जगामध्ये अर्थशास्त्राची अनेक प्रारूपे मांडली गेली. त्यांवर अनेक विचारधारा उभ्या राहिल्या आणि जगरहाटी सुरूच राहिली. मात्र, सूक्ष्म अवलोकन केले असता असे दिसते की, पर्याय म्हणून आलेल्या प्रत्येक प्रारूपाने शाश्वत उपाययोजना दिली नाही. तत्कालिक उपाययोजनांवरच समाधान मानले. त्यामुळे जगात मूलभूत समस्या कायम राहिल्या. त्यांच्या कारणांचा घेतलेला आढावा...
१७व्या ते १९व्या शतकात युरोपात झालेल्या वैचारिक घुसळणीला ख्रिस्ती धर्माची पार्श्वभूमी तर होतीच, पण त्याचबरोबर एक दुसरी महत्त्वाची पार्श्वभूमी होती ती म्हणजे जागतिक विस्तारवादाची. पुनरुज्जीवन कालखंडात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे युरोप मानवी इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता, तो टप्पा म्हणजे औद्योगिक क्रांतीचा. औद्योगिक क्रांतीने उत्पादनाच्या पद्धती आणि प्रमाण यांत आमूलाग्र बदल घडवत, बाजारपेठा, वस्तूंचे मूल्य आणि सामाजिक संपत्तीचे आकलन मूलभूत स्वरूपात बदलले. या बदलांना युरोपीय राष्ट्रांचा विस्तारवाद एकाचवेळी कारणीभूत आणि परिणामस्वरूप अशा दोन्ही प्रकारे होता. विस्तारवादामुळे औद्योगिक क्रांतीस चालना मिळाली. औद्योगिक क्रांतीने या नवीन वसाहतींवरील युरोपीय पकड अधिक घट्ट केली. पुनरुज्जीवन आणि प्रबोधन काळातील वैचारिक प्रवाहांचा प्रभाव युरोपच्या आर्थिक संपन्नतेवर थेटपणे झालेला आहेच, परंतु जागतिक सत्ता स्थापन करून संपूर्ण जग कह्यात घेण्याच्या वसाहतवादी धोरणाचा परिणामहे आर्थिक सिद्धांतांवरही उघडपणे दिसतो. युरोपातील अर्थविषयक विचारप्रवाह आणि भारतीय तसेच जागतिक संदर्भांतील त्यांची उपयुक्तता या विषयांची चर्चा आपण या भागात करू.
अर्थशास्त्राचा सामान्य अर्थ म्हणजे वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन व उपभोग, त्यांच्या विनिमयाच्या पद्धती, वित्तव्यवहार, करप्रणाली आणि आर्थिक व्यवहारांसंबंधी राज्यशासनाची कार्ये इत्यादी सर्व विषयांचा अभ्यास. औद्योगिक क्रांती पूर्वीच्या जगात अर्थशास्त्र हे मुख्यत्वे व्यापाराशी निगडित होते. हा व्यापार बहुतांशरित्या किमती वस्तूंच्या व्यापारापुरता मर्यादित होता आणि त्यात सामान्य नफ्या-तोट्याचा विचार होता. उत्पादनाची साधने, त्यांच्या मालकीचे मूलस्रोत, वस्तूच्या मूल्याचे अधिष्ठान यांसारखे तात्त्विक विचार त्या काळात झालेले नव्हते. परंतु जागतिक व्यापारास एक प्रकारची चालना मिळाल्याने राज्यसंस्था, त्यांनी लावलेल्या करांचे आणि निर्बंधांचे महत्त्व आणि एकूण व्यापाराच्या भरभराटीसाठी अनुकूल अशा राज्यसंस्थेची आवश्यकता