नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चीनच्या तियांजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक घेतली. या चर्चेत युक्रेनमधील युद्ध, शांततेचे प्रयत्न आणि भारत-रशिया भागीदारी यावर विस्तृत संवाद झाला.
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन संघर्षावर बोलताना म्हटले की, शांततेचा मार्ग शोधणे ही आज संपूर्ण मानवजातीची गरज आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आपण सतत चर्चा करत आलो आहोत. अलीकडे शांततेसाठी जे प्रयत्न झाले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो. सर्व पक्षांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे यायला हवे. संघर्ष शक्य तितक्या लवकर थांबवून शाश्वत शांततेचा मार्ग शोधला पाहिजे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीकरणावरही भर देण्यात आला. पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबतची ही नेहमीच संस्मरणीय ठरते. अनेक विषयांवर माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. आम्ही सतत संपर्कात असतो आणि अनेक उच्चस्तरीय बैठकाही होत राहतात. १४० कोटी भारतीय या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आमच्या २३व्या शिखर परिषदेची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-रशिया मैत्रीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि रशिया नेहमीच सर्वात कठीण प्रसंगात एकमेकांच्या सोबत उभे राहिले आहेत. आमचे निकट सहकार्य हे फक्त आमच्या देशांच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठीदेखील महत्त्वाचे आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदी यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले, पंतप्रधान मोदी यांना भेटून र आनंद झाला. एससीओ हा जागतिक दक्षिण आणि पूर्वेकडील देशांना एकत्र आणणारा महत्त्वाचा मंच आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी भारत-रशिया संबंधांच्या विशेषाधिकार प्राप्त सामरिक भागीदारी’च्या १५व्या वर्धापन दिनाचे औचित्य आहे. आमचे संबंध बहुआयामी आहेत. आजची बैठक भारत-रशिया संबंधांना निश्चितच नव्या उंचीवर नेईल, असा पुनरुच्चार पुतीन यांनी केला.
मोदी–पुतिन मैत्रीचा खास क्षण
तियांजिन येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील आपुलकी स्पष्टपणे दिसून आली. पुतिन यांनी मोदींना मिठी मारून स्वागत केले तसेच आपल्या अधिकृत ‘ऑरुस सेनाट’ या ‘लिमोझिन’ गाडीत सोबत नेले. मोदींसोबत प्रवास करण्यासाठी त्यांनी जवळपास दहा मिनिटे प्रतीक्षा केली. परिषद स्थळावरून द्विपक्षीय बैठकीच्या हॉटेलपर्यंत जाताना दोन्ही नेत्यांनी गाडीत ४५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली.