भारतामध्ये फार पूर्वीपासून वैज्ञानिक प्रगती झाली होती. विज्ञान विषयातील विविध शाखांमध्ये सातत्याने अध्ययन आणि संशोधन करण्यात ऋषींचे योगदान अतुलनीय आहे. आज पाश्चात्यांच्या नावे माहीत असलेले अनेक शोध आपल्याला ऋषींच्या ग्रंथात दिसून येतील. या लेखमालेतील दुसऱ्या लेखात त्याचा घेतलेला आढावा...
लेखमालिकेच्या दुसऱ्या भागात, ऋषी कणाद, ऋषी कपिल, ऋषी बौद्धायन आणि ऋषी नागार्जुन यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची अधिक तपशीलवार चर्चा केली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूमिती, वैद्यकशास्त्र आणि धातुशास्त्र या क्षेत्रांतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. पाश्चात्य जगाने आपल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी, या ज्ञानाचा वापर केला. प्राचीन ज्ञान हे पर्यावरण आणि प्राण्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या, शाश्वत विकासाशी जोडले गेले आहे. पाश्चात्य जग या ज्ञानाचा वापर केवळ, भौतिक फायद्यासाठीच करते. पर्यावरण, मानव आणि प्राण्यांचे आरोग्य लक्षात ठेवून, ही माहिती एकूण विकासासाठी वापरण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे.
महर्षी कणाद : अणुरचना स्पष्ट करणारे पहिले शास्त्रज्ञ
प्राचीन भारतीय वैज्ञानिक परंपरेत, महर्षी कणाद यांचे नाव अणुशास्त्राचे जनक म्हणून नोंदवले जाते. ख्रिस्तपूर्व सुमारे ६०० वर्षांपूर्वी जेव्हा बहुतेक जग पदार्थाच्या रचनेच्या गूढतेपासून अनभिज्ञ होते, तेव्हा महर्षी कणाद यांनी अणू सिद्धांत मांडला. आधुनिक विज्ञानातील डाल्टनच्या सिद्धांताचा पाया, प्रत्यक्षात महर्षी कणाद यांनीच घातला. त्यांनी सिद्ध केले की, प्रत्येक पदार्थाचे मूलभूत एकक परम अणू आहे. ज्याला त्यांनी स्वतः ‘परमाणू’ असे नाव दिले.
महर्षी कणाद यांनी अणूंंना सर्वांत सूक्ष्म आणि अविभाज्य एकक म्हणून नुसते सादर केले नाही. तर त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, दोन समान प्रकारचे अणू एकत्रितपणे एक संयुक्त एकक बनवू शकतात, ज्याला त्यांनी ‘द्विणूक’ म्हटले. हे द्विणूक आधुनिक रसायनशास्त्रातील द्विनिक रेणूच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. महर्षी कणाद यांचे हे मत अणुरचना आणि आण्विक विज्ञानाचे पहिले वैज्ञानिक विश्लेषण होते, जे त्यांनी तत्त्वज्ञानाच्या पद्धतशीर स्वरूपात सादर केले.
महर्षी कणाद यांनी त्यांच्या ‘वैशेषिक दर्शन’ या ग्रंथात, अणुशास्त्राची तत्त्वे सविस्तरपणे मांडली. त्यांचे तत्त्वज्ञान विश्वातील प्रत्येक घटक अणू म्हणून समजू शकतो, या वस्तुस्थितीवर केंद्रित होते. त्यांनी पदार्थाची रचना, गती आणि बदलाच्या नियमांचे वर्णन केले. जे आधुनिक भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या तत्त्वांशी समांतर असल्याचे दिसते. कणादांच्या मते, "अणू हे केवळ भौतिक रचनेचे मूलभूत घटक नाहीत, तर त्यांची गती आणि संयोजन जगाची विविधता निर्माण करतात.”
महर्षी कणाद यांनी केवळ अणूची रचना स्पष्ट केली नाही, तर गतीचे नियमदेखील तयार केले. ‘वैशेषिक’ तत्त्वज्ञानात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांच्या मते, प्रत्येक वस्तूचे स्वरूप गतिमान असणे आवश्यक आहे आणि ही गती बाह्य शक्ती किंवा अंतर्गत प्रवृत्तींमुळे निर्माण होते. या सिद्धांताने नंतर गती आणि शक्तीच्या आधुनिक सिद्धांतांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
महर्षी कपिलमहर्षी कपिल हे भारतीय तत्त्वज्ञानातील एक प्रमुख ऋषी. यांनी सांख्य दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य दर्शन ही घटकांवर आधारित एक गहन ज्ञान प्रणाली असून, यामध्ये महर्षी कपिल यांनी विश्वाची उत्पत्ती आणि स्वरूप समजून घेण्यासाठी घटकांच्या सूक्ष्मतम रूपांचे वर्णन केले आहे. त्यांनी हे मान्य केले की, विश्व ज्या घटकांपासून बनले आहे, त्यांचा अचूक आकार सांगणे कठीण आहे. परंतु, ते घटक इतके सूक्ष्म आहेत की, त्यांची उपस्थिती केवळ त्यांच्या गुणांवरूनच ओळखता येते.