या काळात लक्षात आली होती. अॅडम स्मिथच्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या युरोपीय अर्थशास्त्राचा आदिग्रंथ मानल्या जाणार्या ग्रंथाकडे या पार्श्वभूमीतून पाहायला हवे. अॅडम स्मिथवर प्रबोधनकाळातील ईश्वरसंकल्पनांचा प्रभाव तर होताच, परंतु वसाहतींमधून, विशेषतः अमेरिकेतून येणार्या कच्च्या मालाच्या आधारे होणार्या ब्रिटनच्या आर्थिक प्रगतीचाही तो साक्षीदार होता. या सार्या अनुभवांतून व्यक्तींच्या उत्पादनकार्याचे, विशेषतः शेती आणि वस्तू उत्पादनाचे महत्त्व आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नातील त्याचा वाटा अर्थचक्राला गती देण्यासाठी फार महत्त्वाचा असतो, असे त्याने प्रतिपादन केले. उत्पादक कार्ये आणि अनुत्पादक कार्ये असे सर्व सामाजिक व्यवहारांचे विभाजन करत, श्रमप्रधान उत्पादक कार्ये हीच राष्ट्राच्या संपत्तीनिर्माणासाठी महत्त्वाची आहेत, असे तो मानतो. उत्पादनाचे नेमके मूल्य ठरवण्याच्या कार्यात, बाजारपेठेचे महत्त्वही अॅडम स्मिथच्या प्रबंधातून सर्वप्रथम अधोरेखित झाले आहे. आज आपण अनुभवत असलेल्या संपूर्ण ऐहिक आणि बाजारपेठेच्या अधीन अर्थव्यवहाराचे मूळ, हे अॅडम स्मिथच्या आर्थिक मांडणीत आहे.
स्मिथच्या मांडणीत अर्थव्यवहारांचे वर्णन तर आहे, परंतु या व्यवहारांत सम्मिलित होण्याच्या मानवी प्रेरणा कोणत्या आहेत किंवा असाव्यात, याचा विचार आपल्याला बेंथमच्या उपयुक्ततावादात दिसतो. बेंथम हा प्रबोधनोत्तर विचारवंत असला, तरी प्रबोधनकाळातील मांडणीलाच पुढे नेणारा आहे. नीतिविचारातील ईश्वराचे स्थान नाकारून मानवी तर्क आणि बुद्धी हेच नीतिमत्तेच्या मुळाशी असणारे घटक आहेत या मांडणीनंतर, बुद्धीस मान्य अशी नीतितत्त्वे कोणती याविषयी जे ऊहापोह प्रबोधनकाळात झाले, त्यांच्यापैकी सौख्यवादाचा विचार पुढे नेत बेंथमने सामाजिक सौख्याची आणि त्याच्या महत्तम मूल्याची कल्पना मांडली. ‘सामाजिक सौख्य’ ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची असल्याने, त्याने या संकल्पनेची पर्यायी म्हणून सामाजिक उपयुक्ततेची संकल्पना मांडली. हे उपयुक्ततेचे तत्त्व अर्थशास्त्राच्या अभ्यासात आजही महत्त्वाचे मानले जाते. स्मिथ आणि बेंथम या दोघांच्या वैचारिक मांडणीचा एकत्रित परिणाम असा की, अर्थशास्त्र हे पूर्णतः तर्कप्रज्ञेने आणि गणिती पद्धतीने अभ्यासण्याचे एक शास्त्र बनले. या काळात वेगाने झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, सर्व शास्त्रांना वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासण्याची आकांक्षा या मांडणीच्या मागे होती.
