्या पंचायत मिलिशियाच्या सदस्यांसह विविध युनिट्सशी संबंधित होते.


Powered By Sangraha 9.0