‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या निवडणुकीला मतचोरीचे ग्रहण!

10 Sep 2025 14:05:46

मुंबई :
‘मुंबईतील साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वातील महत्त्वपूर्ण संस्था’ अशी ओळख असलेल्या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या निवडणुकीमध्ये मतचोरीचा गंभीर घोटाळा झाल्याचा आरोप ‘डॉ. भालेराव विचार मंचा’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या सभागृहात पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या सभागृहात, ‘डॉ. भालेराव विचार मंचा’चे उमेदवार ‘साहित्य अकादमी’चे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या नियमक मंडळाचे दिवाकर दळवी यांनी पत्रकार परिषद घेत, ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या अपारदर्शी कारभारावर ताशेरे ओढले.

‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या निवडणुकीची अधिसूचना प्रमुख कार्यवाहंच्या सहीने जाहीर केली गेली, निवडणूक अधिकारी म्हणून यशोधन दिवेकर असतील, असेसुद्धा जाहीर झाले. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी, सभासदांच्या याद्या अद्यावत करणे अपेक्षित होते. नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी ‘याद्या अद्यावत होतील,’ अशी हमीसुद्धा दिली. मात्र, आजमितीला अनेक सभासदांना (त्याचबरोबर काही उमेदवारांनासुद्धा) मतपत्रिका मिळालेल्याच नाही. ज्यावेळेस निवडणुकीची सूचना लोकांकडे गेली, त्यावेळेस कितीतरी लोकांचे पत्ते बरोबर नव्हते, त्याचबरोबर अनेक मृत व्यक्तींनादेखील मतपत्रिका पाठवण्यात आल्या, ज्या परत आल्या, याचाच अर्थ, याद्या अद्ययावत झालेल्या नाहीत. जवळपास २०० लोकांना मतपत्रिका न मिळता, त्या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’कडेच परतल्या. त्याचबरोबर ६०० मतपत्रिका गहाळ झाल्याचा धक्कादायक आरोप ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी कार्यवाह समितीवर केला आहे. निवडणूक अधिकार्‍यांकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती ‘डॉ. भालेराव विचार मंचा’ने दिली. यासंदर्भात ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या अध्यक्ष उषा तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.

खासगी वितरण संस्थेकडून ऊर्जा पॅनेलच्या जाहीरनाम्याचे वाटप!

"संस्थेच्या माध्यमातून पोस्टाने सदस्यांना मतपत्रिका पाठवणे अपेक्षित असे. मात्र, मतपत्रिका अंधेरी, जोगेश्वरी येथील ‘श्रीजी एंटरप्राईज’ या खासगी वितरण संस्थेच्या माध्यमातून पोहोचवल्या गेल्या. त्यातदेखील, ऊर्जा पॅनेलचा जाहीरनामा मतदारांना मिळाला. मात्र, मतपत्रिका त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. हे कसे घडू शकते?” असा सवाल ‘डॉ. भालेराव विचार मंचा’ने उपस्थित केला आहे. "ऊर्जा पॅनेलचे उषा तांबे डॉ अश्विनी भालेराव, तथा संघातील कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ४०० ते ५०० मतपत्रिका चोरून लपवून ठेवले आहेत, तसेच योग्य वेळी त्या पेटीत टाकण्याची योजना त्यांनी आखली आहे,” असा आरोप ‘डॉ. भालेराव मंचा’च्या उमेदवारांनी केला आहे. "मुंबई मराठी साहित्य संघा’ने मतपत्रिका पाठवण्याचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला दिले. त्यांनी या मतपत्रिका प्रत्यक्षात न पाठवता केवळ बुकिंग रिसीट साहित्य संघात जमा केल्या; याचा अर्थ हा फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा आहे,” असा आरोप डॉ. भालेराव विचार मंचाच्यावतीने करण्यात आला आहे.

हमीपत्राचा अजब फतवा!

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची अखेरची तारीख १७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली असून, ज्यांना मतदान करायचे आहे, त्यांनी संघाच्या कार्यालयात येऊन आधारकार्डसह हमीपत्र देण्याचा अजब फतवा कार्यकारिणीने काढला आहे. यावर ‘डॉ. भालेराव मंचा’ने ७० ते ८० वर्षांवरील सभासदांनी, संस्थेच्या प्रशासनाच्या चुकीची शिक्षा का भोगावी, असा सवाल केला आहे.


Powered By Sangraha 9.0