हॉकी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहाते ते हिरवेगार मैदान आणि त्यावर उडणारे पाण्याचे तुषार आणि शिट्टी वाजताच गोलपोस्टच्या दिशेने झेपावलेले खेळाडू. पण जर हीच हॉकी जेव्हा पाण्याखाली खेळली गेली तर? थोडी कल्पना नवी असली तरी हा क्रीडाप्रकार भारतात घट्ट रुजू पाहतो आहे. याच क्रीडाप्रकाराचा घेतलेला आढावा...आपण साऱ्या क्रीडाप्रेमींनी शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उल्हासात साजरा केला. या प्रसंगी अंदमानमधील स्वराज द्वीपावर मेजर ध्यानचंद यांना १२ तज्ज्ञ पाणबुडे आणि भारतीय खेळ प्राधिकरणाच्या तीन अधिकार्यांनी समुद्राखाली श्रद्धांजलीही वाहिली. प्रयागराजमध्ये दि. २९ ऑगस्ट १९०५ रोजी जन्मेल्या आणि ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांनी, हॉकी खेळात इतिहास रचला. दि. ३ डिसेंबर १९७९ रोजी त्यांनी मैदान सोडून जगाचा निरोप घेतला त्या, तसेच काही काळ नंतरही नैसर्गिक मातीच्या तसेच अनेकप्रसंगी नैसर्गिक हिरवळ असलेल्या क्रीडांगणावरही हॉकीचे सामने खेळले जात. स्ट्रो टर्फचे क्रीडांगण बनवण्याचा खर्च आजही अनेकांच्या आवायाबाहेर असल्याने, आजदेखील अनेकजणांची हॉकी त्या पारंपरिक क्रीडांगणावर रंगते. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच स्थानिक पातळीवर, आज या क्रीडांगणाची जागा कृत्रिम हिरवळ अर्थात स्ट्रो टर्फने घेतली आहे. या ’स्ट्रो टर्फ’ला मुबलक प्रमाणात पाणी फवारले जाते, अगदी अग्निशामक दलासारखे फवारे मैदानावर मारले जातात. मैदान पूर्ण ओलेचिंब होते. अनेकदा सामन्याच्या मध्यंतरात, उन्हातही होणारी पाण्याची फवारणी बघताना प्रेक्षक इंद्रधनुष्याचाही आनंद लुटतात. खेळताना हॉकीचा चेंडू व स्टिक त्यावरून फिरली की तुषार उडतात.
आजकालच्या ’स्ट्रो टर्फ’ असलेल्या कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर पाणी फवारणे का गरजेचे असते, हे आपण येथे थोडक्यात पाहू. पाणी असलेल्या स्ट्रो टर्फवर खेळल्यामुळे चेंडूचा वेग वाढतो, घर्षण कमी होते आणि तो अधिक सहजपणे सरकतो. पाणी हा टर्फ थंड ठेवण्यास मदत करते, यामुळे खेळाडूंना उन्हात खेळताना आराम मिळतो आणि खेळाची गुणवत्ता सुधारते. ’स्ट्रो टर्फ’वर पाणी फवारण्याची मुख्य कारणे काय असतात, हे येथे आपण जाणून घेऊया.
१) टर्फच्या कृत्रिम हिरवळीत पाणी शोषले जाते आणि पृष्ठभाग गुळगुळीत होतो, ज्यामुळे हॉकीच्या चेंडूची उसळी (बाऊंस) अधिक वेगाने आणि सहजतेने होते.
२) ओल्या टर्फवर चेंडूचे घर्षण कमी होते, यामुळे चेंडू अधिक वेगाने आणि अचूकपणे सरकतो.
३) पाणी टर्फला थंड ठेवण्यास मदत करते, यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात खेळताना खेळाडूंना जास्त गरम होत नाही आणि त्यांना आराम मिळतो.
४) टर्फ थंड राहिल्यामुळे खेळाडूंचा थकवा कमी होतो आणि त्यांना उन्हात खेळताना सोयीस्कर वाटते.
५) पाणी टर्फला जास्त गरम होण्यापासून वाचवते, यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो, चटके बसत नाहीत. आपल्या पारंपरिक मैदानी हॉकीप्रमाणे लेह-लडाखसारख्या बर्फाळ मैदानात खेळल्या जाणाऱ्या ‘आईस हॉकी’बद्दलही आपण ऐकले असेल, पाहिले असेल. या ओल्या हॉकीचे पाण्यात खराब न होणारे चेंडू, स्टिस आज पूर्वीसारखे राहिले नाहीत. जलरोधक, जलाभेद्य (ज्यातून पाणी शिरकाव करू शकत नाही असे) क्रीडासाहित्य आज हॉकीसारख्या क्रीडाप्रकारातही उपलब्ध होत आहे.
जलरोधक, जलाभेद्य क्रीडासाहित्याचा विचार करताना, हॉकीमधील पाण्याशी संबंधित हॉकीचा एक अनोखा प्रयोग मला नुकताच आढळला. क्रीडाविश्वातील घडामोडी देणार्या एका मसिकात मला तो वाचायला मिळाला. बंगळुरुमधील ‘रे अॅक्वाटिक सेंटर’मधील उत्साही खेळाडूंच्या गटाकडून, एका अनोख्या हॉकीची माहिती आपल्याला मिळते. काय आहे हा हॉकीचा खेळ!
अनेकजणांचे हॉकीचे ज्ञान जुजबी असले तरी, त्याहूनही अधिक ओळख अनेकांना पोहायच्या बाबतीत असते. कारण, पोहण्याच्या तलावात अनेकांनी डुबया मारल्या असतील, डाईव्ह मारले असतील. त्यापैकी काही पोहण्याच्या तलावातले खेळाडू, वॉटरपोलो स्पोर्ट्स खेळताना बघितले असतील.
युरोपातील बर्फावर तसेच लडाखमधील बर्फावर किंवा अन्य ठिकाणच्या ’अॅस्ट्रोटर्फ’वर खेळल्या जाणार्या साध्या हॉकीशी बहुतेक लोक परिचित असले तरी, पोहण्याच्या तलावाच्या पृष्ठ भागाखाली शांत निळ्या जगात उलगडणारी एक कमी ज्ञात, तरीही तितकीच रोमांचक अशी हॉकीची आवृत्ती खेळली जाते. ‘अंडरवॉटर हॉकी’ असे नाव असलेला हा खेळ केवळ शारीरिक शक्ती आणि कौशल्यालाच आव्हान देतो असे नाही, तर खेळाडूंच्या श्वास रोखून ठेवण्याच्या आणि खरोखरच अद्वितीय वातावरणात खेळण्याच्या क्षमतेलादेखील ते एक आव्हानच असते.
या ‘अंडरवॉटर हॉकी’ खेळाचा जन्म १९५४ साली इंग्लंडमध्ये झाला. एक उत्साही डायव्हर आणि ‘साऊथसी सब-अॅक्वा लब’चा संस्थापक अॅलन ब्लेक हे त्याचे जनक. हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा समुद्र डायव्हिंगसाठी खूप थंड असे, तेव्हा ब्लेकने त्याच्या सहकार्यांना तंदुरुस्त आणि व्यस्त ठेवण्यासाठी एक नवीन खेळ तयार केला. त्याने त्याला ‘ऑटोपश’ असे नाव दिले. काठ्या किंवा पुशर्स असलेल्या दोन संघांनी, तरणतलावाच्या तळाशी एक कच्ची शिशाची वस्तू विरोधी संघाच्या गोलमध्ये टाकण्याची स्पर्धा लावली. त्याच्या स्टिसचा आकार छोटा झाला. विशेषतः एका हातात धरण्यासाठी डिझाईन केले गेले आणि चेंडूऐवजी बर्फावरील हॉकीत वापरल्या जाणाऱ्या रबरी चक्तीचे की ज्याला ‘पक’ असे तांत्रिक नाव आहे, त्याचा वापर केला. त्यासाठी त्या ’पक’चे वजन १.३ ते १.५ किलोग्रॅम दरम्यान प्रमाणित केले गेले. यामुळे तो तलावाच्या तळात सहजतेने सरकू लागला. पहिल्या दृष्टिक्षेपात पाण्याखालील हॉकी सहजी समजण्यासारखी नसली तरी, त्याचे नियम अतिशय सोपे आहेत. ‘अंडरवॉटर हॉकी’ दहा सदस्यांच्या दोन संघांत खेळली जाते, प्रत्येक संघातून कोणत्याही वेळी फक्त सहा खेळाडूच खेळतात. अशा या खेळाची सुनियोजित नियमावली आज उपलब्ध आहे.
