कल्याण, केडीएमसीच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृहात एका नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या मृत्यूला प्रसुतीगृहातील डॉक्टर्स आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या आरोपापश्चात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी बाळाच्या प्रसुतीगृहातील डॉक्टर्स आणि कर्मचारी जबाबदार नसल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान बाळाच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण उघड होणार आहे.
तस्लीमा मन्सूरी यांच्या नवजात बालिकेचा दि. 7 सप्टेंबरला प्रसुतीगृहामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी प्रसुतीगृहातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मन्सूरी या दुस:या खेपेच्या प्रसुतीसाठी दि. 6 सप्टेंबर रोजी प्रसुतीगृहात दाखल झाल्या होत्या. तिने बालिकेस जन्म दिला. बालिकेची जन्मावेळी प्रकृती व्यवस्थित असल्याने ऑक्सीजनची गरज नव्हती म्हणून ऑक्सीजन काढण्यात आले. जन्माच्या आधी बालिकेने आईच्या पोटात शौच केली असल्याचे बालरोगतज्ञांनी सांगितले. बालरोगतज्ञांच्या तपासणीच्या वेळी बालिकेचा श्वासोच्छावासाचा दर नॉर्मल होता. बालिका व्यवस्थीतरीत्या स्तनपान घेत असल्यामुळे तिला तिच्या आईजवळ ठेवण्यात आले. दुस:या दिवशी बालिकेचा हदयाचे ठोके लागत नव्हते. श्वासोच्छावास चालत नव्हता त्यामुळे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका:यांनी बालरोगतज्ञांना बोलावले. बालरोगतज्ञांनी बालिकेस तपासून मृत घोषित केले. बालिकेच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला आहे. जन्मानंतर बालिकेची प्रकृती उत्तम होती. त्यामुळे बाळाला एनआयसीयू मध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता. ऑक्सीजन पुरवठा करण्याची ही आवश्यकता लागत नव्हती. बालिकेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या मृत्यूला प्रसुतीगृहातील डॉक्टर्स आणि कर्मचारी जबाबदार नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.