नवे प्रवाह

01 Sep 2025 13:38:49

बदल हाच जगाचा शाश्वत नियम आहे. जगातली प्रत्येक संस्कृतीही परिवर्तनाचे काही टप्पे ओलांडून इथपर्यंत पोहोचली. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिकरणाची मोहिनी संपूर्ण विश्वावर पसरली. वसाहतवादामुळे ही प्रक्रिया वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरली. प्रत्येक राष्ट्र स्वाभावानुसार या परिवर्तनाला तोंड देत राहिले. या प्रक्रियेमध्ये त्या राष्ट्रांमधल्या संस्कृतीमध्येही आमूलाग्र बदल झाले. औद्योगिक क्रांतीचा चौथा टप्पा म्हणजे, मानवाचा कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतचा संवाद. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रावर स्वार होऊन जगात आज झपाट्याने बदल होत आहेत. या परिवर्तनाच्या केंद्रबिंदूवर उभी आहेत वेगवेगळ्या प्रकारची प्रसारमाध्यमे!

विविध प्रसारमाध्यमांमुळे आज आपल्याला अल्पावधीतच समाजमनाचे दर्शन घडते. हातातील एका मोबाईलमुळे आपण कोट्यवधी लोकांपर्यंत अत्यंत सहज पोहोचतो. आजमितीला ‘कन्टेंट’ आणि ‘कन्टेंट क्रिएटर’ हा परवलीचा शब्द झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एस यांसारख्या समाजमाध्यमांवर विविध प्रकारची आशयनिर्मिती करणारे कन्टेंट क्रिएटर्स स्वतःचे वेगळे अर्थकारण तयार करू लागले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारामुळे या क्रिएटर्सच्या चाहत्यांमध्येही लक्षणीय प्रमाणात संख्यात्मक वाढ होताना आपल्याला दिसते. याच कन्टेंट क्रिएटर्सच्या समूहाचा उपयोग जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जाऊ शकतो का? असा विचार लंडनच्या ‘नॅशनल गॅलरी’ या वस्तुसंग्रहालयाने केला आणि एका नवीन प्रवाहाचा जन्म झाला. २०२४ साली सुरू केलेल्या क्रिएटर्स प्रोग्रामला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, यावर्षी पुन्हा एकदा ‘नॅशनल गॅलरी’च्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. मागील वर्षी राबवलेल्या या उपक्रमाला देश-विदेशातून भरघोस प्रतिसाद लाभला. सर्व समाजमाध्यमांवर एकूण चार कोटींपेक्षा अधिकजण, ऑनलाईन स्वरूपात वस्तुसंग्रहलयाच्या उपक्रमांसोबत जोडले गेले.

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयामध्ये भूतकाळातील काही वस्तूंच्या जपणुकीबरोबरच, इतिहासाच्या सम्रग आकलनासाठी आवश्यक सर्व साधनांचा अवकाश या एकाच ठिकाणी बघायला मिळतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून इतिहास अवलोकनाची कवाडे अभ्यासकांना, संशोधकांना खुली होतात. कन्टेंट क्रिएटर्ससुद्धा अशा वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकतात.त्याचबरोबर वस्तुसंग्रहालयातील महत्त्वाच्या उपक्रमांवर भाष्य करणारा मजकूर ते आपल्या माध्यमातून प्रसारित करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. विशेष बाब म्हणजे, या कामाची एक विशिष्ट रक्कमसुद्धा त्यांना देण्यात येते. या मोहिमचे वैशिष्ट्य म्हणजे, कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काळ थांबून या कन्टेंट क्रिएटर्सना मजकूर बनवण्याची मुभा आहे. एखादे चित्र, एखादी पुरातन वस्तू या सार्यांच्या सखोल विवेचनासाठी त्यांना अधिक वेळ दिला जातो. या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे असल्यास काही अटी-शर्ती आहेत. सामील होणाऱ्या व्यक्तीचे युट्यूबवर किमान ५० हजार फॉलोअर्स असणे अपेक्षित आहे. इन्स्टाग्रामवर किमान एक लाख, तर टिकटॉकवर एक लाख लाईस असणे अपेक्षित आहे. समाजमाध्यमांवर इतका मोठा चाहता वर्ग त्यांचा नसला, तरीसुद्धा वस्तुसंग्रहालयातील अधिकारी डिजिटल उपस्थितीच्या निकषावर इच्छुकांनासंधी देऊ शकतात.

मागच्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर अनेक वेगवेगळ्या वस्तुसंग्रहालयांनी व संस्थांनी, प्रायोगिक तत्त्वावर हे मॉडेल राबवण्याचा निर्णय घेतला. एक पायरी पुढे जात, अशा इन्फ्लुएन्सरसाठीही स्वतंत्र कार्यशाळेचेसुद्धा आयोजन होते. प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून नेमका कुठला विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याचे शिक्षण इथे दिले जाते व त्यांच्या माध्यमातून पुढे कोट्यवधी लोकांसोबत ती संस्था जोडली जाते. येणार्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये अशा पद्धतीचे मॉडेल्स वापरले गेल्यास आश्चर्य वाटणार नाही.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात घडणारे परिवर्तन सातत्याने नवीन प्रवाह जन्माला घालत आहे. या प्रवाहांना आत्मसात करण्याशिवाय तरणोपाय नाही, हेच आता वेगवेगळ्या मार्गांनी स्पष्ट होते. समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, मोठ्या प्रमाणात वैयक्तिक झाली आणि त्यातून अभिव्यक्तीच्या नव्या दिशा खुल्या झाल्या. त्याचसोबत अर्थार्जनाचा नवीन विचारसुद्धा यातूनच जन्माला आला. आपला डिजिटल फूटप्रिंट किती आवश्यक आहे, हा बोध यातून सर्वांनी घ्यायला हवा.
Powered By Sangraha 9.0