मुंबई, इंमेक्स एसएमएम इंडियाच्या माध्यमातून मुंबईतील गोरेगाव येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे सागरी प्रदर्शन व परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या प्रदर्शनाचे १४वे वर्ष आहे. दि.१० ते १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयोजित या परिषदेत जगभरातील सागरी तज्ञ एकत्र येऊन सागरी क्षेत्रातील नवकल्पना व धोरणांवर सखोल संवाद साधतील. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राला जागतिक सागरी केंद्र बनविण्याचा महत्वाकांक्षी दृष्टिकोन स्पष्ट केला. राज्याची शिपबिल्डींग, शिप रिपेअर आणि शिप रिसायकलिंग पॉलिसी २०२५या धोरणाचे महत्व सांगून सागरी क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा विशेष लाभ होईल असेही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी श्याम जगन्नाथन (डिरेक्टर जनरल ऑफ शिपिंग), मोनिका नागेलगार्ड (रॉयल नॉर्वेजियन कॉन्सुलेट जनरल, मुंबई), इन्स्पेक्टर जनरल भीष्म शर्मा, सब्यसाची हजारा (चेअरमन – INMEX SMM इंडिया सल्लागार मंडळ), योगेश मुद्रास (एमडी इन्फॉर्मा मार्केट्स इंडिया) व उल्हास बोयासी (हॅम्बर्ग मेसे आणि काँग्रेस जीएमबीएच) उपस्थित होते.
राणे म्हणाले की, महाराष्ट्र भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक योगदान देणारे राज्य असून त्याच्या बंदरांचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. राज्यात सहा प्रमुख शिपयार्ड क्लस्टर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असून, मुंबई वॉटर मेट्रोसारख्या जलवाहतुकीच्या प्रकल्पांमुळे सागरी क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. त्याचप्रमाणे वाढवणसह प्रमुख बंदरांशी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करून महाराष्ट्र निर्यातवाढ व औद्योगिक प्रगतीत आघाडीवर राहणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व देशी-विदेशी ब्रँड्स आणि प्रतिनिधींना शुभेच्छा देत मंत्री नितेश राणे यांनी पुढील तीन दिवसांत नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.