डहाणू : ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा’चे काम महाराष्ट्रात प्रत्यक्षात वेग घेऊ लागले असून, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुयातील साखरे गावात ऐतिहासिक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. येथे तब्बल ९७० मेट्रिक टन वजनाचा आणि ४० मीटर लांबीचा बॉस गर्डर अत्यंत यशस्वीरित्या बसवण्यात आला असून हा भारताच्या बांधकाम इतिहासातील सर्वांत जड गर्डर मानला जातो. यामुळे प्रकल्पाच्या महाराष्ट्र विभागाला नवी गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (हाय-स्पीड रेल्वे)’ प्रकल्प हा भारतातील एक क्रांतिकारी पायाभूत विकास प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे ५०८ किमी असून, त्यातील महाराष्ट्रातील विभागाची लांबी १५६ किमी इतकी आहे. या विभागात तीन प्रमुख स्थानके, बोगदे (टनेल्स), उंचावरील मार्गिका (व्हायाडट्स) आणि एक भुयारी स्थानक (अंडरग्राऊंड स्टेशन- मुंबईतील) यांचा समावेश आहे.
फुल-स्पॅन बॉस गर्डर तंत्रज्ञान
साखरे येथे बसवण्यात आलेल्या गर्डरमध्ये पहिल्यांदाच फुल-स्पॅन बॉस गर्डर तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.
या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
१) पूर्णपणे प्री-कास्ट (कारखान्यात तयार) गर्डर
२) ४० मीटर लांबीचे मोठे स्पॅन एकाच वेळी बसवण्याची क्षमता
३) पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत दहापट जलद बांधकाम
४) सुरक्षा आणि दर्जाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी
पालघरमध्ये लिहिला जातोय गतीचा नवा अध्याय
गुजरातमध्ये याच तंत्रज्ञानावर आधारित ३०७ किमी लांबीचा व्हायडट यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रात त्याच यशाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे, उर्वरित मार्गिकेच्या कामांनाही लक्षणीय वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प देशाच्या गतिमान प्रगतीचे प्रतीक ठरत असून, त्याचे यश हे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीचेही द्योतक आहे. पालघर जिल्ह्यातील साखरे गावातील ही कामगिरी भविष्यातील अधिक व्यापक विकासाचा संकेत देत आहे.
भारताच्या बांधकाम इतिहासातील सर्वांत जड गर्डर
साखरे येथे बसवलेला हा प्रचंड वजनाचा बॉस गर्डर फक्त एक बांधकाम तंत्रज्ञानाचा विजय नसून, हा भारताच्या बांधकाम इतिहासातील सर्वांत जड गर्डर आहे. तो भविष्यात प्रगत भारताचे प्रतीक आहे. या माध्यमातून पालघर व आसपासच्या भागात रोजगार, संपर्क आणि औद्योगिक विकासाची दारे उघडत आहेत. प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा आणि प्रशासनाची समन्वित कृती लाभल्यास, हा प्रकल्प भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल, यात शंका नाही.