औद्योगिक क्रांतीसाठी मांडल्या गेलेल्या स्मिथप्रणित अर्थशास्त्रात बाजारपेठीय विनिमय मूल्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने, या पद्धतीत सामाजिक विषमतेचे कोणतेही परिमाण नव्हते. किंबहुना बेंथमच्या सामाजिक उपयुक्ततेच्या तत्त्वात विषमतेच्या निराकरणाऐवजी, तिच्या सैद्धांतिक कारणमीमांसेचा प्रयत्न केला जातो. स्मिथच्या मूळ कल्पनेतील संपत्तीचे निर्माण हे कामगारांकडून होत असले, तरी मुक्त बाजारपेठीय स्पर्धेत त्यांना त्याचे योग्य मूल्य मिळून वित्तीय परिस्थितीचा समतोल ‘अदृश्य हाता’द्वारे साधला गेला पाहिजे. प्रत्यक्षात वित्तीय असमतोलामुळे कल्पनेतील मुक्त बाजारपेठ प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, हे आदर्शवादी चिंतनात विसरले गेले. असा असमतोल युरोपीय देश आणि त्यांच्या वसाहतींमध्ये होता, हे या सर्व सिद्धांतांनी कधी लक्षात घेतले नाही. परंतु, जेव्हा हाच असमतोल युरोपीय समाजातही दिसू लागला, तेव्हा वर्गविग्रहाची आणि वर्गसंघर्षाची हेगेल व मार्सप्रणित तात्त्विक भूमिका मांडली गेली. व्यक्तिगत वित्त आणि जोखमेवर अवलंबित अर्थप्रणालीचा त्याग करून, सामाजिक हितासाठी सामाजिक मालकीच्या वित्तव्यवहारांची कल्पना या तत्त्वविचारात होती. सामाजिक जीवनाचे संपूर्ण प्रतिनिधित्व समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वातून करण्याचा विचार, फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे मांडला गेलेलाच होता. या दोन्ही विचारांचा मेळ होऊन व्यक्तिगत भांडवलशाहीचे उत्तर म्हणून, राज्यशासनाच्या हाती सर्व आर्थिक व्यवहार एकवटण्याचा आर्थिक विचार साम्यवाद म्हणून पुढे आला.
अर्थनिर्मितीच्या साधनांच्या मालकीचे वैयक्तिक आणि सामाजिक अथवा राजकीय असे दोन सिद्धांत जरी परस्परविरोधी वाटले, तरी त्यांच्यात तर्कप्राधान्याच्या तत्त्वाचे साम्य होते. युरोपच्या तत्कालीन वैचारिक पार्श्वभूमीने कोणत्याही विषयाच्या अभ्यासाची एक विशिष्ट पद्धती निश्चित केली होती, जिला ‘देकार्तीय विकलन पद्धती’ असे नाव देता येईल. या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, विषयवस्तूचे अनेक छोट्या खंडांमध्ये विभाजन करायचे आणि प्रत्येक खंडाच्या चलनवलनाचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांच्या एकत्रीकरणाने, संपूर्ण विषयवस्तूचे आकलन करून घ्यायचे. घड्याळाच्या जटिल पण नियमबद्ध अशा रचनेचे विश्वरचनेशी असलेल्या साम्याचे न्यूटनचे प्रतिपादन, याच देकार्तीय विकलन पद्धतीचे उदाहरण होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात याच पद्धतीचा वापर अर्थशास्त्रीय घडामोडींच्या आकलनासाठी, मार्शलप्रभृती अर्थशास्त्रज्ञांनी केला. बेंथमच्या उपयुक्तता तत्त्वाला देकार्तीय विकलनाची जोड देत, मार्शलने व्यक्तीच्या उत्पादन-उपभोगाची सांगड संपूर्ण समाजाच्या आणि राष्ट्राच्या उत्पादन-उपभोगाशी घातली. अर्थशास्त्राच्या गणिती आकलनाचा पाया या मांडणीने दृढमूल झाला.
१९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत स्थिरपद झालेल्या औद्योगिक उत्पादनव्यवस्थेला, २०व्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महत्त्वाचे धक्के बसले. पहिला म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियात झालेली बोल्शेव्हिक क्रांती आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली साम्यवादी शासनव्यवस्था आणि अर्थव्यवस्था. खासगी मालकी, स्पर्धेचे तत्त्व आणि बाजारविनिमय हे महत्तम कार्यक्षमतेसाठी आवश्यक घटक असल्याची मान्यता स्थिर झाली असताना, साम्यवादाचा प्रयोग हा अर्थशास्त्राकरिता वेगळा होता. परंतु, भांडवलशाहीत जे विषमतेचे प्रश्न उद्भवतात, त्याची उत्तरे साम्यवादी मांडणीत आहेत, असे मार्सने प्रतिपादन केले होते. त्या सिद्धांतांचा हा प्रत्यक्ष प्रयोग होता. दुसरा धक्का म्हणजे १९३०च्या दशकात आलेल्या महामंदीचा. आदर्श भांडवलशाहीत मंदीच्या शयतेचे आणि त्यावरील उपायांचे वर्णन त्यापूर्वी आलेले नव्हते. या नवीन परिस्थितीचा सामना करण्यास अर्थशास्त्राचे आकलन व्यक्तीकेंद्रित करण्याऐवजी, समाजकेंद्रित करण्याची कल्पना कीन्स आणि इतर तज्ज्ञांकडून पुढे आली. या नवीन मांडणीचाही गणिती पाया देकार्तीय विकलन पद्धती हाच होता.
भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही जडवादी अर्थसंकल्पना आहेत, हे सर्वमान्यच आहे. परंतु, युरोपीय चिंतनातून जे जे पर्यायी अर्थविचार उभे राहिलेले आहेत, ते सर्वच जडवादी स्वरूपाचे का आहेत? याचा विचार केल्यास त्यांचे पुनरुज्जीवन आणि प्रबोधन चळवळींमधील मूळ दिसून येते. या मांडणीच्या मुळाशी दोन मुख्य विचार आहेत. वसाहतवादी मांडणीच्या निराकरणासाठी या दोन्ही विचारांचे वैयर्थ्य समजावून घेणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे, तर्कप्राधान्य आणि गणिती मांडणीचा अट्टाहास. अर्थशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे हे लक्षात न घेता, अधिकाधिक अमूर्त संकल्पनांचा अंतर्भाव या शास्त्रात केल्याने त्याचा मानवी चेहरा कुठेतरी हरवून गेला आहे. माणूस म्हणजे, प्रत्येक टप्प्यावर तार्किक निर्णय घेणारा प्राणी असे काहीसे आकलन करून घेतल्याने, प्रत्यक्ष मानवी व्यवहारांच्या आकलनात अर्थशास्त्र कमी पडले. आताच्या काळात या कमतरतेला दूर करण्याचा प्रयत्न अनेक अर्थशास्त्रज्ञ करतात. परंतु, गणिती सिद्धांतांची चौकट स्वीकारल्याने त्या चौकटीबाहेरील गुणात्मक विचार अर्थशास्त्राच्या सद्य विमर्शास असंभव वाटतो. दुसरा विचार म्हणजे, औद्योगिक क्रांतीचे एकांगी आणि युरोपीय दृष्टीने केलेले आकलन. औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक स्वस्त कच्चा माल हा अमेरिकन वसाहतींच्या शोषणातून प्रामुख्याने युरोपला मिळाला. परंतु, अर्थशास्त्राचे सिद्धांत युरोपच्या दृष्टीने झाल्याने अमेरिकन वसाहतींना काही नैसर्गिक अधिकार आहेत आणि त्यांचाही समावेश आपल्या सिद्धांतात केल्यास अनेक अनुत्तरित प्रश्न उरतात, हे तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांनी नजरेआड केले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्याच सुमारास आफ्रिकेत खोलवर अंतर्भागात वसाहती स्थापन करत आणि आशियातील वसाहतींचे अधिक शोषण करत, युरोपची आर्थिक भरभराट सुरूच राहिली. मात्र, या सर्व वसाहती स्वतंत्र होऊन स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करीत जेव्हा जागतिक व्यापारात उतरतील, तेव्हा आपले सिद्धांत लागू असतील का? याचा विचार या जडवादी अर्थसंकल्पनांमध्ये नव्हता.
आजच्या काळात जागतिक अर्थपरिस्थितीत बराच फरक पडला असला, तरी अर्थसिद्धांतांत फारसे बदल घडलेले नाहीत. साम्यवाद जरी नष्टप्राय झाला असला, तरी त्याच्या जिवावर भांडवलशाही व्यवस्था अजून बलशाली झाली आहे. परंतु, त्यातून निर्माण होणार्या विषमतेसारख्या प्रश्नांना उत्तरे त्याच चौकटीतून शोधणे सुरू आहे. व्यक्तिनिरपेक्ष, अमूर्त आणि जडवादी व्यवस्थेतील प्रश्नांचे उत्तर हे व्यक्तिसापेक्ष आणि समाजाभिमुख व्यवस्थेतूनच मिळू शकेल.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३