काबुल : (Afghanistan Earthquake Update) पूर्व अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या भागात रविवारी रात्री उशीरा ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. या भूकंपामध्ये सुमारे ६१० लोक मृत्युमुखी पडले असून एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या रेडिओ टेलिव्हिजन अफगाणिस्तानने दिली आहे. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून या घरांच्या ढिगाऱ्यांखालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र हे नांगरहार प्रांतातील जलालाबादपासून सुमारे २७ किलोमीटर ईशान्येला होते. याचे केंद्र भूपृष्ठापासून ८ किमी असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले. या भूकंपामुळे कुनार प्रांतात मोठी हानी झाली आहे. भूकंपाच्या या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा सौम्य स्वरूपाचे दोन धक्के जाणवले. त्यांची तीव्रता ४.५ आणि ५.२ इतकी होती. येथे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकासान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा भाग अतिशय दुर्गम आहे. भूकंपापासून संरक्षण व्हावे अशी प्रणाली या घरांसाठी वापरण्यात आलेली नाही.तालिबान सरकारने म्हटले आहे की, त्यांच्याकडे अत्यंत मर्यादित संसाधने आहेत तेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनांनी आम्हाला मदत करावी. प्रभावित क्षेत्रात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत करण्यात यावी, असे आवाहन तालिबानी अधिकाऱ्यांनी केले आहे.
अफगाणिस्तानच्या नांगरहार विमानतळावर सरकारी अधिकारी कुनार प्रांतातील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करत आहेत. हेलिकॉप्टरमधून जखमींना विमानतळावर आणले जात आहे, आणि विमानतळावरून रुग्णवाहिका जखमींना आसपासच्या रुग्णालयात हलवत आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कुनार प्रांतात पोहोचले आहेत. तालिबान सरकार बाधित भागात लवकरात मदत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.