माणुसकी संपताना...

10 Sep 2025 12:09:37

अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यात तिसर्‍यांदा भूकंप झाला असून आतापर्यंत २ हजार, २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक जखमी झाले, गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. निश्चितच ही एक नैसर्गिक आपत्ती होती मात्र, अफगाण महिलांसाठी ही नैसर्गिक न राहाता, मानवनिर्मित आपत्तीदेखील ठरली आहे. तालिबानमधील कठोर ‘शरिया’ कायद्यामुळे, महिलांपर्यंत आवश्यक मदत वेळेवर पोहोचलीच नाही. यातूनच तालिबानी राजवटीतील महिलांची भयावह स्थिती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. तालिबानी कायद्यानुसार परपुरुष महिलांना स्पर्श करू शकत नाहीत, यामुळेच तालिबान मधील पुरुष महिलांना सहकार्य करण्यास नकार देत असल्याचे चित्र अफगाणिस्तानात दिसत होते.

अफगाणिस्तानातील पर्वतीय भागात अलीकडेच झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, आतापर्यंत ४९ गावांमधील ५ हजार, २३० घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून, ६७२ घरांचे नुकसान झाले. परंतु, ४४१ बाधित गावांपैकी ३६२ गावांपर्यंत मदत आणि बचाव पथके अद्याप पोहोचलेलीच नाहीत. ढिगार्‍यातून मृतदेह बाहेर काढताना मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, या आपत्तीमुळे सुमारे पाच लाख लोक प्रभावित झाले आहेत. यापैकी बरेचजण निर्वासित आहेत, ज्यांना अलीकडेच पाकिस्तान आणि इराणमधून जबरदस्तीने परत आणण्यात आले होते.

डोंगराळ आणि दुर्गम भागातील रस्ते खराब झाल्यामुळे, मदत पथकांना बाधित गावांपर्यंत पोहोचणे निश्चितच कठीण जात आहे. भूकंपानंतर मलब्याखाली अडकलेल्या महिलांना वाचवण्याचा प्रयत्नही झाला नसल्याचे समोर येत आहे. वडील, पती, भाऊ किंवा मुलगा यांच्या व्यतिरिक्त परपुरुष कुठल्याही महिलेस हात लावू शकत नाही, असे तालिबानचा कठोर कायदा सांगतो. परिणामी महिलांना तासन्तास मलब्याखालीच थांबावे लागले. याठिकाणी एक समस्या अशी की, तेथील बचावकार्यात महिलावर्ग कुठेच सक्रिय नव्हता. कारण, तालिबानने गेल्या काही वर्षांत महिलांना वैद्यकीय शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनापासून दूरच ठेवले. काही पुरुष बचावकर्मी कपड्यांनी ओढून महिलांना बाहेर काढत होते. पण, योग्य वैद्यकीय मदत मिळेपर्यंत उशीर झालेला होता. अनेक महिला जखमी अवस्थेतही कोपर्‍यात बसवून ठेवल्या गेल्या कारण, त्यांच्यावर उपचार करणार्‍या महिला डॉटर उपलब्ध नव्हत्या. अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र महिला प्रतिनिधी सुसान फर्ग्युसन यांनी सांगितले की, "महिलांच्या गरजा या मदत व पुनर्वसनात प्राथमिक असायला हव्यात. पण, प्रत्यक्षात महिलांना बचाव आणि मदत या दोन्हींपासून वंचित ठेवण्यात आले आहे.”

आज अफगाण महिला जगातील सर्वाधिक कठोर लैंगिक बंधनांमध्ये जगत असल्याचे आपण पाहतो. गेल्या चार वर्षांत तालिबानने अफगाणिस्तानच्या नागरिकांवर ‘शरिया’ची कठोर व्याख्या लादल्याने, महिलांचे शिक्षण, रोजगार आणि स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. मुलींना शाळा आणि विद्यापीठात जाण्याची सुद्धा मनाई आहे. बहुतेक नोकर्‍यांमध्ये महिला काम करू शकत नाहीत तसेच, स्वयंसेवी संस्था किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही सहभागी होऊ शकत नाहीत. उद्यान, व्यायामशाळेसारखी सार्वजनिक ठिकाणेदेखील त्यांच्यासाठी बंदच आहेत. त्यामुळे जेव्हा आपत्ती आली, तेव्हा महिलांकडे न बचावकर्मी होत्या, न महिला डॉटर, न समानतेने मदत मागण्याचा अधिकार. अफगाणी महिलांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा केवळ अपघात नव्हता, तर गेल्या चार वर्षांपासून तालिबानच्या कठोर शासनाचे थेट परिणाम होते.

तालिबानसारख्या दहशतवादी गटांनी ‘शरिया’ संकुचित स्वरूपात राबवला आहे. परिणामी माणुसकी, करुणा, समानता या मूलभूत मूल्यांना धक्का बसतो. भूकंपासारख्या आपत्तीमध्ये धर्म, जात, लिंग यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवाचा जीव वाचवणे. जीव वाचवणे हे प्रत्येक धर्मात सर्वोच्च पुण्य मानले गेले आहे. जर एखादा नियम जीव वाचवण्याऐवजी त्याला धोका निर्माण करत असेल, तर तो नियम मानवी हिताशी विसंगत ठरतो. इतिहासात इस्लामी विद्वानांनी ‘शरिया’चे अर्थ लावताना दया, न्याय आणि करुणा यांना प्राधान्य दिले पण, तालिबानने त्याचा कठोर आणि राजकीय वापर करून, महिलांवर व इतरांवर निर्बंध लादले. त्यामुळे ‘शरिया’ हा धर्मनियम न राहता, दडपशाहीचे साधन बनला आहे.
Powered By Sangraha 9.0