निवडणुकीच्या राजकारणामुळेच ट्रम्प यांना पश्चातबुद्धी!

    10-Sep-2025
Total Views |

भारतावर तब्बल ५० टक्के आयातशुल्क लावण्याचा आपला निर्णय चुकला आहे, याची जाणीव ट्रम्प यांना होत आहे. त्याचा विपरीत परिणाम पुढील वर्षी होणार्या काँग्रेसच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षावर होईल, याची जाणीवही त्यांना झाली आहे. याचे कारण त्यांचे सर्वांत मोठे मतदार हे अमेरिकन भारतीय आहेत. त्यांना भारताच्या हिताला बाधा आणणारी धोरणे मान्य होणार नाहीत, हे ट्रम्प यांनी ओळखले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरील आयातशुल्काबाबत, तळ्यात-मळ्यातचा खेळ सुरू आहे. रशियाकडून कच्चे तेल घेतल्याबद्दल भारतावर ५० टक्के आयातशुल्क लागू करण्याचा पूर्णपणे अव्यवहारी आणि अविचारी निर्णय जाहीर केल्यावर, ट्रम्प यांना आता शहाणपण सूचत आहे असे दिसते. "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र असून, आपण भारताशी लवकरच व्यापारी करार करू,” असे मत ट्रम्प यांनी नुकतेच व्यक्त केले. इतके दिवस या आयातशुल्काबाबत अरेरावी आणि मग्रुरीची भाषा करणार्या ट्रम्प यांच्या भाषेत हा अचानक बदल कसा झाला? त्याचे एक संभाव्य कारण पुढील वर्षी होणार्या काँग्रेसच्या निवडणुकीत आहे. अनेक राज्यांचे गव्हर्नर, विधानसभा आणि संसदेचे प्रतिनिधीगृह आणि सेनेटच्या काही जागा यांच्या निवडणुका, पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकी मतदारांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेतल्यास हे मतदार दुखावले जातील आणि आपल्या पक्षाला मतदान करणार नाहीत, अशी जाणीव ट्रम्प यांना झाल्यानेच त्यांनी आता एकाएकी नरमाईची भाषा सुरू केली आहे.

गतवर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या ट्रम्प यांच्या विजयात, तेथील भारतीय अमेरिकन नागरिकांचा वाटा महत्त्वाचा होता. मोदी यांची ट्रम्प यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रृत आहे. तसेच, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांवर मोदी यांचा जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे मोदी यांच्या इच्छेला मान देऊन, तेथील बहुसंख्य भारतीय वंशाच्या मतदारांनी ट्रम्प यांना मतदान केले आणि ते अभूतपूर्व मताधियाने विजयी झाले.

अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय हे त्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप झाले असले, तरी त्यांनी भारताशी जुळलेली आपली नाळ तोडलेली नाही. या भारतीयांचे बहुतेक नातेवाईक आजही, भारतातच राहतात. त्यामुळे भारताशी असलेले त्यांचे नाते आजही निकटचे आहे. बरेच भारतीय जरी अमेरिकेशी एकरूप झालेले असले, तरी त्यांना भारताच्या हिताची काळजी आहे. अमेरिका हा भारताचा खंदा मित्रदेश असावा, ही अमेरिकेतील बहुसंख्य भारतीयांची इच्छा असते.

ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी, भारताशी असलेली मैत्री अधिकच गहिरी केली होती. तसेच, पाकिस्तानला त्यांनी फटकारले होते आणि चीनच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. मोदी यांनी त्यांना भारतात आमंत्रित केले आणि येथे आल्यावर त्यांचे भरघोस स्वागत आणि आदरातिथ्य केले. या सगळ्यामुळे ट्रम्प हे भारताचे मित्र आहेत, अशी प्रतिमा उभी राहिली. म्हणूनच गतवर्षी झालेल्या निवडणुकीत ते निवडून आल्यावर, भारतातही उत्साही आनंद व्यक्त करण्यात आला होता. त्या निवडणुकीच्या प्रचार काळात ट्रम्प यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली होती, तसे करणारे ते एकमेव अमेरिकी नेते होते.

मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ट्रम्प यांच्या भारतविषयक भूमिकेत एकदम बदल झाला. त्यांना एकाएकी पाकिस्तानच्या प्रेमाचे भरते आले. यामागे भारताने जगाला घडविलेल्या आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याचे दर्शन असावे, अशी शयता आहे. अमेरिकेने पाकिस्तानी भूमीचा वापर आपली अण्वस्त्रे लपविण्यासाठी आणि चीन, रशिया व इराणच्या विरोधात ती तैनात करण्यासाठी केल्याचे सत्य ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगजाहीर झाले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ही अण्वस्त्रे भारत केव्हाही नष्ट करू शकतो, या वस्तुस्थितीची जाणीव आणि दर्शन या लष्करी संघर्षात अमेरिकेला झाल्याने ट्रम्प अस्वस्थ झाले. भारतीय हवाई दलाने किराना टेकड्यांवर केलेला हल्ला हे त्याचे प्रमाण आहे. शिवाय अमेरिकेने कितीही निर्बंध भारतावर लादले, तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा कसलाच परिणाम होत नाही, उलट त्याची प्रगती वेगाने सुरू आहे हे पाहूनही, ट्रम्प यांची चरफड वाढतच गेली. अमेरिकेला आव्हान देणार्या देशाचे पंख छाटण्यास, अमेरिका नेहमीच प्राधान्य देते. लष्करी आणि आर्थिक ताकदीत चीनला आपल्याशी बरोबरी करण्यास आपण सवलत दिली आणि आज चीन आपल्याला आव्हान देत असल्याचा पश्चात्ताप अमेरिकेला होत आहे. त्यांना ती चूक भारताच्या बाबतीत पुन्हा करायची नाही. भविष्यात भारत हा आणखी एक आव्हानवीर देश उभा राहील, हे लक्षात आल्यामुळेच ट्रम्प यांनी एकाएकी भारतविरोधी भूमिका घेतली आहे.

ट्रम्प यांना आता सूचलेले शहाणपण हे पुढील वर्षी होणार्या काँग्रेसच्या निवडणुकीच्या संभाव्य निकालांचा परिणाम आहे. अमेरिकेत स्थायिक झालेली कोणतीच भारतीय वंशाची व्यक्ती, भारतावर अवाजवी आयातशुल्क लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही. तसेच, अमेरिकेची भारतविरोधी आणि पाकिस्तानवादी भूमिकाही, त्यांना मानवणारी नाही. कोणतीही अमेरिकन भारतीय व्यक्ती ट्रम्प यांच्या ‘मागा’ (मेक अमेरिका ग्रेट अगेन) धोरणाशी सहमत असली, तरी त्यासाठी ती त्यांच्या भारतविरोधी भूमिकेला पाठिंबा देणार नाही. ट्रम्प जर सातत्याने भारताच्या हिताला बाधा आणणारी आणि पाकिस्तानला अवाजवी झुकते माप देणारी भूमिका घेणार असतील, तर हे भारतीय मतदार ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करतील, हे उघड आहे. अमेरिकेला शक्तिशाली करण्यास त्यांचा विरोध नाही; पण ते काम भारताच्या हिताचा बळी देऊन करण्यास त्यांची मान्यता नाही. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्रदेश असावेत, ही बहुतेक भारतीयांची मनोमन इच्छा असते. कारण, बहुसंख्य भारतीयांना अमेरिकेच्या सुबत्तेचे आणि स्वतंत्र जीवनशैलीचे आकर्षण आहे. भारतीयांची ती प्रेरणा आहे, म्हणूनच अमेरिकेने भारताला ‘विकसित राष्ट्र’ होण्यासाठी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते. या स्थितीत ट्रम्प यांचे धोरण याच्या नेमके विपरीत असेल, तर त्यांना या मतदार समूहाचा पाठिंबा मिळणे अवघड जाईल. हे लक्षात आल्यामुळेच ट्रम्प यांनी आता समन्वयाचा सूर लावला आहे.

राहुल बोरगांवकर