आज हा खेळ जागतिक स्तरावर ‘कॉन्फेडरेशन मोण्डिएल डेस अॅटिव्हिटीज सबक्वाटिस’ (सीएमएएस)द्वारे नियंत्रित केला जातो. यामध्ये स्थापित नियम आणि जगभरातील २० हून अधिक देशांमध्ये या खेळाच्या स्पर्धाही खेळवल्या जातात.
अॅलन ब्लेकने बनवलेल्या ‘अंडरवॉटर हॉकी’ची भारतात ओळख आशिष यांच्या वैयक्तिक समर्पणाची कहाणी आहे. आशिष यांनी शिकागो राज्य संघासाठी आणि नंतर ऑस्ट्रियातील एका लबसाठी खेळताना या खेळाचे ज्ञान घेतले. पाच वर्षांच्या परदेश प्रवासानंतर, तो एका एकमेव ध्येयासह भारतात परतले. त्यांनी एक अंडरवॉटर हॉकी समुदायाची स्थापन केली. ’मी शिकागोमध्ये खेळून माझा प्रवास सुरू केला आणि पाच वर्षे तिथे खेळल्याने, मला भारतात काहीतरी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली’ असे अशिष यांनी सांगितले. आशिषच्या सततच्या प्रयत्नांमुळे, या खेळाला बंगळुरुमध्ये घर मिळाले आहे. रे अॅक्वाटिक सेंटरमधील गटाच्या सरावांमुळे पाण्यातील उत्साही लोकांचे केंद्र बनले आहे, जे अनुभवी जलतरणपटू आणि प्रमाणित पाणबुड्यांना आकर्षित करतात.
भारतात हा खेळ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आशिष यांना ‘अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. जी भारतात या खेळासाठीची औपचारिक संरचना तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही मान्यता, संघटित स्पर्धा आणि राष्ट्रीय संघनिर्मितीसाठीचा मार्ग मोकळा करेल. आशिष अभिमानाने म्हणाले की, "ते आता या संघटनेच्या पाठिंब्याने या खेळाला प्रोत्साहन देण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पुढे आणण्यात प्रयत्नशील राहणार आहेत.” या खेळाडूंचे एक मोठे आणि अधिक महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे ते म्हणजे, अंडरवॉटर हॉकीला ‘ऑलिम्पिक क्रीडा प्रकार’ म्हणून मान्यता मिळवणे.
जर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताने हा खेळ खेळायला सुरुवात केली, तर आपण निश्चितच त्याला ऑलिम्पिक मान्यता मिळवून देऊ असे आशिष मानतात. हा खेळ अजूनही त्यांच्या ग्रे एरियामध्ये असताना, ते नवीन खेळाडूंना आता सामील होण्यास प्रोत्साहित करत आहेत. सध्या, बंगळुरुमधील हा गट आपली जागतिक क्रमवारी वाढवण्यावर आणि खेळाचा थरार अनुभवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. भारतातील पाण्याखालील हॉकीचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे आणि त्याचा प्रवास आपल्याला याची आठवण करून देतो की, कधीकधी सर्वांत रोमांचक साहसांची ओळख आपल्याला अगदी पाण्याच्या तळातच आढळते. हेच बंगळुरुचे आशिष आणि त्यांचे सहकारीही आपल्याला सांगू इच्छितात.
हॉकीच्या जादुगाराची फिल्ड हॉकी आता बदललेली आणि जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये प्रिय झालेली आपण बघत आहोत. तशीच लोकप्रियता अॅलन ब्लेकच्या बंगळुरुमधील शिष्यांनी चालू केलेल्या उपक्रमास मिळावी आणि एका भारतीयाचे नाव जागतिक क्रीडाविश्वात नावारूपास येवो, ही सदिच्छा आपण या लेखाद्वारे व्यक्त करू.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४