आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणापासून दुरावलेल्यांचे भविष्यही अंधकारमय. पण, समाजात काही देवदूत असेही असतात, जे गरजूंना आर्थिक साहाय्य करून त्यांचे भविष्य सर्वार्थाने प्रकाशमान करण्याकरिता प्रयत्नशील असतात. त्यापैकीच एक सामाजिक संस्था असलेल्या ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’च्या ध्येयाधिष्ठीत वाटचालीविषयी...
दान दिले गरजूंना, शिक्षणापायी
उभारली अनेक व्यक्तिमत्त्वे, जगण्यापायी॥जगण्यावर संस्कार करणारी बाब म्हणजे शिक्षण. आज समाजात असे अनेक गरजवंत आहेत, जे मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत आणि शिक्षणासाठी धडपडत आहेत. याच धडपडीची जाणीव ठेवून गरजवंतांना आर्थिक साहाय्य प्रदान करणार्या आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे बीजारोपण करणार्या ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ या संस्थेचे कार्य अनेकांसाठी आज प्रेरणा ठरत आहे.
१९९२ साली सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावण्याकरिता डॉ. शिवराम आठवले आणि डॉ. मोरेश्वर पराडकर या वर्गमित्रांनी मिळून ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ची स्थापना केली. जात-पंथाचा विचार न करता, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यास सातत्याने प्रयत्न करणे, तांत्रिक, व्यावसायिक, प्रथमोपचार, परिचारिका व रुग्णसेवा इत्यादी शिक्षण व प्रशिक्षणासाठी साहाय्य करणे; नवसमाजनिर्मितीचा हेतू ठेवून गाव-खेडे दत्तक घेणे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे इत्यादी ध्यास डोळ्यांसमोर ठेवून ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ची वाटचाल सुरू झाली आणि आजतागायत ३३ वर्षे या संस्थेचे समाजोपयोगी कार्य यशस्वीरित्या सुरू आहे.
आजतागायत या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. मुख्यतः शेकडो गरजू विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयांकरिता शुल्क भरणे, महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळांना, अनाथ, दारिद्य्र रेषेखालील व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना, वीटभट्टी कामगार, पारधी समाज, तमासगिरांची मुले अशा अनेक स्तरांतील मुला-मुलींना, विविध समाजोपयोगी संस्थांना ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ने साहाय्य केले आहे. तसेच, यावर्षी २५० डझन वह्या, वॉटर फिल्टर, छत्र्या, चपला, रेनकोट, क्रीडा साहित्य अशा शालोपयोगी साहित्याचे वाटपही या संस्थेमार्फत मोफत करण्यात आले. मुख्यतः यात फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच आर्थिक साहाय्य न करता, दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या काही विद्यार्थिनी व ग्रामीण भागातील गरजू महिलांना शिवणकलेकरिता शिलाईकामाचे प्रशिक्षण व शिलाई मशीन यांचेही दान करण्यात आले.
महाराष्ट्रात आजही काही ग्रामीण भागात गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहा ते दहा मैल चालत घर गाठावे लागते. याकरिता प्रवासाचा खर्च आणि सायकली यांचेही न्याय्य वाटप करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, विद्यापीठातून ‘संस्कृत’ विषय घेऊन ‘बीए’ आणि ‘एमए’च्या परीक्षेत सर्वप्रथम येणार्या विद्यार्थ्यांना ‘डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सामाजिक संस्थेतील मुलांना इंग्रजी संभाषण शिकविण्यासाठीही ट्रस्टतर्फे शिक्षकांची नेमणूक केली जाते. अशा अनेक विद्यार्थांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, याकरिता ही संस्था सतत सामाजिक भान जपत मदतीस तत्पर असते.
याच मदतीमुळे अनेक विद्यार्थी समाजात मानाने आणि अभिमानाने त्यांचे उज्ज्वल भविष्य जगत आहेत. किशोर पोळ हेदेखील त्यांपैकीच एक. ते दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परिणामी, अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागला. त्यातूनच मार्ग काढत त्यांनी दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथेच न थांबता त्यांनी पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ‘एमकॉम’ आणि ‘कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाऊंटंट’ (उचअ) या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. परंतु, या प्रवासात त्यांना अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले. अशातच त्यांची ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’च्या विश्वस्त उज्ज्वला पवार यांच्याशी ओळख झाली. उज्ज्वला पवार यांच्या सहकार्याने किशोर यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलला गेला आणि आज समाजात ‘उचअ किशोर पोळे’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. "स्वप्न पाहा, कारण ती पूर्ण होतात. प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सगळं शक्य होतं,” असे ते आज स्वानुभवातून सांगतात. आजच्या पिढीतील उद्याच्या भविष्याला घडवताना कार्यरत राहणे, हा ध्यास कायम मनात ठेवून सामाजिक कार्याची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणार्या या संस्थेला आणि संस्थेच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ या संस्थेची विश्वस्त आणि सचिव म्हणून कार्य करताना, १९९२ सालापासून शेकडो विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून सकारात्मक प्रेरणा देण्याचे सातत्याने काम करीत आहे. गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होऊ नये, याकरिता त्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. आर्थिक साहाय्य इतकेच ध्येय डोळ्यांसमोर न ठेवता, संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठीही संस्था प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांतून २०१२ साली ‘संस्कृत संमेलन’ भरवले गेले होते. संस्कृतच्या प्रसारासाठी अनेक स्पर्धा-उपक्रमांचे आयोजन, ‘सम्भाषणसन्देश’, ‘गीर्वाणसुधा’, ‘संस्कृत चंदामामा’ यांमार्फत लिखाण करणे असे अनेक उपक्रमही संस्थेमार्फत राबवले जातात. यापुढेही ‘सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट’ ही ‘संस्थेचा श्वास चाले, शिक्षणाचा ध्यास धरूनी’ या उक्तीप्रमाणे अखंडितपणे कार्य करित राहील.
- उज्ज्वला पवार, विश्वस्त,
सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट