संपूर्ण देशभरात मतदार यादींच्या विशेष गहन पुनरीक्षणाची तयारी

10 Sep 2025 15:53:16

नवी दिल्ली, मतदारयादी विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) संपूर्ण देशभरात राबवण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्यांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. देशभरात मतदार सूची पुनरावलोकनाची अंमलबजावणी, त्यातील अडचणी व उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसआयआर धोरणाची माहिती दिली. तर बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव सामायिक केले. बिहारनंतर ही प्रक्रिया देशातील इतर राज्यांतही राबवण्याचे नियोजन करण्यात आले असून, आयोगाच्या संकेतांनुसार यावर्षाअखेरीस आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये, २०२६च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच गहन पुनरीक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यात ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर झालेली ही तिसरी बैठक होती. मात्र, दिवसभर चाललेल्या या चर्चेला विशेष महत्त्व होते, कारण यात देशव्यापी स्तरावर एसआयआर प्रक्रिया राबवण्याचा आराखडा ठरवण्यात आला.

या गहन पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार सूची अधिक काटेकोर करणे आणि त्यामधील चुका दूर करून अवैध विदेशी स्थलांतरितांना यादीबाहेर काढणे हा आहे. बांग्लादेश व म्यानमारमधून भारतात घुसखोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव योग्यरीत्या नोंदले जाईल आणि अवैध नावांचा समावेश होणार नाही.

प्रत्येक राज्यात मतदार यादींचे घरोघरी जाऊन पडताळणी होणार

त्रुटिरहित व विश्वासार्ह मतदार सूची तयार करणे

अवैध विदेशी स्थलांतरितांना मतदार यादीबाहेर ठेवणे

आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये यावर्षाअखेरीस प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

Powered By Sangraha 9.0