महर्षी कपिल यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे त्रिगुण सिद्धांत! यानुसार हे जग तीन गुणांवर आधारित आहे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे तीन गुण जगाची रचना, कार्य आणि विकास नियंत्रित करतात.
सत्त्वगुण प्रकाश, शांती आणि संतुलनाचे प्रतीक आहे. रजोगुण ऊर्जा आणि अशांततेचे प्रतीक आहे. तमोगुण अज्ञान, जडत्व आणि आळशीपणाचे प्रतीक आहे. हे तीन गुण एकत्रितपणे विश्वाची संपूर्ण रचना परिभाषित करतात. जगाच्या सर्व क्रियाकलाप त्यांच्या संतुलनानेच नियंत्रित होतात.
कपिल हे विश्वाच्या उत्पत्तीचा पद्धतशीर सिद्धांत मांडणारे पहिले होते. त्यांनी विश्वाला तीन शाश्वत घटकांपासून, विश्वाच्या उत्पत्तीमध्ये एक क्रमिक विकास प्रक्रिया म्हणून पाहिले परमात्मा, जीवात्मा आणि प्रकृती. महर्षी कपिल यांनी स्पष्ट केले की, जगाची निर्मिती या तीन घटकांच्या संयोगाने झाली आहे आणि हे तीन घटक विश्वावर प्रभाव पाडतात, नियंत्रण करतात आणि त्याचे संचालन करतात.
कपिलस्मृती हा महर्षी कपिल यांनी लिहिलेला एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक तत्त्वे तपशीलवार स्पष्ट केली आहेत. कपिलस्मृती केवळ धर्म नियमांचे मार्गदर्शन देत नाही, तर जीवनाचे खोल रहस्यदेखील स्पष्ट करते. प्राचीन भारताची धार्मिक आणि सामाजिक रचना समजून घेण्यासाठी, हा धर्मग्रंथ एक अमूल्य स्रोत आहे.
महर्षी कपिल यांच्या महानतेचा पुरावा म्हणजे, त्यांचा उल्लेख भगवद्गीतेतदेखील आहे. गीतेनुसार, विश्वाची निर्मिती आणि जीवनाचे रहस्य पद्धतशीरपणे मांडणारे महर्षी कपिल हे पहिले होते. त्यांनी जगाच्या निर्मितीचे निरीक्षण केले आणि एका सखोल स्पष्टीकरण दिले, यामुळे त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात एक अग्रगण्य स्थान मिळते.
महर्षी बौद्धायनमहर्षी बौद्धायन हे प्राचीन भारतातील एक महान गणितज्ञ आणि शुल्व शास्त्राचे लेखक होते. बौद्धायनाचे शुल्व शास्त्रातील योगदान म्हणजे, ज्याला त्यावेळी ‘भूमिती’ म्हटले जात असे अद्वितीय आहे. बौद्धायनाचे कार्य भारतीय गणितीय परंपरेचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते आणि त्यांचे योगदान, जगभरात ओळखले जाते. ते जगभरात महत्त्वाचे मानले जाते.
पायथागोरस प्रमेयाचे मूळ बौद्धायन : आज पायथागोरस म्हणून ओळखल्या जाणार्या प्रमेयाचे सर्वांत जुने लिखित वर्णन, महर्षी बौद्धायनाच्या शुल्व सूत्रांमध्ये आढळते. हे प्रमेय बौद्धायनाने असे मांडले की, "जर काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर दोरी ताणली गेली, तर त्यावर तयार झालेल्या चौरसाचे क्षेत्रफळ उभ्या आणि आडव्या बाजूंवर तयार झालेल्या चौरसांच्या बेरजेइतके असते.” हे विधान इतिहासातील सर्वांत प्राचीन आणि अचूक भूमितीय तत्त्वांपैकी एक आहे. म्हणून त्याला ‘बौधायन प्रमेय’ असेही म्हणतात.
बौधायनाने पायथागोरसच्या शतकांपूर्वी हे प्रमेय शोधून काढले. पायथागोरसचा जन्म ख्रिस्तापूर्वी आठव्या शतकाच्या आसपास झाला असला तरी, बौद्धायनाचे प्रमेय भारतात ख्रिस्तापूर्वी १५व्या शतकापासून शिकवले जात होते. ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर हे स्पष्ट होते की, पायथागोरसचे प्रमेय प्रत्यक्षात बौद्धायनाचे योगदान आहे आणि गणित व भूमितीच्या क्षेत्रांत भारताचे अग्रगण्य स्थान दर्शवते.
बौधायनाच्या शुल्व सूत्रांमध्ये केवळ पायथागोरसचे प्रमेय आढळत नाही, तर गणित आणि भूमितीशी संबंधित इतर अनेक महत्त्वाची प्रमेयेदेखील आढळतात. यामध्ये दोनच्या वर्गाचे अंदाजे मूल्य आणि प्राथमिक गणितीय प्रमेये समाविष्ट आहेत. बौद्धायनाचे गणितीय सिद्धांत आणि प्रमेये, अजूनही गणिताच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा आधार मानली जातात.
ऋषी नागार्जुनऋषी नागार्जुन हे प्राचीन भारतातील महान रसायनशास्त्रज्ञ आणि धातुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी रसायनशास्त्र आणि धातुशास्त्रावर व्यापक संशोधन केले आणि या क्षेत्रात अद्वितीय योगदानही दिले. त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये रसायनशास्त्राची अद्वितीय तत्त्वे आहेत, त्यापैकी ‘रस रत्नाकर’ आणि ‘रसेंद्र मंगल’ विशेषतः प्रसिद्ध आहेत. या ग्रंथांनी रसायनशास्त्राचे गुंतागुंतीचे विषय सोप्या पद्धतीने स्पष्ट केले असून, विज्ञानाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधोरेखित केला.
नागार्जुनच्या वैद्यकीय क्षमतेने आणि समजुतीने, त्यांना असाध्य रोगांसाठी औषधे तयार करण्यात तज्ज्ञ बनवले. त्यांनी औषधनिर्मिती आणि वैद्यकीय शास्त्रातही अमूल्य योगदान दिले. त्यांच्या काही प्रमुख वैद्यकीय ग्रंथांमध्ये ‘कक्षपुटतंत्र’, ‘आरोग्य मंजरी’, ‘योग सार’ आणि ‘योगाष्टक’ यांचा समावेश आहे. या ग्रंथांमध्ये त्यांनी केवळ विविध उपचारपद्धतींचे वर्णन केले नाही, तर आयुर्वेदिक औषधे तयार करण्याची प्रक्रियादेखील तपशीलवार स्पष्ट केली. त्यांनी विविध धातू शुद्धीकरण आणि मिश्रण तयार करण्याच्या तंत्रांचादेखील विकास केला. त्यांनी पारा आणि इतर धातू शुद्धीकरण करण्याच्या पद्धतींवरही काम केले. त्यांनी महारस शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियांचेदेखील तपशीलवार वर्णन केले.
नागार्जुनने धातूंचे सोने किंवा चांदीमध्ये रूपांतर करण्याच्या समाधी तंत्रांचा विकास केला, जो आजही प्राचीन विज्ञानाचा एक अद्भुत शोध मानला जातो. त्यांनी विकसित केलेल्या पाराच्या शुद्धीकरणाचा वापर केवळ धातू परिवर्तनासाठीच केला जात नव्हता, तर लोकांना निरोगी आणि दीर्घायुषी बनवण्यासाठीदेखील केला जात होता. नागार्जुनचे योगदान केवळ रसायनशास्त्र आणि धातूशास्त्रापुरते मर्यादित नाही, त्यांच्या वैद्यकीय पद्धती आणि औषधी शोध वैद्यकीय शास्त्राला एक नवीन आयाम देतात. त्यांचे संशोधन आणि सिद्धांत आजही आपल्याला दाखवतात की, प्राचीन भारताचे विज्ञान किती प्रगत आणि प्रगल्भ होते. नागार्जुनने विज्ञानाला समर्पित जीवन जगले आणि त्यांनी केलेल्या संशोधन कार्याने, रसायनशास्त्र आणि औषध क्षेत्र समृद्ध केले.
प्राचीन काळातील आपल्या महान शास्त्रज्ञांनी मांडलेले विविध तत्त्वे, विचार आणि विज्ञानाचा आपण सखोल अभ्यास करूया. भविष्यातील लेखांमध्ये अशा आणखी शास्त्रज्ञांची माहिती दिली जाईल.
पंकज जयस्वाल
७८७५२१२१६१