महापारेषणच्या पाचगाव उपकेंद्राचे काम वेळेआधीच पूर्ण ; मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

10 Sep 2025 17:59:23

मुंबई, 
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नागपूर परिमंडळांतर्गत २२० के. व्ही. पाचगाव उपकेंद्र आणि संलग्नित २२० के.व्ही. कन्हान-उमरेड लिलो विद्युत वाहिनी (२२ सर्किट कि.मी.) वेळेच्या तब्बल आठ महिने अगोदरच पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणचे कौतुक केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाचगाव येथील २२०/३३ के. व्ही. उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो वाहिनी निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. पाचगाव उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका आणि लगतच्या नागपूर ग्रामीण भागातील घरगुती तसेच औद्योगिक विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे या उपकेंद्रामुळे विद्युत ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.

महापारेषणचे संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतीश अणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमूने २२० के.व्ही. पाचगाव उपकेंद्र व वाहिनीचे काम कार्यपूर्ती कालावधीच्या तब्बल ८ महिने आधी पूर्ण करून नवा रेकॉर्ड केला आहे.प्रकल्पाचे कंत्राट कार्यादेश दि. २६ फेब्रुवारी २०२४ मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशन, रत्नागिरी या कंपनीला देण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम दि. ११.०४.२०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते.

महापारेषणचे नावीन्यपूर्ण उपक्रम : डॉ. संजीव कुमार

संभाव्य विजेची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) अति उच्च दाब प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वेक्षण आणि अंमलबजावणी वेळेत आणि अचूक केल्यामुळे आता प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, असे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी सांगितले.

प्रकल्प वेळेत पूर्ण करणार : अविनाश निंबाळकर

सध्या विजक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. त्या दृष्टीने पॉवरग्रीडनंतर महापारेषण कंपनी २०० कोटींच्या वरील सर्व टी.बी.सी.बी. प्रकल्पामध्ये भाग घेऊन ते सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याचे महापारेषणचे संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0