गावखेड्यातील नागरिकांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या अथर्व आग्रहकर याच्याविषयी...गरज ही शोधाची जननी आहे, असे कायम म्हटले जाते. गरज निर्माण झाली की, संधीचा शोध घेतला जातो, हे लोणावळ्यातील अथर्व आग्रहकर याने दाखवून दिले. कायद्याचे शिक्षण घेत असताना, खेडेगावातील अडचणी त्याच्या लक्षात आल्या. त्यानंतर खेडेगावातील लोकांसाठी काहीतरी कराण्यचा निश्चय त्याने केला. परंतु, निश्चय झाला तरी नेमके काय करायचे हे कळत नव्हते. मग अथर्वने लोणावळा, कर्जत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन तेथील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यास सुरुवात केली. यातून या नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव त्याच्या लक्षात आला. त्यामुळे खेड्यातील जनतेमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा मार्ग त्याला सापडला आणि त्याच दिशेने त्याचे काम सुरू झाले.
अथर्वचे शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण लोणावळा, कामशेत याच पंचक्रोशीत झाल्यामुळे, या परिसराची संपूर्ण माहिती अथर्वला होती. खेडेगावात, वाड्या-वस्त्यांमध्ये नागरिकांमध्ये आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक आणि बचत याबाबत जागरूकता नसते. खेडेगावात नागरिक दूध, शेती यातूनच अर्थार्जन करतात. आर्थिक साक्षरता नसल्याने बचत, आर्थिक स्थैर्य हे शब्द त्यांच्या गावीही नसतात. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात सावकार हा एकच पर्याय त्यांच्या पुढे असतो. या सावकारी पाशातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे, अथर्वने लहानपणापासून पाहिले होते. अशा उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना बघितल्याने, आपल्या आजूबाजूच्या खेड्यात आर्थिक जागरूकता निर्माण करण्याचे त्याने ठरवले. वाट बिकट असली, तरी अशय नव्हती. कामात येणार्या अडचणी लक्षात घेऊनच, अथर्वचे नियोजन सुरू झाले. प्रथम एक गाव शोधून, रोजच्या रोज येणाऱ्या उत्पन्नावर जीविका करणाऱ्या नागरिकांना भेटण्यास त्याने सुरुवात केली. बाजाराच्या दिवशी जाऊन तेथील दूध विक्रेत्यांसोबत गप्पा मारत, त्यांचे उत्पन्न आणि बचत किती होते हे समजावून सांगण्याचे काम अथर्वने सुरू केले. रोजचे किमान १०० रुपये कसे बाजूला काढावे हे समजावणे, समोरच्याला विश्वास देणे, आपण कोणतीही ’स्कीम’ विकत नाही, हे पटवून देण्याचे शिवधनुष्य अथर्वला पेलावे लागले. पुढील काळात देहूरोड, घोरावडी, वडगाव मावळ, नाणे, अंदर मावळ या भागात काम करण्याचे अथर्वचे नियोजन आहे. अथर्व जेव्हा बोलताना गावांची नावे सांगतो, तेव्हा अशी गावे पुणे, कर्जत भागात आहेत हेच पहिल्यांदा समजते. ज्या गावांमध्ये अद्याप ‘एसटी’ व्यवस्थित पोहोचली नाही, अशा गावात अथर्व आर्थिक साक्षरता आणण्याचे काम करत आहेत.
यात काहीवेळा अथर्वला अपमानाचे घोटदेखील पचवावे लागले. परंतु, यातून खचून न जाता, आपल्या भूमिकांवर ठाम राहत अथर्वने काम सुरूच ठेवले. नागरिकांना त्यांच्याच भाषेत सांगितले तर पटते हे लक्षात आल्यावर, शेतकरी, छोटे उद्योजक, नवीन उद्योजक यांना आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी अथर्वने घेतली. हळूहळू साठवलेले पैसे नागरिक अथर्वकडे देत असत. आता या पैशांचे काय करायचे, हा प्रश्न त्याला पडला. नागरिकांचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे, यासाठी त्याने ‘आग्रहकर कॅपिटल’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणूक कशी आणि कुठे करायची, याचे प्रशिक्षण देणे सुरू झाले. गुंतवणूक करण्यासाठी कंपनी कशी निवडायची, फसवणकीपासून कसे सावध राहायचे, याचेही मोफत प्रशिक्षण देण्याचे काम सुरु झाले.
गेल्या चार वर्षांत १५० हून अधिक नागरिकांना, आर्थिक साक्षर करण्यात अथर्वला यश आले आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचा प्रयत्न अथर्व करतो. महिन्याला एक गाव निवडून, त्या गावात जाऊन नागरिकांशी गप्पा मारणे, कोण आर्थिक अडचणीत असेल तर त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यावर तोडगा निघत असेल तर प्रामाणिक सल्ला देणे, ही कामे तो नियमाने करतो. एकीकडे देश प्रगती करत असताना खेडेगावात नागरिकांना अजूनही आर्थिक स्थैर्य नाही, हे वास्तव त्याला स्वस्थ बसू देत नाही. आता अथर्वनेे नवीन उपक्रम हाती घेतला आहे. गावात सुरू करण्याजोगे एखादा लहान उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न तो करत आहे. गावात उत्तम मनुष्यबळ असते परंतु, त्यांना योग्य मार्ग मिळत नाही. यासाठी गावातूनच तरुणांची चांगली फौज तयार करत आहे. गावात प्रत्येकाच्या अंगात एक तरी कला असते, त्याचा वापर अर्थार्जनासाठी कसा करता येईल, याचे नियोजन ही फौज करते. प्रत्येक व्यक्ती जर कामात व्यस्त राहिला, तर एकमेकांबद्दल होणारी तुलना, निर्माण होणारी असूया बंद होईल. ‘रिकामे मन सैतानाचे घर’ हे समजावून सांगत व्यस्त राहण्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन अथर्व आणि त्याची टीम करते. अशा ग्रामीण भागात राहूनच नागरिकांना उत्तम अर्थार्जनासाठी मार्गदर्शन करणार्या अथर्व आग्रहकरला पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!